मेळावलीच्या जंगलात जैवसंपत्तीचा दुर्मिळ अधिवास!

dainik gomantak
मंगळवार, 16 जून 2020

गुळेली पंचायत भागातील मेळावली गावात सरकारने आयआयटी हे उच्च शैक्षणिक केंद्र सुरू करण्याचे निश्चीत केले आहे, पण ही जागा अतिशय जैवसंवेदनशील असून दुर्मिळ अशा अनेक वन्य प्राण्यांनी बहरलेली आहे. काल रविवारी गुळेलीतील युवकांनी जंगल सफरीद्वारे जैवविविधतेची माहीती जाणून घेण्याची मोहीम यशस्वी केली

सत्तरीत जागरूक युवकांची शोध मोहीम, पर्यावरण संवेदनशील जागेचे संरक्षण आवश्यक वाळपई, ता. १५ (प्रतिनिधी): पावसाळ्यात वाहणाऱ्या धबधब्यांसह हिरव्यागार डोंगरांनी वेढलेल्या सत्तरी तालुक्याला निसर्गसौंदर्याची मोठी देणगीच लाभली आहे. त्याचे संरक्षण करण्याचे दायित्वही प्रत्येकाचे आहे. गुळेली - सत्तरी ग्रामपंचायत क्षेत्रातील मेळावली गावाजवळील जंगल परिसरात दुर्मिळ अशी जैवसंपत्ती आहे. गुळेली पंचायत भागातील जागरूक युवकांनी या जंगलातील जैवविविधतेची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. गुळेली पंचायत भागातील मेळावली गावात सरकारने आयआयटी हे उच्च शैक्षणिक केंद्र सुरू करण्याचे निश्चीत केले आहे, पण ही जागा अतिशय जैवसंवेदनशील असून दुर्मिळ अशा अनेक वन्य प्राण्यांनी बहरलेली आहे. काल रविवारी गुळेलीतील युवकांनी जंगल सफरीद्वारे जैवविविधतेची माहीती जाणून घेण्याची मोहीम यशस्वी केली. त्यावेळी नियोजीत आयआयटीच्या जंगल परिसरात फिरताना अनेक लहान वन्य प्राणी नजरेस आले व त्यांचे छायाचित्र युवकांनी कॅमेऱ्यात बंदिस्त केले. त्यावरून हा भाग किती जैवसंपदेने नटलेला आहे याची प्रत्यक्ष जाणीव युवकांना झाली आहे. युवकांच्या या मोहिमेमुळे या परिसरात दुर्मिळ असे खवले मांजर, श्रीलंकन फ्रोग माऊथ, रहीनोसीरोस रॅट स्नेक, इंडियन पॅराडाईस फ्लायकेचर, विविध बेडूक, गवे आदी वन्य प्राण्यांचा अधिवास समोर आला आहे. याविषयी बोलताना एक युवक शुभम शिवोलकर म्हणाले, की गुळेली पंचायत भागातील मेळावली येथे सर्व्हे क्रमांक ६७/१ या जवळपास दहा लाख चौ. मी. जागेत आयआयटी शैक्षणिक केंद्र उभारण्याचे निश्चय सरकारने केला आहे. परंतु हे सर्व करीत असताना या भागातील पर्यावरणाला हानी होणार नाही याची काळजी घेतलेली नाही. विशेष म्हणजे वन खात्यामार्फत या जंगल परिसरातील विविध प्राण्यांचा अभ्यास केला पाहिजे होता. तो न करताच सरकारने या केंद्राचा विचार केला आहे. या मोठ्या जंगल परिसरात हजारोंच्या संख्येने झाडांची कत्तल होणार आहे. या हजारो झाडांच्या कत्तलीबरोबरच येथील जैवसंपदा नष्ट होणार आहे. त्याचे दूरगामी परिणाम मानवालाच सोसावे लागणार आहेत. या जंगलात दुर्मिळ असा प्राण्यांचा अधिवास आहे. त्यांचे संरक्षण याची जबाबदारी सरकारचीच आहे. सरकारने हे शैक्षणिक संकुल आणण्याअगोदर पर्यावरणीय अभ्यासच केलेला नसल्याचे ‘माहिती अधिकार कायदा २००५’ अंतर्गत मिळविलेल्या माहितीतून समोर आले आहे. हे जंगल पर्यावरणीय संवेदनशील जंगल आहे. शशिकांत सावर्डेकर म्हणाले, हे जंगल नष्ट केले, तर या प्राण्यांचे काय होणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पश्चिम घाटात सापडणारे असे प्राणी मेळावलीच्या जंगलात सापडतात हे विशेष म्हणावे लागेल, पण या सगळ्या गोष्टींचा विचार न करताच सरकारने होऊ घातलेले हे शैक्षणिक संकुल धोक्याचे बनणार आहे. हा जैवसंपत्तीचा अधिवास असाच कायम टिकून राहण्यासाठी योग्य पाऊल उचलणे आवश्यक बनले आहे.

संबंधित बातम्या