गोव्यातील जीवरक्षकांच्या समस्या राष्ट्रपतींसमोर मांडणार

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 18 डिसेंबर 2020

उपोषणकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे जाहीर करून या जीवरक्षकांच्या समस्या राष्ट्रपतींसमोर मांडणार

म्हापसा: म्हापसा येथे गांधी चौकात बसलेल्या उपोषणकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे जाहीर करून या जीवरक्षकांच्या समस्या राष्ट्रपतींसमोर मांडणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संजय बर्डे यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

उपोषणकर्त्यांप्रती सहानुभूती व्यक्त करण्यासाठी आज ते गेले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की दुसऱ्यांचे जीव वाचवणाऱ्यांना स्वत:चा जीव धोक्यात घालावा लागत आहे आणि सरकार ते उघड्या डोळ्यांनी पाहात आहे. समुद्रकिनारी पाण्यात उतरलेल्या लोकांचे जीव वाचवण्याचे काम करणाऱ्या जीवरक्षकांना स्वत:च्या रास्त मागण्या सरकारकडून संमत करून घेण्यास उपोषणाचा मार्ग पत्करावा लागत आहे, हे दुर्दैवी आहे. जीवरक्षकांच्या समस्या गोवा मुक्तिदिन सोहळ्यास उपस्थित राहणाऱ्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे मी स्वत: मांडणार आहे, असेही ते म्हणाले.

श्री. बर्डे पुढे म्हणाले, उपोषणकर्त्यांच्या मागण्या फार मोठ्या नसून त्यांना ‘दृष्टी’ या संघटनेच्या अधिपत्याखाली न ठेवता सरकारी कर्मचारी म्हणून सामावून घ्यावे, अशी मागणी आहे. त्यामुळे त्यांची मागणी व समस्या राष्ट्रपतींकडे राष्ट्रवादी पक्षातर्फे आपण लेखी स्वरूपात मांडणार आहे, असे आश्वासन बर्डे यांनी आंदोलकांना दिले.

जीवरक्षकांना पणजीहून म्हापशाला स्थलांतरित करण्यात आले. त्यांची काय अवस्था झाली आहे, हे प्रत्यक्ष येऊन पाहाण्याची जबाबदारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच म्हापशाचे आमदार ज्योशुआ डिसोझा यांची होती. त्याशिवाय इतर आमदार व मंत्र्यांनी त्यांची भेट घेणे आवश्यक होते. इतरांच्या प्राणांचे रक्षण करणाऱ्यांच्या जिवाची पर्वा सरकारला मुळीच नाही, हे दिसून येत आहे, असे मत श्री. बर्डे यांनी या वेळी व्यक्त केले.

अन्नग्रहण करण्यास नकार!
जीवरक्षकांच्या उपोषणाचा आज गुरुवारी तिसरा दिवस होता. १०८ वाहनातून आलेल्या डॉक्टरांनी उपोषणकर्त्यांची वैद्यकीय तपासणी केली व योग्य तो आहार घेण्याची विनंती त्यांना केली असता अन्नग्रहण करण्यास उपोषणकर्त्यांनी नकार दिला.

आणखी वाचा:

गोव्यामध्ये ऐन सणासुदीच्या काळात बीफचा तुटवडा होऊ देणार नाही ; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन -

संबंधित बातम्या