प्रस्तावित वनक्षेत्र घटवा

अवित बगळे
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

राष्ट्रीय बैठकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची मागणी

पणजी

राज्यात वनीकरणासाठी जमीनच शिल्लक नसल्याने शहरी वनीकरणाचे क्षेत्र प्रस्तावित क्षेत्र १० हेक्टरवरून ४ -५ हेक्टरवर आणावे अशी मागणी वनमंत्री या नात्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. केंद्रीय वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी बोलावलेल्या देशभरातील वनमंत्र्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी आज ही मागणी केली. म्हादई नदीचा समावेश नद्या पुनरुज्जीवन योजनेत करावा अशीही मागणी त्यांनी केली.
वन व वन्यजीव संरक्षण व संवर्धन संबंधित नवीन योजना या विषयावर ही बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री म्हणाले, या वर्षी किमान ५० शाळांत बगीचे केले जातील. केंद्रीय वन मंत्रालयाला विविध वनउत्पादनाच्या वाहतुकीसाठी राष्ट्रीय ट्रांझिट पास प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या संपूर्ण सहकार्य असेल.“एक राष्ट्र एक पास” या उद्देशाने योजना आखली आहे तिचा फायदा सर्वानाच होणार आहे. यावेळी जावडेकर याना पुढील वर्षी जानेवारीत होणाऱ्या पक्षी महोत्सवाचे निमंत्रण मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
मुख्यमंत्र्यांनी गोव्याच्या वनविभागाने वन खाद्य महोत्सव, वन मजा दिन, वार्षिक आंतरराष्ट्रीय पक्षी महोत्सव, कासव महोत्सव इत्यादीसारख्या संवर्धनास प्रोत्साहन देण्यासाठी अनोखे व अभिनव उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी संवर्धनाच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला. राज्याला ६८ टक्के हरीत क्षेत्र असल्याने त्याचा वापर लिडार सर्वेक्षणावेळी केला जावा असेही मुख्‍यमंत्र्यांनी सुचवले.

संबंधित बातम्या