हागणदारीमुक्त गोव्याची मुख्यमंत्र्यांकडून पोलखोल

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दक्षता सप्ताहाच्या उद्‍घाटनावेळी काही गावात अद्याप घरांत शौचालयाची सुविधा नसल्याची कबुली दिली आहे.

पणजी :  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दक्षता सप्ताहाच्या उद्‍घाटनावेळी काही गावात अद्याप घरांत शौचालयाची सुविधा नसल्याची कबुली दिली आहे. हागणदारीमुक्त गोव्याची मुख्यमंत्र्यांनी पोलखोल केली, ते बरे झाले अशी खोचक प्रतिक्रीया कॉग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

ते म्हणाले, मुख्यमंत्री आपल्या नेतृत्वाखालील सरकारच्या नाकर्तेपणाचे खापर केवळ सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. दक्षता जागृती सप्ताहाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी राज्यात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराबद्दल एक शब्द काढू नये हे धक्कादायक आहे. लोकायुक्तांनी भाजप सरकारच्या कारकिर्दीतील मुख्यमंत्र्यांसहित इतर मंत्र्यांचा सहभाग असलेल्या  भ्रष्टाचार प्रकरणांची दक्षता खाते तसेच सीबीआय मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत त्याबद्दल बोलण्याचे धाडस मुख्यमंत्र्यांना झाले नाही. 

भाजप सरकारला उतरती कळा लागल्याचे आता सरकारी अधिकारी व कर्मचारी यांना कळले आहे. त्यामुळेच सरकारच्या काही कृत्यांमध्ये सहभागी होण्यास ज्या अधिकाऱ्यांनी नकार दिला त्यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न वैफल्यग्रस्त झालेल्या मुख्यमंत्र्यानी केल्याचे नमूद करून ते म्हणाले, आपला सर्व खात्यातील शिपाई व कारकुनांशी कनेक्शन असल्याचे मुख्यमंत्र्यानी काल उघडपणे कबुल केले आहे. त्यामुळे डिचोली, कोलवा येथील गैरव्यवहार प्रकरणांवरही मुख्यमंत्र्यांनीच प्रकाश टाकावा. काॅंग्रेस पक्ष २०२२ मध्ये सत्तेत आल्यानंतर सर्व भ्रष्टाचारी प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करणार असून, राज्यातून भ्रष्टाचाराचा संपुर्ण नायनाट करण्याचे काॅंग्रेसचे धोरण असेल. भ्रष्टाचार मुक्त गोवा हा काॅंग्रेसचा वचननामा असेल.

संबंधित बातम्या