भाजपच्या आजी-माजी आमदारांमध्ये तू तू - मै मै

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

क्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात आपल्यावर टीका होत नाही, परंतु इतर स्थानिक कार्यक्रमात आमदार इजिदोर फर्नांडिस हे आपल्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे जर काणकोणचा विकासच झालेला दिसत नसेल तर आपण केलेल्या सुमारे ७०० कोटी रुपयांच्या कामांपैकी १० टक्के निधी तरी आपण भाजपचे आमदार म्हणून मतदारसंघात आणला का? असा सवाल माजी आमदार रमेश तवडकर यांनी केला आहे.

पणजी :  पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात आपल्यावर टीका होत नाही, परंतु इतर स्थानिक कार्यक्रमात आमदार इजिदोर फर्नांडिस हे आपल्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे जर काणकोणचा विकासच झालेला दिसत नसेल तर आपण केलेल्या सुमारे ७०० कोटी रुपयांच्या कामांपैकी १० टक्के निधी तरी आपण भाजपचे आमदार म्हणून मतदारसंघात आणला का? असा सवाल माजी आमदार रमेश तवडकर यांनी केला आहे. त्यामुळे दिवाळीच्या आदल्या दिवशी भाजपच्या आजी-माजी आमदारांचे आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दिवाळीच्याच मुहूर्तावर फटाके फुटण्यास सुरुवात झाल्याने आता कोठे किती जोरात फटाके वाजतात, हे येत्या काळात कळणार आहे. 

आमदार तवडकर यांनी आज पत्रकार परिषद घेत आमदार इजिदोर यांच्याकडून होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. गेली सहा महिन्यांपासून आपल्यावर आमदार तथा उपसभापती इजिदोर हे पक्षविरहित कार्यक्रमात सतत टीका करीत आहेत. आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढल्यानंतरच्या काळात आपल्यावर इजिदोर हे जाहीर सभेत स्तुतिस्तुमने उधळत होते. परंतु आपण पक्षात येताच त्यांनी आपल्यावर टीका करण्यास सुरुवात केली. पक्षविरहित सार्वजनिक कार्यक्रमात ते सध्या आपल्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आपल्याकडे चार खात्याचा कार्यभार होता, त्या मंत्रिपदाच्या काळात आपण केलेल्या विकासकामे खातेनिहाय चार पुस्तकांच्या माध्यमातून जनतेसमोर मांडली होती. ही पुस्तके जर इजिदोर यांनी वाचली असती, तर तवडकारांनी काणकोणसाठी काय केले हे समजून आले असते. 

आपण काणकोणचा पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यास आपण महत्त्व दिले आणि गावणे धरणाचे काम पूर्ण झाले. त्यानंतर दुर्गम असलेल्या तालुक्यांतील भूमिगत वीजवाहिन्या नेण्याचे काम पूर्ण केले. त्यावेळी २६ ट्रान्सफॉर्मर बदलण्यात आले. क्रीडा मंत्री म्हणून सहा मैदाने तयार केली, ती मैदाने खुली केली तर त्याचे श्रेय आपणास मिळेल म्हणून त्याचा शुभारंभ करण्याचे टाळले गेले. आदिवासी कल्याण खात्याच्या माध्यमातून आश्रमशाळा, सांस्कृतिक भवनाची निर्मिती केली. त्यावेळी ४६ कोटींचा निधी आणला गेला. सांस्कृतिक भवनाचेही उद्घाटन श्रेयवादात अडकले. काणकोणात रवींद्र भवनाची निर्मितीही सुरू झाली असून, ५० कोटी रुपये खर्च येणार आहे, त्याचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. आपल्या कार्यकाळात आपण ७०० कोटींची विकासकामे केली आहेत आणि त्यापैकी दहा टक्के तरी विकासकामे काणकोण मतदारसंघात इजिदोर यांनी केली आहेत का, असा सवाल करीत त्यांनी एक महिन्यांत ती दाखवावी, असे आव्हान तवडकर यांनी दिले आहे. 

खरे प्रमाणपत्रवाले उमेदवार!
आमदार तवडकर हे मुद्देसुद आपल्या काळात झालेल्या कामांचा लेखाजोखा मांडतात. आजही आमदार तवडकर यांनी इजिदोर फर्नांडिस यांनी आत्तापर्यंत केलेल्या टिकेला प्रत्युत्तर देताना केलेल्या कामांचा आरसा समोर ठेवला. भाजपमधील आजी-माजी आमदारांत सध्या चांगलीच जुंपली असल्याने दिवाळी आदीच फटाके फुटू लागले आहेत. रोजगाराचा आणि नोकऱ्यांचा प्रश्‍न आल्यानंतर तवडकर यांनी इजिदोर यांना आत्तापर्यंत काणकोणातील किती युवकांना नोकऱ्या दिल्या, त्या जाहीर कराव्यात, असे आव्हान दिले. परंतु पदवी-पदव्युत्तर (खरे प्रमाणपत्र असलेले) उमेदवार अजूनही नोकऱ्यांच्या प्रतिक्षेत आहेत. परंतु ‘खरे प्रमाणपत्र असलेले युवक'', असे शब्द वापरत तवडकरांनी इजिदोर यांना त्यांच्या मुलाच्या बनावट पदवी प्रमाणपत्राविषयी हळूच चिमटा काढला.

संबंधित बातम्या