राजधानी एक्‍सप्रेस ठरतेय ‘कोरोना संसर्गजन्य’?

dainik gomantak
सोमवार, 18 मे 2020

राजधानी एक्‍सप्रेस मडगाव स्थानकावर पोहोचली असता प्रवाशांची तपासणी न करता सर्वजणांना कदंब बसमध्‍ये बसवून मडगावच्या नव्या जिल्हा हॉस्पिटलमध्ये नेऊन तपासणी करण्यात आली.

नावेली,

दिल्लीहून मडगावात शनिवारी दाखल झालेली राजधानी एक्सप्रेस कोरोना संसर्गजन्य ठरली. या रेल्वेतून आलेले १५ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच अन्‍य एक रुग्‍ण कर्नाटकमधून रेल्‍वेने आला होता. त्‍यामुळे दिल्लीतून रेल्‍वेत प्रवेश देण्‍यापूर्वी प्रवाशांची तपासणी झाली होती का? झाली असल्‍यास गोव्‍यात आल्‍यावर रुग्‍ण पॉझिटिव्‍ह कसे झाले? दिल्लीतील तपासणी सदोष होती का? असे अनेक प्रश्‍‍न उपस्‍थित होत आहेत.
दिल्ली येथे रेल्‍वे प्रवाशांची थर्मलगनद्वारे तपासणी करून रेल्वेत प्रवेश देण्यात आला. त्यानंतर कोटा (राजस्थान) वडोदरा व पनवेल येथे या रेल्‍वेने थांबा घेतला. पनवेलमध्ये दोन प्रवासी उतरले व त्यानंतर रेल्‍वे मडगाव रेल्वे स्थानकावर आली, अशी माहिती या रेल्वेमधून प्रवास केलेल्या एका प्रवाशाने दिली.

मडगावात पोहोचल्‍यावर
सर्वांची तपासणी
राजधानी एक्‍सप्रेस मडगाव स्थानकावर पोहोचली असता प्रवाशांची तपासणी न करता सर्वजणांना कदंब बसमध्‍ये बसवून मडगावच्या नव्या जिल्हा हॉस्पिटलमध्ये नेऊन तपासणी करण्यात आली. यावेळी सुरक्षित अंतर ठेवून तपासणी केली जात होती, अशी माहिती प्रवाशांनी दिली. मात्र, कोरोना बाधित रुग्‍ण सापडल्‍याने सर्व प्रवाशांत गोंधळ उडाला सर्वजण एकमेकांकडे संशयाने पाहू लागले, अशी माहिती प्रवाशांनी दिली.

प्रवासी फिरत होते अन्‍य डब्‍यातही...
ज्या रेल्वेमधून हे प्रवासी आले, त्या डब्यात काही प्रवासी एका डब्यातून दुसऱ्या डब्यात फिरत होते. त्‍यामुळे सहप्रवाशांनाही कोरोनाचा संसर्ग होण्‍याची भीती काही प्रवाशांनी व्यक्त केली. योग्‍य सावधगिरी न बाळगल्‍याने सहप्रवाशांनाही त्‍याचा फटका बसला. तब्‍बल १५ पेक्षा अधिक प्रवाशांना संसर्ग होण्‍याची भीती व्‍यक्‍त केली जात आहे. रेल्‍वे डब्‍यातील अधिकारी, कर्मचारी, तसेच कँटिनमधील कर्मचारी यांचीही तपासणी झाली होती का? याबाबतची माहिती मिळू शकली नाही. मुख्‍यमंत्र्यांनी सुमारे ३६८ जणांना क्‍वारंटाईन केल्‍याची माहिती दिली आहे.

मुख्‍यमंत्र्यांनी जबाबदारी घ्‍यावी : सरदेसाई
राज्य सरकारने रेल्वे सुरू करू नयेत. रेल्वेना गोव्यात थांबा देऊ नये, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली होती. मात्र, केंद्राने मुख्यमंत्र्यांची मागणी ऐकून घेतली नाही. तर कर्नाटक राज्याची मागणी मान्य केली यावरून मुख्यमंत्र्यांचे नेतृत्त्‍व कमकुवत असल्याचे दिसून येते, अशी टीका गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई यांनी केली.
मुख्यमंत्री म्हणतात गोव्यात एकही कोरोना बाधित रुग्ण सापडला नाही, म्हणजे हे सापडलेले सर्व रुग्ण बाहेरून आयात केलेले आहेत. जे लोक आपल्या मुळगावी जाऊ पाहत आहेत, त्यांना श्रमिक रेल्वेमधून जावू द्यावे व जे गोमंतकीय बाहेरून गोव्यात येऊ पाहत आहेत, त्यांना गोव्यात आणले पाहिजे. गोवा ग्रीन झोन म्हणून जाहीर झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी त्याचे श्रेय घेतले. त्यामुळे आता जे गोव्यात कोरोना रुग्ण वाढले आहेत, त्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, असेही सरदेसाई म्‍हणाले.

संबंधित बातम्या