पावसा आता तरी परत जा रे बाबा..!

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

ऑक्टोबर महिना उजाडला तरी पाऊस थांबण्‍याची काही चिन्हे नाहीत. भात कापणीयोग्‍य झाल्‍यामुळे काहींनी कापणी केली. काहीजणांनी भात काढून अंगणात पोत्यात भरण्यासाठी ठेवले. मात्र, सोमवारी रात्री गडगडाटासह आलेल्‍या पावसाने घाला घातला आणि उरल्‍या सुरलेल्‍या आशाही मावळल्‍या. भात पीक मुसळधार पावसामुळे आडवे झाले, दाण्‍याची कणसे खराब झाल्‍याने हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला.

पणजी : ऑक्टोबर महिना उजाडला तरी पाऊस थांबण्‍याची काही चिन्हे नाहीत. भात कापणीयोग्‍य झाल्‍यामुळे काहींनी कापणी केली. काहीजणांनी भात काढून अंगणात पोत्यात भरण्यासाठी ठेवले. मात्र, सोमवारी रात्री गडगडाटासह आलेल्‍या पावसाने घाला घातला आणि उरल्‍या सुरलेल्‍या आशाही मावळल्‍या. भात पीक मुसळधार पावसामुळे आडवे झाले, दाण्‍याची कणसे खराब झाल्‍याने हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला.

मोठ्या कष्‍टाने उभारलेल्‍या भात शेतीवर, उत्‍पन्नावर पावसाने पाणी फिरवले. त्‍यामुळे बळीराजा हताश होऊन पावसा आता तरी परत जा रे बाबा, अशी विनवणी करीत आहेत.
कोरोना महामारीमुळे आधीच जबर आर्थिक फटका बसला आहे. टाळेबंदीच्‍या काळात भाजीपाला काही दिवस विकला गेला नाही, त्यामुळे नुकसान झाले. आता भातपिकाच्या रूपात चार पैसे गाठीला येतील असे वाटत होते. मात्र, ते या पावसामुळे येतील असे वाटत नसल्याच्या प्रतिक्रिया राज्यभरातील शेतकरी व्यक्त करीत आहेत. 

राज्याच्या सर्वच भागातील पिकांना पावसाचा फटका बसला आहे, याचा पारिणाम शेतकऱ्याच्या मिळकतीवर होणार ही बाब शेतकऱ्याला माहित असल्याने शेतकरी काळजीत आहे. भाताच्या पिकासोबत इतरही भाजीपाला आणि मिरचीसारख्या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी भाजीपाल्याच्या शेतीत पाणी घुसून तेथेही आलेली भाजी वाया गेल्याची माहिती राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी दिली असल्याचे गोवा आदर्श कृषी सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी दिली. 

वाळपई आणि सत्तरी आणि साखळीच्या भागात लोकांच्या बागायतीमध्ये वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड होऊन नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पडल्या पावसामुळे शेतीत पाणी तुंबून राहिले. ज्यामुळे भाजीपाला आला होता तोही वाया गेला, अशी खंत अशोक नाईक या शेतकऱ्याने व्यक्त केली. 

संबंधित बातम्या