पावसाने राज्याला झोडपले

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020

राजधानी पणजीसह वाळपई, साखळी, सांगे भागात दिवसभर जोरदार पाऊस कोसळला. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गोवा आणि महाराष्ट्र किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडत आहे.

पणजी: जोरदार वारे आणि विजांच्या गडगडाटासह राज्यात आज मुसळधार पाऊस पडला. समुद्रावरही वादळी वारे वाहत असून वाऱ्याचा वेग ४५ ते ५० कि.मी. प्रती तास होता. राज्यासह संपूर्ण कोकण किनारपट्टीत वादळी वारे वाहणार असून जोरदार पावसाची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे. दरम्यान, आज दिवसभरात राज्यात २१.८ मि. मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात ही आतापर्यंतची सर्वाधिक पावसाची नोंद असल्याची माहितीही मिळाली. 

राजधानी पणजीसह वाळपई, साखळी, सांगे भागात दिवसभर जोरदार पाऊस कोसळला. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गोवा आणि महाराष्ट्र किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पाऊस पडत असला तरी त्याचे प्रमाण आजच्या तुलनेत कमी होते. आज दिवसभरात पडलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले. शिवाय रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना त्रास झाला. 

पावसाचा वेग चांगलाच असल्याने वातावरण थंड आहे. राज्यातील कमाल व किमान तापमनातही लक्षणीय घट झालेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पणजीत कमाल तापमान २७.६ अंश सेल्सियस, तर किमान तापमान २२.८ अंश सेल्सियस, मुरगाव भागात कमाल तापमान २८.७ अंश सेल्सियस, तर किमान तापमान २२.६ अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. 

वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर या काळात सामान्यत: १०२.२ मि.मी. पावसाची नोंद होते. मात्र, यावर्षी आतापर्यंत ११७.१  मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. 
दरम्यान, गेल्या चोवीस तासात फोंडा येथे ००१६.० मि. मी.,  पणजी येथे ००८.६ मि.मी, जुने गोवे येथे ०१९.० मि.मी, साखळी येथे ०४८.८ मि. मी., वाळपई येथे ०५४.२ मि. मी.,  दाबोळी येथे ०११.२ मि. मी., मुरगाव येथे ००७.३ मि. मी., सांगे येथे ०२६.५ मि. मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

संबंधित बातम्या