डिचोलीसह साखळीत जलमय स्थिती निवळली

प्रतिनिधी
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

दोन दिवसांपासून सक्रिय झालेल्या पावसाचा जोर आज मंगळवारी कमी झाल्याने नद्यातील पाणी ओसरले असून, डिचोलीसह साखळीतील जलमय स्थिती निवळली आहे.

डिचोली:  दोन दिवसांपासून सक्रिय झालेल्या पावसाचा जोर आज मंगळवारी कमी झाल्याने नद्यातील पाणी ओसरले असून, डिचोलीसह साखळीतील जलमय स्थिती निवळली आहे. रविवारी रात्रीपासून पावसाने कहर करताना काल (सोमवारी) डिचोलीतील बहूतेक भागात झोडपून काढले होते. मुसळधार पावसाने झोडपून काढताना जनजीवन पूर्णतया विस्कळीत करुन सोडले होते. काल पडलेल्या मुसळधार पावसामुळे डिचोलीसह साखळीतील वाळवंटी आणि अस्नोड्यातील पार नदीच्या पाण्याची पातळी वाढून या नद्या ओसंडून वाहत होत्या. डिचोली आणि साखळीत काहीठिकाणी पाणी नदीबाहेर फुटले होते. डिचोलीसह साखळी आणि अन्य भागात  नदीकाठी पाणीच पाणी झाले होते. ग्रामीण भागातही जलमय चित्र दिसून येत होते. सखल भागातील काही घरांनीही पाणी घुसले होते.  डिचोली आणि साखळी नदीतील पाण्याची पातळी बरीच वाढली होती. सोमवारी रात्री आणि आज (मंगळवारी) सकाळपर्यंत पावसाचा जोर कायम होता. मात्र, नंतर अधूनमधून पर्ज्यन्यवृष्टी वगळता पावसाचा जोर काहीसा कमी झाला. त्यामुळे आज सायंकाळपर्यंत नद्यांनी वाढलेले पाणी ओसरल्याचे दिसून येत होते. काल पडलेल्या मुसळधार पावसानंतर पूर नियंत्रण कक्षही सज्ज झाला आहे. अशी माहिती डिचोली अग्निशमन दलाकडून मिळाली आहे. दरम्यान दोन दिवस पडलेल्या पावसात आमठाणे धरणही तुडुंब भरले आहे.

दरम्यान, काल पडलेल्या पावसात दोन-तीन ठिकाणी वगळता झाडांची मोठी पडझड वा अन्य आपत्ती ओढवलेली नसली, तरी सखल भागातील भातशेतीत पाणी साचल्याने शेतकरी चिंताक्रांत बनल्याचे दिसून येत आहे.
 

संबंधित बातम्या