पावसाने राज्याला झोडपले

Tejashree Kumbhar
सोमवार, 17 ऑगस्ट 2020

जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाने रविवारी झोडपून काढले. पहाटेपासून पाऊस एकसारखा कोसळत होता. रविवार असल्याने अनेकजण घरीच होते. पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे घरातून बाहेर न पडता नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले. राज्यात अनेक ठिकाणी पाऊस एकसारखा कोसळत होता. त्यामुळे रस्ते पाण्याखाली गेले होते. काही रस्त्यांवर तर गुडघाभर पाणी आले होते. यातून वाट काढत वाहनचालकांना कसरत करावी लागली.

पणजी
महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहणार असल्याची शक्यता गोवा वेधशाळेने व्यक्त केली आहे. अरबी समुद्रातून वाहणारे वारे उत्तर-पश्चिम दिशेने वाहत असल्याने कोकण किनारपट्टीवर पुढील दोन दिवस जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
एकसारखा पाऊस पडत असल्याने आज वातावरणात गारवा जाणवला. गेल्या चोवीस तासात कमीत कमी २३ अंश सेल्सिअस आणि जास्तीत जास्त २७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असल्याची माहिती गोवा वेधशाळेने दिली. दरम्यान, गोवा वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन दिवस म्हणजे २० तारखेपर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
समुद्रावरील वातावरणही अत्यंत धोकदायक आहे. समुद्रावर वाऱ्याचा वेग ४५ ते ५५ कि.मी. प्रती तास इतका आहे. शिवाय लाटांचा वेग आणि उंची अधिक असल्याने मासेमारी करणाऱ्या लोकांना समुद्रात न उतरण्यासाठीचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय लोकांनाही समुद्राकडे न फिरकण्यासाठीच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
गोवा वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, म्हापसा येथे १४९ मि. मी., पेडणे येथे १३३.८ मि. मी., फोंडा येथे ११५ मि. मी., पणजी येथे १०८.२ मि. मी., जुने गोवे येथे १२५.८ मि. मी., साखळी येथे १२८.० मि. मी., काणकोण येथे ०३०.२ मि. मी. , दाबोळी येथे ०८९.२ मि. मी., मडगाव येथे ०५०.० मि. मी., मुरगाव येथे ०९५.८ मि. मी., केपे येथे ०८०.८ मि. मी., सांगे येथे ०८४.५ मि. मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे

संपादन - यशवंत पाटील

संबंधित बातम्या