
भाऊसाहेब बांदोडकर यांच्याबाबत गावागावांतील सर्वसामान्य तसेच अशिक्षित नागरिकही आजही भरभरून बोलतात. प्रत्येकाला ते आपलेसे वाटायचे. भाऊसाहेब हे बहुजन समाजाचे मार्गदर्शक होते. त्यांनी लोकांचे दुःख पुसण्यासाठी कायद्यापलीकडे जाऊन मदत केली.
भाऊसाहेबांचे कार्य समजून घेऊन आम्ही राजकीय क्षेत्रात बदल घडवून आणणे गरजेचे आहे. गोव्यातील 40 आमदारांनीही भाऊसाहेबांची छबी समजून घ्यावी, असे आवाहन सभापती रमेश तवडकर यांनी केले.
भाऊसाहेबांच्या सुकन्या ज्योती बांदेकर लिखित ‘भाऊ आठवांचा पारिजात’ या चरित्रग्रंथांच्या प्रकाशन सोहळ्यात तवडकर प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. दोनापावला येथल इंटरनॅशनल सेंटरमध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर ज्येष्ठ समीक्षक डॉ. सोमनाथ कोमरपंत, ज्योती बांदेकर उपस्थित होत्या.
डॉ. कोमरपंत म्हणाले, भाऊसाहेब हे केवळ गोमंतकाचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे नेते होते. केवळ गोमंतकाचे नेत म्हणून त्यांना लहान करणे चुकीचे आहे. डॉ. रघुनाथ माशेलकरांनी पत्राद्वारे पुस्तकाबद्दल गौरवोद्गार काढलेच आहेत.
ज्योती बांदेकर यांनी आत्मभान ठेवून तटस्थपणे या पुस्तकाचे लिखाण केले असून ते आंतरिक भावनांनी ओथंबलेले आहे. भाऊंचे चरित्र हे भावचरित्र झाले असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अजय वैद्य यांनी केले तर माधवी बांदेकर शेट्ये यांनी आभार मानले.
भाऊंनी पुसले गोरगरिबांचे अश्रू
जनता-जनार्दनामध्ये भाऊसाहेबांना देव दिसला म्हणून कणवाळीपणाने त्यांनी गोरगरिबांचे अश्रू पुसले. राज्यात प्राथमिक शाळांचे जाळे विणले. सारा गोमंतक त्यांनी पायाला भिंगरी लावून धुंडाळला.
धनगराच्या घरची पेज आणि भाकरीचा आस्वाद घेत गोमंतकाला त्याचे सांस्कृतिक वैभव पुन्हा मिळवून दिले. नेतृत्त्व, कर्तृत्त्व, दातृत्त्व यांचा जेथे संगम होतो त्याला म्हणतात भाऊसाहेब बांदोडकर, असे गौरवोद्गार डॉ. सोमनाथ कोमरंपत यांनी काढले.
पितृऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न
भाऊंचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होते. त्यांच्याबद्दल लिहिणे कठीण आहे. हे चरित्र लिहिताना मी मुलगी म्हणून, कुटुंबातील एक सदस्य म्हणून लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी कुटुंबीयांचे प्रोत्साहन लाभले.
थोर शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी या पुस्तकाबद्दल पत्राद्वारे गौरवोद्गार काढले हा माझा गौरव आहे. पितृऋणातून मुक्त होण्याचा माझा हा एक प्रयत्न आहे, असे ज्योती बांदेकर यांनी सांगितले.
"सभापती हे एक अतिशय महत्त्वाचे पद आहे. मी या पदाचा न्याय आणि मान राखू शकेन का, असा प्रश्न सतावत होता. त्यावेळी मी स्व. भाऊसाहेब बांदोडकर आणि स्व. मनोहर पर्रीकर यांचे स्मरण करून जबाबदारी स्वीकारली. भाऊसाहेब जसे गोमंतकीयांना मार्गदर्शक वाटायचे तसेच पर्रीकर हे प्रत्येकाला पुत्रवत वाटायचे. भाऊसाहेबांवरील या चरित्रग्रंथाचे सर्वांनी आवर्जून वाचन करणे गरजेचे आहे."
- रमेश तवडकर, सभापती
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.