राजीव गांधी हेच आधुनिक गोमंतकाचे शिल्पकार: कामत

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 21 ऑगस्ट 2020

दिगंबर कामत म्हणाले, आज कोविड महामारीच्या संकटकाळात व्यक्तिगत अंतर पाळताना, सर्व व्यवहार तंत्रज्ञानाच्या आधारे आभासी यंत्रणे मार्फत होत आहेत. आपल्या देशात माहिती तंत्रज्ञानाचा पाया त्यांनीच घातला होता व त्यामुळेच भारत देश आज त्या क्षेत्रात स्वावलंबी झाला आहे.

पणजी: सर्वात युवा पंतप्रधान राजीव गांधी हे आधुनिक गोमंतकीचे शिल्पकार होत. गोवा, दमण व दीव संघ प्रदेशातून गोव्याला वेगळे काढत २५व्या राज्याचा दर्जा देऊन राजीव गांधी यांनी गोव्याच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना दिली, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीने कॉंग्रेस हाऊस येथे आयोजित केलेल्या राजीव गांधींच्या ७६व्या जयंती कार्यक्रमात बोलताना केले. 

ते म्हणाले, आज कोविड महामारीच्या संकटकाळात व्यक्तिगत अंतर पाळताना, सर्व व्यवहार तंत्रज्ञानाच्या आधारे आभासी यंत्रणे मार्फत होत आहेत. आपल्या देशात माहिती तंत्रज्ञानाचा पाया त्यांनीच घातला होता व त्यामुळेच भारत देश आज त्या क्षेत्रात स्वावलंबी झाला आहे. कॉंग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यानीं भारत रत्न राजीव गांधी यांच्या स्वप्नातला भारत घडविण्यासाठी कार्यरत रहावे. 

दक्षिण गोव्याचे खासदार फ्रासिंस्को सार्दिन यांनी यावेळी बोलताना राजीव गांधी यांनी युवकांसाठी खास योजना तयार केल्या होत्या याची आठवण करुन देत, मतदानाची वयोमर्यादा २१ वरुन १८ करण्याचा निर्णय त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात झाला होता असे सांगितले. राजीव गांधीनी नगरपालिका व पंचायतीना जादा अधिकार देण्याचा कायदा करुन, स्थानिक स्वराज संस्थाना मजबुत करण्याचा प्रयत्न केला असे ते म्हणाले. 

कामत व सार्दिन यांनी राजीव गांधींच्या तसबिरीला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी कॉंग्रेसचे पदाधिकारी एम के शेख, विजय पै, शंभू भाऊ बांदेकर, युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ॲड वरद म्हार्दोळकर, सेवा दलाचे शंकर किर्लपालकर व इतर उपस्थित होते. 

तत्पुर्वी बांबोळी येथील स्व. राजीव गांधीच्या पुतळ्याला अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस व आमदार लुईझिन फालेरो, खासदार फ्रांसिस्को सार्दिन, विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. त्यानंतर सर्वांनी सद्भावना दिना निमित्त शपथ घेतली. विजय पै यांनी स्वागत केले. शंभू भाऊ बांदेकर यांनी आभार मानले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या