पूनम पांडे अश्लील व्हिडिओविरुद्धच्या आंदोलनामुळे रमेश तवडकर काणकोणच्या राजकारणात पुन्हा सक्रिय

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

भगतवाड्यावरील सम्राट भगत यांनी आणि त्याच्या हाकेला ओ देत जागृत काणकोणकारांसमवेत अग्रभागी माजी मंत्री रमेश तवडकर यांनी बुधवारच्या आंदोलनात भाग घेऊन काणकोणवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध  व काणकोणच्या अस्मितेवर घाला घालणाऱ्यांविरुद्ध लढा देण्यास आपण सदैव तप्तर असल्याचे दाखवून दिले. 

काणकोण :  आयुष्यात संधी एकदाच चालून येते. संधी आपल्यासाठी थांबत नाही. त्यासाठी माणसाला संधीकडे टक लावून थांबावे लागते ती किमया व कला माजी मंत्री रमेश तवडकर यांना बऱ्यापैकी साधली आहे. गेली चार वर्षे ते राजकीय काणकोणमधील राजकीय पटलावर प्रत्यक्ष नव्हते. रमेश तवडकर यांचा पिंड कुठेही अन्याय घडो त्यांचे रक्त सळसळल्याशिवाय रहात नाही. पूनम पांडे यांचा अश्लील व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला, त्याला पहिल्यांदा वाचा फोडली ती भगतवाड्यावरील सम्राट भगत यांनी आणि त्याच्या हाकेला ओ देत जागृत काणकोणकारांसमवेत अग्रभागी माजी मंत्री रमेश तवडकर यांनी बुधवारच्या आंदोलनात भाग घेऊन काणकोणवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध  व काणकोणच्या अस्मितेवर घाला घालणाऱ्यांविरुद्ध लढा देण्यास आपण सदैव तप्तर असल्याचे दाखवून दिले. 

हे होत असताना त्यांच्याविरुद्ध हल्लीच झालेल्या न्यायालयीन निवाड्याचा डागही पुसून टाकण्याची संधी त्यांना प्राप्त झाली. सत्तेत नसतानाही त्यांनी आदिवासी आयोगाचे चेअरमनपद आपल्याकडे खेचून आणले. ते भाजपच्या कोर कमिटीचे सदस्य आहेत. भाजपचे काही महत्वाचे निर्णय या कोर कमिटीच्या बैठकीत घेण्यात येतात. बुधवारी संध्याकाळी या कोर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत अश्लील व्हिडिओसंदर्भात मुख्यमंत्र्यांना माहिती दिली होती. त्यांनी त्याचवेळी कारवाईचे संकेत दिले होते हे आज उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमलेल्या जागृत काणकोणकार नागरिकांना उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांच्या उपस्थितीत सांगण्यास ते विसरले नाहीत. उटा आंदोलनात सक्रिय भाग घेऊन त्यांनी आंदोलन यशस्वी केले आहे. त्यासंदर्भात त्यांच्यावर खटलाही चालू होता. मात्र, ते डगमगले नाहीत. सामान्यांवर होणारा अन्याय त्यांना सहन होत नसल्याने पोटतिडकीने ते आंदोलनात सहभागी होतात. त्यात महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात त्यांना तीव्र चीड आहे. विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करल्यानंतर ते काणकोणच्या सक्रिय राजकारणात अग्रभागी नव्हते. मात्र, अश्लील व्हिडिओसंदर्भातील आंदोलनाने त्यांना पुन्हा सक्रिय केले.

संबंधित बातम्या