राजभवनात ५१ वर्षीय कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 29 ऑगस्ट 2020

कोरोनाने सध्या राजभवनातही प्रवेश केला आहे. येथील ५१ वर्षीय पुरुष कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे आता तेथील कर्मचाऱ्यांना चाचणी करणे अनिर्वाय होण्याची शक्यता अधिक आहे.

पणजी: कोरोनाने सध्या राजभवनातही प्रवेश केला आहे. येथील ५१ वर्षीय पुरुष कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे आता तेथील कर्मचाऱ्यांना चाचणी करणे अनिर्वाय होण्याची शक्यता अधिक आहे. तर दुसरीकडे उत्तर गोव्यातील मागील काही आठवड्यांतील आकडेवारीवरून वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे चर्चेत आलेल्या चिंबल परिसराबाबत सध्या समाधानाची बाब पुढे आली आहे. कारण गेल्या दोन-तीन दिवसांपासून येथील रुग्णसंख्या कमी होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. 

राज्य आरोग्य संचालनालयाच्यावतीने जाहीर झालेल्या मागील चोवीस तासांतील आकडेवारीवरून चार जणांचे बळी गेल्याचे दिसून येते. त्यामुळे आत्तापर्यंत कोरोनामुळे जीव गमावलेल्यांची संख्या पावणे दोनशे (१७५) वर पोहोचली आहे. ज्या चौघांचा मृत्यू झाला आहे, त्यात वाडे-वास्को येथील ५९ वर्षीय महिला, मुरगाव येथील ८४ वर्षीय महिला, बायणा-वास्को येथील ७० वर्षी पुरूष आणि बेतोडा-फोंडा येथील ५३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. याशिवाय ३ हजार ३४३ घेतलेल्या चाचण्यांमध्ये २ हजार ४८५ निगेटिव्ह, तर ५२३ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्याशिवाय ३३५ जणांचा अहवाल येणे बाकी आहे. आयसोलेशन वॉर्डमध्ये १०८ जण उपचार घेत आहेत, तर ३६६ जण घरगुती (होम आयसोलेशन) उपचार घेत आहेत. त्याशिवाय चोवीस तासांत ४२९ जणांची प्रकृती सुधारल्याने त्यांना घरी सोडण्यात आलेले आहे. 

तिघांचीही प्रकृती स्थिर : डॉ. साळकर
दोना पावला येथील मणिपाल रुग्णालयात दाखल असलेले केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, आमदार सुदिन ढवळीकर आणि चर्चिल आलेमाव यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती येथील डॉक्टर शेखर साळकर यांनी दिली. श्री. नाईक यांना प्रति मिनिटाला एक लिटर साधा ऑक्सिजन दिला जात आहे. त्यांच्या सर्व शारीरिक मापदंड ठीक आहेत.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या