काणकोणातील पर्यटन व्यवसायावर टांगती तलवार

Red Signal to canacona tourism business
Red Signal to canacona tourism business

काणकोण: काणकोणमधील सागरी कासवांच्या आगमनासाठी प्रसिद्ध असलेल्या आगोंद व गालजीबाग-तळपण किनाऱ्यावरील पर्यटन व्यवसायावर पुन्हा राष्ट्रीय हरित लवादाने टांगती तलवार निर्माण केली आहे. गोवा किनारी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणाने गालजीबाग-तळपण, आगोंदसह पेडणे तालुक्यातील मांद्रे व मोरजी किनाऱ्यावरील हंगामी व कायमस्वरूपी पर्यटन आस्थापने मोडून काढण्याच्या आदेशावर शिक्कामोर्तब केले आहे. आता फक्त जिल्हाधिकाऱ्यांनी या आदेशाची कार्यवाही करणे बाकी आहे.

गोवा किनारी व्यवस्थापन प्राधिकरणाने प्रत्यक्ष पाहणी करून आगोंद किनाऱ्यावर १७० व गालजीबाग-तळपण किनाऱ्यावर सहा बांधकामे अनधिकृत असल्याचे सापडले होते. यापूर्वीच गालजीबाग किनाऱ्यावर माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या कारकीर्दीत वन खात्याने १ लाख ५२ हजार चौरस मीटर जमीन सागरी कासव प्रकल्पासाठी संपादित केली आहे. जागा संपादन करून सुमारे सात वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र, या ठिकाणी लाकडी कुंपण उभारण्याशिवाय वन खात्याने या जमिनीचा काहीच विकास केला नाही.

आगोंद किनाऱ्यावर काही ठराविक ठिकाणीच कासवांचे आगमन
आगोंद किनाऱ्यावर काही ठराविक ठिकाणीच कासवांचे आगमन होत आहे. त्यासाठी तीन किलोमीटर लांबीच्या या किनाऱ्याला वेठीस धरू नये. त्यामुळे येथील पर्यटन व्यावसायिकांची रोजीरोटी जाईल हा दावा करून यापूर्वी आगोंद पंचायतीच्या ग्रामसभेत ठराव संमत करण्यात आला होता. फक्त सागरी कासवांचे आगमन ज्या भागात होते, तो भाग सोडून अन्य किनारी क्षेत्रात पर्यटन व्यवसायाला परवानगी देण्याची मागणी या ठरावाद्वारे करण्यात आली होती, असे सरपंच प्रमोद फळदेसाई यांनी सांगितले. हा किनारा जागतीक पर्यटन नकाशावर आहे. या किनाऱ्यावर पर्यटन व्यवसायाला बंदी आल्यास पंचायतीच्या महसुलात घट होणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

स्वतंत्र क्षेत्रीय वनाधिकाऱ्याची नेमणूक
काणकोण तालुक्यातील गालजीबाग-तळपण व आगोंद किनाऱ्यावरील सागरी कासव प्रकल्पाची व्यवस्था पाहण्यासाठी वन खात्याने स्वतंत्र क्षेत्रीय वनाधिकारी म्हणून अनंत वेळीप यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, सध्या ते वन खात्याच्या वन्यप्राणी विभागाच्या उपवनपाल कार्यालयातून पदभार सांभाळत आहेत. त्यांच्याशी संपर्क साधला असता आगोंद व गालजीबाग- तळपण सागरी कासव आगमन क्षेत्रात  किनारी पर्यटनाला थारा देण्यात येत नाही. त्याचप्रमाणे सनबेड, हायमास्ट दिवे तसेच पथदिवे बसविण्यावर या क्षेत्रात बंदी आहे. १९ फेब्रुवारी १९९१ नंतरच्या बांधकामांना या क्षेत्रात थारा नाही. हे निर्बंध कटाक्षाने पाळण्यात येत आहेत. जे पर्यटन व्यावसायिक या निर्बंधाचे उल्लंघन करतात, त्यांच्यावर कायद्याअंतर्गत कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com