‘त्या’ निराधार महिलेचे घर घेतेय आकार

वार्ताहर
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

दानशूरांच्या मदतीतून जमिनदोस्त झालेल्या घराची पुनर्बांधणी सुरू

तांबडीसुर्ला: बोळकर्णे - साकोर्डा येथील श्रीमती लक्ष्मी बाबनी उसापकर या निराधार महिलेच्या घरावर ४ ऑगस्ट रोजी दुपारी अडीजच्या सुमारास भलेमोठे झाड कोसळून संपूर्ण घर जमिनदोस्त झाले होते. भर पावसाळ्यात बेघर होण्याचा दुर्दैवी प्रसंग त्यांच्यावर ओढवला होता.

या दुर्घटनेत घराची मोठ्या प्रमाणात मोडतोड होऊन घराचे नुकसान झाले होते. त्यावेळी अधुनमधून वादळी वारे प्रवाहित होत होते. वादळी वाऱ्‍यासह संततधार पाऊस कोसळत असल्याने मोठा वृक्ष मुळासकट घरावर उन्मळून पडून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या दुर्घाटनेप्रसंगी महिला घरात नसल्याने ती सुखरूप बचावली होती. ती घरात एकटीच राहत होती. गावातील लोकांनी तिला आश्रय देऊन धीर दिला होता. अजूनही ती शेजारच्या घरात आश्रय घेत आहे. जमिनदोस्त झालेल्या घराची पुनबांधणी करण्यासाठी आपली आर्थिक स्थिती नसल्याने कोणीतरी आपल्याला घर बांधकामासाठी मदत करावी, असे आवाहन तिने त्यावेळी केले होते. त्यानुसार वादळाच्या तडाख्यात जमिनदोस्त झालेल्या घराचे पुनबांधणीचे बांधकाम शेवटच्या टप्प्यात पोहचले आहे.

सावर्डे मतदारसंघाचे आमदार तथा बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांनी बेघर झालेल्या गरीब महिलेच्या घराचे पुनर्बांधकाम करण्यासाठी सुमारे १ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. सरपंच जितेंद्र नाईक यांनी साकोर्डा पंचायत निधीतून ५ हजार रुपयांचा धनादेश दुघर्टनाग्रस्ताकडे सुपूर्द केला. घराच्या छप्परासाठी लागणारी सर्वप्रकारच्या सामग्रीसाठी सुदीप देसाई व इतर दानशूर व्यक्ती मदत करणार असल्याचे लक्ष्मी उसापकर यांनी सांगितले. 

घराची पुनर्बांधणी करण्यासाठी ज्यांनी माणुसकीच्या भावनेने गंभीरप्रसंगी सहकार्य केले, त्या सर्वांचे लक्ष्मी उसापकर यांनी मनापासून आभार मानले आहेत.

मानधनापासून वंचित...
सरकार गरीब लोकांसाठी वेगवेगळ्या कल्याणकारी योजना राबवित आहे. दयानंद सामाजिक सुरक्षा योजना व गृह आधार या दोन योजना सरकारतर्फे अत्यंत प्रभाविपणे राबविण्यात येत आहेत. या दोन्ही सरकारी योजनांचा फायदा गरीब व कष्टकरी लोकांऐवजी मध्यमवर्गीय लोक अधिक प्रमाणात घेत आहेत. निराधार श्रीमती लक्ष्मी बाबनी उसापकर यां नाअजूनपर्यंत सरकारच्या कोणत्याही योजनांचे मानधन मिळत नसल्याने त्या शासकीय मानधनापासून वंचित राहिल्या आहेत.

घराला वीज जोडणीची गरज
साकोर्डा पंचायत क्षेत्रात अनेक घरे आहेत, ज्यांची काही घरे पंचायत कार्यालयात घरपट्टीसाठी कायदेशीर नोंदणी झालेली नाही. तरीसुद्धा त्यांच्या घराला वीज जोडणीचे सर्व सोपस्कार पूर्ण करून वीजपुरवठा मिळवला आहे. साकोर्डा परिसरातील सर्व घरांत शंभर टक्के विजेची सेवा पोहचली असताना लक्ष्मी बाबनी उसापकर ही महिला अजूनही दिव्याच्या मिणमिणत्या प्रकाशात गुजराण करत आहे. याप्रसंगी तिने आपल्याला विजेची सुविधा नव्या घरात उपलब्ध करून मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या