थिएटर आर्टच्या स्थलांतरास सरकारकडून मान्यता

विलास ओहाळ
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

कला अकादमीच्या थिएटर आर्ट या महाविद्यालयाचे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाटो पुलाजवळील जुन्या इमारतीत स्थलांतर करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

पणजी

कला अकादमीच्या थिएटर आर्ट या महाविद्यालयाचे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाटो पुलाजवळील जुन्या इमारतीत स्थलांतर करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. परंतु महाविद्यालयास १ सप्टेंबरपासून जरी वर्ग सुरू करायचे झाल्यास त्यापूर्वी या इमारतीच्या डागडुजीचे काम करणे गरजचे आहे. ते काम लवकरच हाती घेतले जाईल, अशी माहिती प्राचार्य रामराव वाघ यांनी दिली.
प्राचार्य वाघ म्हणाले की, कला अकादमीतून महाविद्यालयातर्फे वेबिनारद्वारे मान्यवर कलाकारांचे मार्गदर्शन सुरू केले होते. त्या मार्गदर्शन वर्गांना इच्छुकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. हे वर्ग सर्वांसाठी मोफत होते. राज्य सरकारने या महाविद्यालयासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याची इमारत दिली आहे. त्यानुसार या महाविद्यालयाचे काम त्या इमारतीतून हाताळले जाणार आहे. इमारतीत जरी वर्ग घ्यावयाचे झाल्यास नियमानुसार दोन मीटर अंतर जरी ठेवून विद्यार्थ्यांना बसवायचे झाल्यास
एखाद्या वर्गात १५ विद्यार्थी बसू शकतात. त्यानुसार वर्गाची रचना करावी लागेल, परंतु वर्गाची निर्मिती करण्यापूर्वी त्याची डागडुजी करावी लागणार आहे. कारण काही ठिकाणी पावसाचे पाणी गळत असल्याचे दिसून आले आहे. विद्यापिठानेही १ सप्टेंबरपासून ऑनलाईन वर्ग सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे महाविद्यालयालाही वर्ग सुरू करावे लागतील, असे प्राचार्य वाघ म्हणाले.

goa goa

संबंधित बातम्या