गुरुदत्त वांतेकरची रांगोळींची चित्रे डोळ्यांचे पारणे फेडणारी

प्रतिनिधी
गुरुवार, 3 सप्टेंबर 2020

बाळाच्या आंघोळीचे चित्र आईच्या वात्सल्याची जाणीव करणारे 

वाळपई: रांगोळीचा वापर करून अनेकजण सण, उत्सवात, लग्नात, व्रतबंध संस्कार, घरप्रवेश आदी शुभ प्रसंगावेळी विविध चित्रे जमिनीवर रेखाटत असतात. महिला वर्गाचा या कामात मोठा हातखंडा असतो. महिला वर्गासोबत आता पुरूष वर्गही रांगोळीचा वापर करून चित्रे काढण्यात अग्रेसर होत आहेत. रांगोळीची कला तेवढी सोपी नसते. कारण रांगोळीचा वापर करून एखाद्या व्यक्तीचे, निसर्गाचे चित्र काढणे म्हणजे कसबीचे काम असते. असाच एक भन्नाट नवतरुण जो वाळपई येथील केशव सेवा साधना शाळेत चित्रकला शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तो म्हणजे गुरुदत्त वांतेकर. 

गुरुदत्त वांतेकर हे दरवर्षी गणेश चतुर्थी सणावेळी आपल्या घरी विविध कलाकारांची, निसर्गाची, सामाजिक योगदान देत असलेल्या लोकांची आकर्षक रांगोळीची कला करीत आले आहे. यावर्षी गुरुदत्त याने वेगळा विचार करून मनाला मोहवून टाकणारी, माया, ममता, प्रेम यांची सांगड घालणारी रांगोळी काढली आहे. 

स्‍पीड पेंटिंगमध्‍येही विशेष कौशल्‍य
गुरुदत्त वांतेकर यांनी कला क्षेत्रात गोवा युनिव्‍हर्सिटीत बॅचलरपर्यंत शिक्षण घेतले आहे. तसेच डिप्लोमा ॲडवान्स कप्युटिंग आर्ट एम.ई.टी मुंबई (Bachelore of fine art Goa University diploma in advance computing art MET Mumbai) येथे शिक्षण घेतले आहे. सध्‍या ते वाळपई येथील केशव सेवा साधना संस्थेच्या विशेष मुलांच्या शाळेत चित्रकला शिक्षक म्हणून सेवा देत आहेत. तसेच त्यांचा जलदचित्र (स्पीड पेंटिंग) काढण्यात त्यांचा मोठा हातखंडा आहे. त्यासाठी ते पणजीत कॅसिनो इव्हेंटमध्ये कला सादर करतात. इयत्ता पाचवीपासून त्यांना रांगोळी रेखाटण्याची आवड निर्माण झाली होती. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना गुरुदत्त यांनी बक्षिसे प्राप्त केली आहेत. पणजी बीग डॅडी कॅसिनोत आयोजित केलेल्या स्पर्धेत त्यांनी चांगले प्रदर्शन करून पहिल्या वीस स्पर्धकांत नाव कोरले होते. ही कला त्यांनी स्वत: अवगत केली आहे. शंभरहून अधिक अशा रांगोळीतून माणसांना जिवंत साकारणाऱ्या रांगोळी कलाकृती रेखाटल्या आहेत. स्पीड पेंटिंगचे सुमारे तीस कार्यक्रम केले आहेत. सध्‍या बाळाच्या आंघोळीची काढलेली रांगोळी आईच्या वात्सल्याची माया कलाकृतीतून दिसून येत आहे. एकदा हिंदी चित्रपट अभिनेत्री रविना टंडन यांनी आयोजित केलेल्या हणजूणे येथील कार्यक्रमात वांतेकर यांनी स्पीड पेंटिंगचा कार्यक्रम केला होता. गुरुदत्त यांची रांगोळीची कला खरोखरच थक्क करणारी आहे.

बारकावे टिपण्‍यात गुरुदत्त यांचा हातखंडा 
लहान बाळ, मुले म्हणजे देवाघरची फुले म्हटली आहेत. दररोज लहान बाळांना घरी तिची आई, आज्जी आंघोळ घालीत असते. ही आंघोळ घालताना लहान बाळाच्या चेहऱ्यावर दिसणारे हावभाव अगदी गोंडस हर्षभरीत पाहण्‍याजोगे असतात. आंघोळ करताना कधी कधी रडणे, कधी पाण्यासोबत खेळणे हे प्रकार बालपणातील बाललिलाच असतात. असेच एका लहान बाळाला आंघोळ घालतानाची एक रांगोळी यावर्षी गुरुदत्त याने आपल्या निवासी साखळी येथे काढली आहे. हे बाळाचे चित्र इंटरनेटवर त्‍यांना दिसले. त्याचाच आधार घेऊन गुरुदत्त यांनी घरी रांगोळी रेखाटली. ही रांगोळी काढण्यासाठी त्यांना आठ दिवसांचा कालावधी लागला. दररोज दोन अडीच तास यासाठी काम करीत होते.  रांगोळी म्हणजे ती पावडरयुक्त असते. व अशा रांगोळीच्या सहाय्याने बाळाला आंघोळ करतानाचे चित्र रेखाटणे खूपच आव्हानात्मक होते. कारण पावडरचा वापर करून बाळाच्या डोक्यावरून पाणी झिरपून तोंडावरून, गालावरून खाली पडणे, असा नजराणा हुबेहूब रांगोळीच्या सहाय्याने तयार करणे आवश्यक होते. तसेच अवघडीचे होते. ते शक्य काम वांतेकर यांनी आपल्या कलेतून मेहनतीतून चिकाटीतून साकारले आहे.

संबंधित बातम्या