थिवीतील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना निलंबित केल्याने गैरसोय

प्रतिनिधी
रविवार, 16 ऑगस्ट 2020

थिवी येथील एका स्वस्त धान्य दुकानाचा परवाना निलंबित केल्याने सध्या स्थानिक नागरिकांची गैरसोय झाली आहे.

म्हापसा: थिवी येथील एका स्वस्त धान्य दुकानाचा परवाना निलंबित केल्याने सध्या स्थानिक नागरिकांची गैरसोय झाली आहे. नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याने १ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी थिवी येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक ५७ बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्या दुकानाच्या मालकाने पीओएस मशीनचा वापर करण्यास नकार दिल्याने खात्याने त्या दुकानाचा परवाना निलंबित केला असून, जनतेच्या तक्रारीनुसार खात्याच्यावतीने या दुकानासंदर्भातील चौकशी सध्या सुरू आहे.

गणेशचतुर्थी उत्सव जवळ आल्याचे रेशनकार्डधारकांनी नमूद करून, या स्वस्त धान्य दुकानासंदर्भात पर्यायी व्यवस्थेबाबत खात्याने त्या दुकानाच्या ठिकाणी कोणतीही सूचना केली नसल्याचा दावा केला असून, त्याबाबत नाराजीही व्यक्त केली आहे. ते दुकान अपर्णा कांबळी यांच्या मालकीचे असून, त्यांच्याविरोधात कित्येक तक्रारी खात्याकडे आल्या होत्या. सध्या ते दुकान बंद असल्याने स्थानिक नागरिकांना त्या दुकानातून अथवा अन्य माध्यमातून धान्य मिळणे अशक्य झाले आहे, असा स्थानिकांचा दावा आहे.

यासंदर्भात विचारणा केली असता नागरी पुरवठा खात्याचे निरीक्षक राजेश आर्लेकर यांनी स्पष्ट केले आहे, की खात्याने घेतलेल्या या निर्णयाबाबत थिवी पंचायतीला कळवले आहे. मात्र, सध्या ते दुकान नेहमीच बंद असल्याने त्याबाबत काहीच समजत नाही, असे स्थानिकाचे म्हणणे आहे. स्थानिक पंचायतीनेही लोकांना त्याबाबत काहीच कळवले नाही, असा त्यांचा दावा आहे.

ग्राहकांच्या सोयीसाठी त्यासंदर्भात त्या दुकानावर सूचना लावणे अत्यावश्यक आहे; तसेच, त्याबाबत स्थानिक ग्राहकांना अन्य कोणताही पर्याय उपलब्ध आहे, याविषयीहीसुद्धा खात्याने कळवणे गरजेचे आहे, असेही स्थानिकांचे म्हणणे आहे. 
 
दरम्यान, यासंदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, थिवी येथील ५७ क्रमांकाच्या दुकानातील ग्राहकांनी धान्याचा साठा मिळवण्यासाठी १ ऑगस्टपासून आगामी तीन महिन्यांसाठी कानसा थिवी येथील दुकान क्रमांक ६८ मध्ये संपर्क साधावा, असे खात्याने कळवले आहे. 

संबंधित बातम्या