नागरिकांचा हिरमोड...तीन नव्हे, फक्त एक किलो कांदे मिळणार !

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शिधापत्रिकेवर तीन किलो कांदे ३२ रुपयांनी देणार, असे मोठ्या दिमाखात घोषित केले होते. परंतु या घोषणेची पूर्ती होण्याऐवजी त्याची कशी ऐशी-तैशी होते, हे नागरी पुरवठा खात्याच्या संचालनालयाने आज दाखवून दिले.

पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शिधापत्रिकेवर तीन किलो कांदे ३२ रुपयांनी देणार, असे मोठ्या दिमाखात घोषित केले होते. परंतु या घोषणेची पूर्ती होण्याऐवजी त्याची कशी ऐशी-तैशी होते, हे नागरी पुरवठा खात्याच्या संचालनालयाने आज दाखवून दिले. पहिल्या टप्प्यात फक्त एक किलो कांदा शिधापत्रिकाधारकांना मिळणार आहे, याचा आदेश संचालक सिद्धिविनायक नाईक यांनी सायंकाळी काढला आणि कांद्याचा वांदा झाला, अशा प्रतिक्रिया जनतेकडून व्‍यक्‍त होत आहेत.

संचालक नाईक यांनी नुकतीच १ हजार ४१ टन कांद्याची खरेदी केली, त्याचे १५ नोव्हेंबरपासून वाटप होणार असल्याचेही जाहीर केले. पण, आदेश काढताना आता कांदा आणायला जायचे असेल तर दोन पिशव्या घेऊन जाव्यात काय, याचा विचार शिधापत्रिकाधारकाला करावा लागणार आहे. तीन किलो कांदा देण्याचा केलेला वादा, हा पुन्हा एकदा भाजप सरकारला अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे. 
अगोदरच काँग्रेसने कांद्याच्या दरावरून भाजप सरकारविरुद्ध राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. त्यातच नागरी पुरवठा खात्याचा आलेला एक किलो कांदा वाटपाचा आदेश पाहता, विरोधकांच्या हाती हे आयतेच कोलित मिळाले आहे. 

प्रतिकिलो अडीच रुपयेही वाढवले!

राज्य सरकारने ३२ रुपये किलोने कांदा देणार असे जाहीर केले, पण आता नागरी पुरवठा खात्याने त्याचे दर अडीच रुपयांनी वाढवून तो ३४ रुपये ५० पैशांवर नेला आहे. 
एका बाजूला वेगळीच घोषणा होते आणि दुसऱ्या बाजूला तिसऱ्या प्रकारे त्याची अंमलबजावणी होते, याचे उदाहरण द्यायचे झाले तर कांद्याच्या दरावरून देता येईल. गतवर्षी कांद्याचे दर दोनशे रुपयांवर नेले होते. तेव्हा फलोत्पादन महामंडळातर्फे कांदा विक्री झाली होती, त्यावेळी राज्य सरकारने शंभर रुपयांखाली कांद्याचे दर राहतील, अशी व्यवस्था केली होती आणि तसे ते दर राहिलेही. नाफेडकडून कांदा खरेदी केल्याचे सांगण्यात आले असल्याने राज्यात तो त्वरित मुबलक प्रमाणात येणे आवश्‍यक होते. 

संबंधित बातम्या