म्हापशात रेनकोट महागले

Raincoat
Raincoat

म्हापसा

म्हापसा पालिका बाजारपेठेत सध्या विक्रेत्यांची संख्या कमी असल्याने त्याचा लाभ उठवत दुकानदारांकडून चढ्या भावाने रेनकोटची विक्री केली जात आहे. त्यात भरीस भर म्हणजे या बाजारपेठेत सध्या फिरत्या विक्रेत्यांना परवानगी दिली नसल्याने व्यवसायिक स्पर्धेचा अभाव जाणवत असून त्याचा लाभ दुकानदार उठवत दामदुप्पट पद्धतीने रेनकोटची विक्री करीत आहेत.
म्हापसा बाजारपेठेत रेनकोट साधारणपणे प्रतिनग सहाशे ते एक हजार रुपये या दराने विकले जात आहेत. गेल्या वर्षी पाचशे रुपये दराने विकला जाणारा साध्या प्रतीचा रेनकोट यंदा सुमारे सहाशे रुपये दराने विकला जात आहे. त्यामुळे स्पष्ट होतेण की गतवर्षीपेक्षा साधारणत: वीस टक्‍के अतिरिक्‍त दर आकारला जात आहे.
गेल्या सुमारे दोन अडीच महिन्यांपासून टाळेबंदी असल्याने विक्रेत्यांपर्यंत रेनकोटचा नवीन स्टॉक पोहोचणे कठीण झाले आहे. म्हापसा बाजारपेठेत फारच कमी प्रमाणात असा नवीन स्टॉक उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे शिल्लक राहिलेला गतवर्षीचा स्टॉक सध्या विकला जात आहे. ज्या दुकानदारांकडे नवीन स्टॉक आलेला आहे, तेसुद्धा सर्वप्रथम जुन्या स्टॉकची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. जुना स्टॉक संपल्यानंतरच नवीन स्टॉक ग्राहकांसाठी उपलब्ध करण्याचे धोरण त्यांनी अवलंबले आहे.
सध्या पाऊस सुरू झाल्याने रेनकोट व छत्र्या विकत घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी बाजारपेठेत दिसून येते. त्यामुळे साहजिकच दुकानदारही दरवाढ करीत आहेत. बाजारपेठेत स्टॉक कमी असल्याचे माहीत असल्याने भाववाढ करण्याची नामी शक्‍कल दुकानदारांनी लढवलेली आहे. जून महिन्याच्या सुरवातीला दुकानदार नेहमीच गतवर्षीचा स्टॉक विकून टाकतात, हे माहीत असल्याने काही चाणाक्ष ग्राहक जून महिन्यात रेनकोटची खरेदी करण्याचे हेतुपुरस्सर टाळतात; कारण, त्यांना नवीन स्टॉक हवा असतो.
म्हापसा बाजारपेठेत सध्या सर्वसाधारण दर्जाचे रेनकोट पाचशे ते सहाशे रुपये दराने विकले जात आहेत. तथापि, ब्रॅंडेड कंपन्यांचे रेनकोट आठशे ते एक हजार रुपये या दराने ग्राहकांच्या माथी मारले जात आहेत. रेनकोटची विक्री करणारी दुकाने बाजारपेठेत फारच कमी संख्येने असल्याने त्याचा लाभ उठवत दुकानदारांनी ही दरवाढ केलेली आहे.
सध्या बाजारपेठेत ३३ टक्‍के फिरत्या विक्रेत्यांना व्यवसाय करण्यास मुभा देण्याचा निर्णय म्हापसा पालिकेने घेतला असला तरी त्याची कार्यवाही अद्याप झालेली नाही. त्यामुळे फिरत्या विक्रेत्यांना व्यवसाय करण्याची संधी मिळालेली नाही. त्याचाही लाभ बाजारपेठेतील दुकानदारांना झाला आहे व त्या संधीचा लाभ उठवत दुकानदार रेनकोटची विक्री अव्वाच्या सव्वा दराने करीत आहेत.
फिरत्या विक्रेत्यांना केवळ सोपो कर पालिकेला द्यावा लागतो. त्यामुळे त्यांना कमी दरात मालविक्री करणे परवडते; तथापि, दुकानदारांना विविध प्रकारचे कर आणि अन्य प्रकारचे शुल्क भरावे लागत असल्याने साहजिकच त्यांना जास्त दराने मालविक्री करणे भाग पडत असते.
दुकानदारांच्या दराशी तुलना करता फिरते विक्रेते अगदीच स्वस्त दराने मालाची विक्री करीत असतात असे आढळून येते. दुकानात सुमारे सहाशे रुपये दराने उपलब्ध होणारा रेनकोट फिरते विक्रेते सुमारे चारशे ते साडेचारशे रुपये दराने विकत असतात. सध्या फिरते विक्रेते बाजारपेठेत नसल्याने गरीब व मध्यमवर्गीय वर्गातील ग्राहकांची अतिशय कुचंबणा झालेली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com