प्रवाळांपासून बनविलेल्या दुर्मिळ हाराची चोरी

दत्ता शिरोडकर
रविवार, 2 ऑगस्ट 2020

पर्वरीतील डिफेन्स कॉलनीतील बंद घर फोडून मौल्यवान वस्तू, दागिने पळविले

पर्वरी

मेघालयातील कुटुंबात कित्येक पिढ्यांनी वापरलेला प्रवाळांपासून तयार केलेला दुर्मिळ असा हार पर्वरीतून चोरीला गेला आहे. पर्वरीच्या डिफेन्स कॉलनीत एक बंद घर फोडून चोरट्यांनी मौल्यवान, जुन्या दागिन्यांवर हात साफ केला आहे. घराचे मालक कुटुंबासह ऑस्ट्रेलियात असल्याने घर बंद होते. त्याचा फायदा घेत घराची एक खिडकी उघडून चोरट्यांनी हा डल्ला मारला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोरीला गेलेल्या ऐवजात एका शंभर वर्षे जुन्या पण मौल्यवान हाराचा समावेश आहे. हा विकला जाण्याची शक्यता असल्याने तो विकण्याचा प्रयत्न कोणी केल्यास त्याची माहिती मिळाल्यास tipoff1917@gmail.com वर द्यावी, असे आवाहन घरमालकांनी केले आहे. या हाराला भावनिक फार मोठी किंमत असल्याचे त्यांनी ऑस्ट्रेलियातून पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे.
ब्रिग्रेडियर (निवृत्त) नेवेस ब्रागांझा यांच्या मालकीचे हे घर आहे. ते सध्या कॅनबेरा ऑस्ट्रेलिया येथे आहेत. दोन्ही देशांतील विमानसेवा सुरू होण्याची वाट ते परत येण्यासाठी पाहत आहेत. ते तेथे अडकले असतानाच ही चोरी झाली आहे. दागिने ठेवण्यासाठी घरात इलेक्‍ट्रॉनिक यंत्रणा असूनही ती फोडून ही चोरी करण्यात आली आहे. ब्रागांझा यांच्या पत्नीचे सारे दागिने चोरीस गेले आहेत. चोरांनी कारची दुसरी किल्ली, ३२ इंची एलईडी टीव्ही लांबवला आहे. पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. मात्र, त्यातून चोरट्यांपर्यंत पोचण्यात काही मदत झालेली नाही.
चोरीचा गेलेला हार हा प्रवाळांपासून बनवलेला आहे. ब्रागांझा यांच्या पत्नी मेघालयातील असून तो हार त्यांना २०१३ मध्ये त्यांच्या आईचे निधन झाल्यानंतर वारसा हक्काने मिळाला होता. तेवढ्या मोठ्या आकारात प्रवाळ मिळत नसल्याने तो हार दुर्मिळ आहे असे ब्रागांझा यांचे म्हणणे आहे. अशाप्रकारच्या हारांना गोव्यालगत फारशी मागणी नसल्याने तो विकताना चोरांना अडचण येईल आणि ते विविध माध्यमांचा वापर त्यासाठी करतील असे वाटल्याने ब्रागांझा यांनी चोरट्यांनी तसा प्रयत्न केल्यास माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे. या प्रकरणाचा पोलिस उपनिरीक्षक प्रणिता मांद्रेकर तपास करीत आहेत.

संपादन- अवित बगळे

संबंधित बातम्या