युवा, महिला विकास आणि शैक्षणिक धोरणाला प्राधान्य देणारे : राजीव गांधी

Shambu Bhau Bandekar
गुरुवार, 20 ऑगस्ट 2020

आपल्या गोव्याला घटक राज्याचा दर्जा राजीव गांधी यांच्यामुळेच मिळवता आला. आपले तत्कालिन राज्यसभा खासदार (कै.) ॲड. शांताराम नाईक यांनी झिरो अवरचा हिरो बनून हा प्रश्न उपस्थित केला आणि राजीव गांधी यांनी त्याला संमती दिली.

आपल्या गोव्याला घटक राज्याचा दर्जा राजीव गांधी यांच्यामुळेच मिळवता आला. आपले तत्कालिन राज्यसभा खासदार (कै.) ॲड. शांताराम नाईक यांनी झिरो अवरचा हिरो बनून हा प्रश्न उपस्थित केला आणि राजीव गांधी यांनी त्याला संमती दिली. ‘सबका साथ, सबका विकास’ म्हणत देश व देशवासियांच्या विकासाला कारणीभूत ठरलेल्या राजीव गांधी यांची आज पुण्यतिथी त्यानिमित्त...

आपल्या देशाला लाभलेले स्व. राजीव गांधी हे सर्वात तरुण पंतप्रधान होत. वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी तत्कालिन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या दुदैर्वी हत्येमुळे अकस्मात राजीवजींकडे पंतप्रधानपद आले आणि त्यांनी त्यासंधीचे सोने केले.

भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु हे त्यांचे आजोबा त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा उल्लेख आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून केला जातो. त्यांनी देशाच्या सर्वांगीण विकासाचा पाया तर घातलाच. पण, जगामध्ये भारताची शान राखली, मान ताठ केली. त्याच या भारत देशाला २१ व्या शतकाकडे नेत आधुनिक भारताचा चौफेर विकास करीत अत्याधुनिक बनविण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

पंतप्रधानपदाबरोबरच काही काळ त्यांनी अखिल भारतीय कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सांभाळले. पक्षात आणि आपल्या मंत्रिमंडळात सुशिक्षित, सुजाण युवा पिढीला उत्तेजन दिले. ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट, मिलींद देवरा अशी काही नावे वानगीदाखल सांगता येतील. तसेच विविध राज्यांमध्ये पक्ष बळकटीसाठी आणि राज्यस्तरीय निवडणुकांमध्ये तरुण वर्गाला जास्तीत जास्त प्राधान्य दिले. ज्याप्रमाणे पं. नेहरु बाळ-गोपाळांमध्ये रमत, छोट्या मुलांचे जसे ते आवडते ‘चाचा’ होते, त्याच्याप्रमाणे राजीवजींनाही छोट्या मुलांचा लळा होता तसेच युवा पिढी आपल्या देशाचे भावी आधारस्तंभ आहेत. त्यांनी चांगले शिकले पाहिजे. शरीर सुदृढ राखले पाहिजेत याकडे त्यांचा कटाक्ष होता. जोपर्यंत देशातील प्रत्येक मुलाला प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले जात नाही, तोपर्यंत भारत खऱ्या अर्थाने प्रगती करू शकणार नाही असे सांगतानाच ज्या विद्यार्थ्याला आपला भविष्यकाळ उज्ज्वल बनवण्यासाठी ज्या ज्या प्रकारचे शिक्षण घेणे आवश्यक वाटेल त्यासाठी त्याला शिक्षणाची दारे उघडी तर असली पाहिजेतच. पण, आर्थिक बोजामुळे त्याला शिक्षणापासून वंचित करता कामा नये, यासाठी केंद्राने राज्य सरकारांनी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत असा त्यांचा आग्रह असायचा. असाच पुढाकार त्यांनी महिला वर्गाच्या विकासासाठी आणि त्यांना राजकारणात सक्रिय बनवण्यासाठी केला होता. त्या महिला आहेत म्हणून त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक देता कामा नये. त्यांना प्रत्येक क्षेत्रात पुढे आणण्यासाठी खास योजना राबवल्या गेल्या पाहिजेत तिच्या हाती केवळ पाळण्याची दोरी देऊन तिचा, तिच्या समाजाचा आणि पर्यायाने देशाचा विकास साधला जाणार नाही, तर तिला शिक्षणाची कवाडे खुली करतानाच तिला आपल्या कुटुंबाला, समाजाला, राज्याला आणि देशाच्या विकासात कसे सामील करुन घेता येईल याचा गंभीरपणे विचार केला गेला पाहिजे. राजकारण हे क्षेत्रही महिला वर्गाला काबीज करता आले पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी महिला आरक्षणाचे सुरुवाती पासून धोरण अंमलात आणण्याचे ठरवले होते. आणि याची सुरुवात त्यांनी युवावर्गासारखीच महिलांना आपल्या पक्षात आणि राजकारणात महत्वाची पदे देऊन केली होती.
राजीवजींनी युवा वर्ग, महिलावर्ग जसा सक्रिय बनवण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे देशातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आदिवासी, अल्पसंख्यांक समाज जो शेकडो वर्षे पिछाडीलाच राहिला त्या वर्गांनाही आघाडीवर आणण्यासाठी त्यांनी केंद्रात तर विविध योजना राबविल्याच. पण, प्रत्येक राज्याने त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले. तरुण वर्ग काय, महिला काय किंवा सामाजिक दृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले घटक काय या सर्वांसाठी जो पर्यंत रचनात्मक आणि सृजनात्मक कार्य होत नाही, तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालो, असे म्हणता येणार नाही आणि म्हणून ‘सबका साथ, सबका विकास’ हेच आपले धोरण असले पाहिजे असे त्यांचे म्हणणे होते.

राष्टपिता महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत झोकून देताना स्वराज्याचे सुराज्य व्हायचे असेल तर येथे रामराज्य आले पाहिजे. हे रामराज्य म्हणजे येथे गरिबातल्या गरीब माणसाला देखील दोन वेळेचे जेवण मिळाले पाहिजे, त्याच्या निवाऱ्याची, कपडालत्त्याची सोय विशेष तसदी न घेता त्याला मिळवता आली पाहिजे. म. गांधी यांचे हे स्वप्न पूरे होण्यासाठी श्रीमती इंदिरा गांधी यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या काळात वीस कलमी कार्यक्रम देशाच्या राजधानीपासून प्रत्येक राज्याच्या राजधानीपर्यंत पोचविला. त्यामुळे ‘रोटी, कपडा और मकान यही है गरीब की शान’ म्हणत राजीव गांधींनी नवीन वीस सूत्री कार्यक्रम प्रत्येक राज्याच्या प्रमुख शहरांपर्यंत पोचविला. अर्थात राज्यांचा काय किंवा देशाचा काय विकास हा हळूहळू होतच राहणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदीची अनेकदा म्हणतात, ‘विकास एक धीरे धीरे होनेवाली और लंबे समय तक चलनेवाली प्रक्रिया है।’ हे खरेच आहे. राज्य काय किंवा राष्ट्र काय ते चालवणारा कोणताही राजकीय पक्ष असो, त्यांचा मूळाधार ‘विकास’ हाच असतो. यात शंका नाही.

आपल्या देशात अनेक राज्ये अशी आहेत की, प्रचंड प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे तेथे अनेकदा ओला दुष्काळ पडतो, तर काही राज्यांमध्ये धड पिण्याचे पाणीही मिळत नाही, असा कोरडा दुष्काळ पडतो. राजीव गांधींनी याच्यावर रामबाण उपाय म्हणून ‘पर्यावरण संरक्षण कायदा’ बनविला होता. त्यांच्या कारकिर्दीत त्याचे पालन केले गेले. त्यानंतर अनेक पक्षांच अनेक सरकारे आली. पण, या कायद्याकडे कोणी हवे तितके गंभीरपणे पाहिले नाही. त्यामुळे आज पर्यावरण, प्रदुषण, कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ हे दुष्टचक्र कुठे ना कुठे आड येत असल्याचे आपण पहातो. राजीवजीनी जगाला चकित केले ते आपल्या देशात कॉम्प्युटर आणि मोबाईल क्रांती घडवून. त्यामुळे आपले देशवासीय सुखावले व ते राजीव गांधींनी आपल्या काळात वैधिक ताकत निर्माण केल्याचे अभिमानाने म्हणू लागले.

आज आपला देश सर्व शक्तीनिशी व सर्व शत्रानिशी सज्य आहे. त्यात नूकतीच ‘राफेल’ चाही भर पडली आहे. ही फार आनंदाची गोष्ट आहे. त्यामूळे पाक काय किंवा चीन काय आपल्याला वचकून आणि दचकून आहे. पण तीस-पस्तीस वर्षांपूर्वी राजीव गांधीनी सशक्तपणे सैनिक बळाचा हस्तक्षेप करून मालदीवच्या सैन्याचा विद्रोह मोडून काढला होता. तसेच श्रीलंकेमध्ये भारतीय सैन्य तैनात केले होते. आपले राष्ट्र अन्यधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण तर व्हावेत. पण, इतर देशांना आपण धान्य पुरवू शकू अशा प्रकारची हरितक्रांती आपल्या देशात घडली पाहिजे यासाठी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी आणि केंद्रिय कृषीमंत्री बाबू जगजीवन राम यांच्या कारकिर्दीत ॲ. स्वामीनारायन यांच्या मार्गदर्शनाखाली जी पावल उचलली गेली त्याला राजीव गांधींनी आपल्या कार्यकाळात देशभर पसरवून या क्रांतीला गोड फळे आणली.

आपल्या गोव्याला घटक राज्याचा दर्जा राजीव गांधी यांच्यामुळेच मिळवता आला. आपले तत्कालिन राज्यसभा खासदार (कै.) ॲड. शांताराम नाईक यांनी झिरो अवरचा हिरो बनून हा प्रश्न उपस्थित केला आणि राजीव गांधी यांनी त्याला संमती दिली. ‘सबका साथ, सबका विकास’ म्हणत देश व देशवासियांच्या विकासाला कारणीभूत ठरलेल्या राजीव गांधीजींना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.

संबंधित बातम्या