ऑनलाईन अभंग स्पर्धेत रामचंद्र पार्सेकर प्रथम

प्रतिनिधी
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

सिध्दी पार्सेकर द्वितीय, तर वेदा मळेवाडकर तृतीय; पेडणे नवचेतना युवक संघातर्फे आयोजन

पेडणे: नवचेतना युवक संघ आयोजित प्रतिभा प्रभाकर धामसकर स्मृती पेडणे तालुका मर्यादित घेण्यात आलेल्या ऑनलाईन अभंग गायन स्पर्धेतील प्रथम पारितोषिक रामचंद्र पार्सेकर यांना प्राप्त झाले. द्वितीय पारितोषिक सिद्धी पार्सेकर, तर तृतीय पारितोषिक वेदा मळेवाडकर यांना मिळाले. तसेच हरी सावळ देसाई, स्वप्निल गावकर व प्रज्ञा परब यांना उत्तेजनार्थ बक्षिसे प्राप्त झाली. एकूण पस्तीस  स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला  होता.

बक्षीस वितरण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ संगीत शिक्षक नारायण आसोलकर हे उपस्थित होते. याप्रसंगी श्री. आसोलकर म्हणाले, की भजन ही कला आहे. ज्या कलेतून आनंद प्राप्त होतो. भजनात कला व शास्त्र यांच्याबरोबरच नाट्यालाही महत्त्व आहे. गोमंतकीय भजनी कलेला एक वेगळ्या प्रकारचा आयाम आहे. ही भजनी कला आजही ग्रामीण भागामध्ये मोठ्या आत्मीयतेने जपलेली आहे. यामुळे या पारंपरिक भजनी कलेच्या माध्यमातून कलाकारांना एक वेगळ्या प्रकारचा उत्साह प्राप्त होतो. यावेळी व्यासपीठावर खास निमंत्रित म्हणून प्रयण धामस्कर, संस्थेचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर, समाज कार्यकर्ते मनोहर तळवणेकर, महिमा नागवेकर, प्रतिक्षा साळगावकर, साहिल सावंत, प्राची च्यारी, पूजा नारोजी आदी उपस्थित होते.

विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. स्पर्धेसाठी  परीक्षक म्हणून नारायण आसोलकर यांनी काम पाहिले. हंसिका नाईक यांनी पुष्प देऊन मान्यवरांचे स्वागत केले. ओंकार गोवेकर यांनी सूत्रसंचालन केले, तर गौरेश पेडणेकर यांनी आभार मानले. हा कार्यक्रम सामाजिक अंतर राखून पार पाडण्यात आला. goa

संबंधित बातम्या