गोमंतकीयांनो पावसाळी रानमेवा ‘रोयण अळंबी’ खाण्यापूर्वी हे नक्की वाचा?

गोमंतकीयांनो पावसाळी रानमेवा ‘रोयण अळंबी’ खाण्यापूर्वी हे नक्की वाचा?
Alambi Mushroom.jpg

या हिरव्या, विशेषतः सायलो किंवा सागवानाच्या जाडजूड खरबरीत पानांत गुंडाळलेल्या खास गोमंतकीय पावसाळी रानमेव्याला म्हणतात. ‘अळम्‍याचे पुडे’. ही खाण्यालायक भूछत्रे, इंग्रजीत ज्यांना सरसकट ‘मशरूम्स’ म्हटले जाते. त्यांना गोव्यात ‘अळमी’, मराठीत ‘अळंबी’ अथवा अळिंबी म्हटले जाते. उच्चारभेदानुसार दक्षिण गोव्यात ‘वोवमी’ असाही ‘अळम्या’चा उच्चार होतो. रानमेवा कुणाला प्रिय नाही? पावसाळा सुरू होताच पट्टीच्या गोंयकाराच्या जिभेला पाणी सुटू लागते. (Read this before eating  Mushroom named 'Royan Alambi')

आधी मोहीम सुरू होते कोवळ्या, कोवळ्या, रानभाज्या शोधण्याची. लुतीची भाजी, धवीभाजी, काट्याची भाजी, शिरमुंडाळेची भाजी, टाकळा अथवा स्थानिक ‘तायखिळ्या’ची भाजी, कमी खाज आणणारे ‘आळू’. एवढेच नव्हे, तर बारीक शोधून काजूच्या बागायतीत सापडणारी ‘घोडका’ म्हणजे अंकुर आलेल्या काजूबिया या मोहिमांत उत्साहाने गोळा केल्या जातात. हे सर्व काजूबिया या मोहिमांत उत्साहाने गोळा केल्या जातात. हे सर्व पारंपरिक ज्ञानावर आधारित असते. घरातील जाणकार वा वयोवृद्ध  माहितगार कुटुंबियांनी शिकवल्याशिवाय आज ह्यातील काहीच 15 वर्षांवरील कुणाला जमणे शक्य नाही.

रानभाज्या व्यवस्‍थित धुंडाळून शोधून काढून गोळा करण्यामागे आपला 50-60 हजार वर्षांमागील अन्न शोधण्याची इतिहासपूर्व परंपरा आहे. आपल्या या कृषीपूर्वकालीन आदिम कालखंडाला-हंटर-फूड गॅदरर’ म्हणजे ‘शिकारी’, मच्छीमारी, वनस्पतीजन्य अन्न गोळा करण्याचा कालखंड म्हटले जाते. गोव्यात आदिमानवांच्या पाऊलखुणा ६० हजार वर्षांपूर्वी दिसतात. हे सर्व खाण्यासारख्या वनस्पती, नेचे, कंदमुळे, भूछत्रे धुंडाळत फिरले. विषबाधा होऊन सहस्त्रावधी मेले. ते कसे व काय खाऊन मेले, ते पाहिल्यावर इतरांनी असा विषारी रानमेवा टाकून दिला व फक्त बिनविषारी रानमेव्याचे ज्ञान संपादन केले.

आज वनस्पती जगतात 3 लाख प्रजातींची जागतिक नोंद आहे. पण फक्त 5000 वनस्पतींचा उपयोगच उपरोल्लेखित कालखंडात मानवाने शोधून काढला. ही परंपरा शेतीचा शोध लागेपर्यंत चालू होती. गेल्या पाचहजार वर्षांत किंवा लिखित इतिहासात कुणीही नवी खाण्यालायक वनस्पती वा भूछत्रे, अळिंबींचा शोध लावल्याची माहिती नाही. कार्ल लिनीयॉसच्या प्रजातींच्या शास्त्रीय वर्गीकरण पद्धतीच्या शोधानंतर सर्वच प्रजातींना नवी शास्त्रीय नावे मिळाली. पण, ह्या एकूण एक वनस्पती परंपरेने स्थानिकांना ठाऊक होत्या. भूछत्रांचे तसेच आहे. अळंबी खाणे म्हणजे वनस्पती नव्हे, तर बुरशी-फंगस खाणे. ती शाकाहारीही नव्हे व मांसाहारी पदार्थातही सामावणारी नव्हे. अळंबी बुरशीच्या ज्ञात एक लाख प्रजातींमध्ये सापडतात. अजून बुरशीच्या 14 लाख ते 59 लाख जातींचा शोध अपेक्षित आहे. या एक लाख ज्ञात प्रजातींपैकी अळंबीच्या 14 हजार प्रजाती आहेत. या 14 हजार प्रजातींमध्ये पाच हजार वर्षांपूर्वी 200 देशात सप्तखंडात परंपरेने खाण्यालायक म्हणून ज्ञात असलेल्या २००० जाती सामावतात. या 2000 जातींपैकी आपल्या देशात आजवर 400 जातींची नोंद झालेली आहे. त्यातील गुजरात ते तामिळनाडू या 1600 किलोमीटर्स लांब पसरलेल्या पश्‍चिम घाट परिसरात 100 खाण्यालायक रानटी अळब्यांच्या जाती सापडतात. या जातीतील सर्वांत जास्त लोकप्रिय जात आहे. वारूळ, भोंबाडा, वाल्‍मिक अथवा रोयणीवर उगवून येणारी पुरुषलिंगाकृती भुरकट, पांढरी ‘रोयण अळंबी’ या कुलाचे शास्‍त्रीय नाव ‘टर्मिटोमायसीज’. टर्मिटो हा शब्द ‘टर्मायटस’अथवा ‘वाळवी’ या कीटकावरून घेतला आहे. ‘मायसीज’ म्हणजे ‘बुरशी’, ‘टर्मिटोमायसीज’ याचा अर्थ ‘वाळवी’ उत्पादीत बुरशी. या बुरशी वा अळंबीवर मी 1986 पासून विस्तृत संशोधन केलेले आहे. 

मी या रोयण ‘अळम्या’वर पीएचडीचे सखोल संशोधन करून गोवा विद्यापीठातून डॉक्टरेट-पी.एच.डी. पदवी मिळवलेली. राष्ट्रीय विज्ञान शिष्यवृत्तीधारक डॉ. रोझी अग्‍नेस डिसोझा- टर्मिटोमायसीज संशोधनक्षेत्रात जगात आघाडीवर असलेल्या 10 महत्त्वाच्या संशोधक गटात आमचा समावेश होता. आमचे संशोधन जगन्मान्य झालेले आहे. त्या संशोधनातील काही निष्कर्षांचा ‘रोयण अळमी’ उष्टावण्यापूर्वी म्हणजे शिजवून चाखण्यापूर्वी विचार व्हावा. कारण, ज्यांची कृत्रिम लागवड वा उत्पादन करणे मुळीच शक्य नाही, अशी ही ‘रोयण अळमी’ वाट्टेल तशी ओरबाडून विकली जात आहेत. त्यामुळे त्यांच्या गोव्यातील वैविध्यावर गंभीर परिणाम झाल्याचे आम्ही 1986 च्या हंगामापासून पाहिलेले आहे. कितीही लोकशिक्षण, प्रबोधनाचा समजावण्याचा प्रयत्न केला, तरी लोक हा ‘रानमेवा’ गोळा करून विकणारच व ग्राहक जीव्हालौट्यामुळे वाट्टेल ती किंमत देऊन ती विकत घेणारच. विकणारे व खरीदणारे दोघांनाही ही ‘रोयण अळमी’ कशी उगवतात त्यांचे ज्ञान नाही. या अळंबीचे नैसर्गिक जीवनचक्र समजावून घेण्याचीही इच्छा नाही. बेडके पकडून खाल्ली, तर डास वगैरे कीटकांची पैदास वाढेल, रोगराई पसरेल म्हणून बेडके पकडण्यावर घातलेली बंदी, पावसाळ्यात चविष्ठ व लुसलुशीत ‘जंपींग चिकन’ खाणाऱ्या बेडकांच्या तंगड्या खाणाऱ्या गोंयकारांनी स्वीकारली, अशी कडक बंदी असल्याने गाभोळीची म्हणजे अंडी टाकणारी सुंगटे व मासे पावसाळ्यात पकडायला कोणी जात नाही. अशी बंदी असल्याने आज ऑलिव्हर रिडली कासवाची अंडी चोरून विकली जात नाहीत. तसे पूर्वी दिसणारी गोड्या पाण्यातील कासवे आज मासळी बाजारात दिसत नाहीत. पूर्वी मगरींची अंडीसुध्दा गोळा करून लोक खायचे, विकायचे. एवढेच नव्हे डॉल्फीनसारखे सस्तन, मानवासारखा मेंदू असलेले हुषार, मनमिळावू, चटकन माणसाळवता येणारे जलचर पणजी, मडगाव, वास्को मासळी बाजारात ‘मासे’ म्हणून विकले जायचे. 

1980  पासून मी व पर्यावरणप्रेमी पर्सिवल नोरोन्हांनी प्रयत्न करून वन व मच्‍छिमारी खात्याकडून बेडके पकडण्यावर व डॉल्फीन पकडण्यावर बंदी घालण्याचा आदेश मिळवला. त्यामुळे कोट्यवधी बेडके व हजारो डॉल्फीन  गोंयकारांच्या तावडीतून वाचले. 1986 ते 1990 या दरम्यान माझ्या पीएचडीच्या संशोधनात असे आढळून आले की, रानांतून, वारूळविपूल गवताळ भागातून बाजारात आणून विकल्या जाणाऱ्या ‘रोयण अळम्यां’च्या जातींचे वैविध्य कमी होत चालले आहे. ही माहिती तत्कालीन गोवा वनमहासंचालक डॉ. किशोर रावना दिली. ते म्हणाले, खरे तर सरकारी राखीव जंगलक्षेत्रात परवानगीशिवाय ‘रोयण अळमी’ वगैरे तोडायला आपोआप बंदी असायला पाहिजे. तरीही नजर चुकवून हा एवढा व्यापार कसा चालतो, आपल्याला कल्पना नाही. यात मोठमोठी राजकीय धेंडे घुसलेली असावीत.

जंगल परिसरातील लोकांनी फक्त आपल्या स्वतःच्या खाण्याकरता थोडी ‘रोयण अळंबी’ काढून खाण्यास काही हरकत नाही. पण, सगळी अळंबी ओरबाडून ती कुणाला वनक्षेत्राबाहेर विकून व्यापार करता येणार नाही. 1991  सालापासून वनखात्याने दरवर्षी आदेश जारी करून व पत्रके प्रसिद्ध करून सरकारी वनक्षेत्रातील ‘रोयण अळमी’ गोळा करण्यावर बंदी घातली. रिचर्ड डिसोझा हे वनमहासंचालक असेपर्यंत ही बंदी होती. साधारण 2002 वर्षांपासून वनखात्याने आदेश काढणे बंद केले. याचे कारण खात्यावर प्रचंड राजकीय दडपण येऊ लागले होते. लोकांच्या हाती पावसाळ्यात हा रानमेवा विकून थोडा पैसा खुळखुळत असेल, तर वनखात्याने सोयीस्करपणे दुर्लक्ष केलेले बरे, अशी राजकारण्यांची भूमिका होती. आश्‍चर्य म्हणजे बेडके, मासेमारीबंदी यासंबंधी अशी भूमिका कुणी घेतलेली नव्हती. 2000  नंतर आमच्या सर्वेक्षणात दिसून आले की, गोव्यात पूर्वी ज्या 14 जाती गोळा केल्या जात, त्यांच्या संख्येत घट होऊन फक्त 7  जाती दिसू लागल्या. 1991 साली टर्मिटोमायसीज गोमंतकीएन्सीज ही संपूर्ण जगातील नवीन ‘रोयण अळम्या’ची जात मला जुन्या गोव्याजवळ तिसवाडी बेटात सापडली.

संपूर्ण भारतात फक्त गोव्यातच अत्यंत दुर्मिळ ‘ब्लबोरायझम’ ही चिनी शास्त्रज्ञांनी शोधलेली जात आम्हाला तिसवाडी व डिचोली तालुक्यात फक्त दोन ठिकाणी सापडली. या जातीवरचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. रोयण अळम्यांवरील आमच्या स्थानिक, राष्ट्रीय व जागतिक महत्त्वाच्या संशोधनातील निष्कर्ष पुढील लेखात येतील. कारण, या अळम्यांचा या आठवड्यापासून सुरू झालेला हंगाम  सप्टेंबर महिन्यात संपेल. 1986 ते 2019 या कालखंडात मला ‘रोयण अळम्यां’च्या विक्रमी 35 जाती गोव्यात सापडल्या. त्यातील 11  जाती फारच दुर्मिळ आहेत. फार कष्टपूर्वक या अळंब्याची बुरशी वाळवी वारूळामध्ये वाढवते. जी अळंबी वारूळावर उगवतात ती सर्व वाळवीला आहारासाठी व बियाण्यांसाठी आवश्‍यक असतात. आता हेच बघा 2019 च्या पावसाळ्यात पणजीत 25 ‘रोयण अळमी’ 500 रुपयांना विकली गेली. म्हणजे चक्क एका अळंबीला लोक 20 रुपये द्यायला तयार आहेत. म्हणजे ‘रोयण अळम्यां’चा आजचा भाव आहे 15 हजार रुपये प्रतिकिलो. यांसंबंधी आणखी माहिती पुढील लेखात येईल.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com