किसान क्रेडिट कार्डसाठी १० हजार शेतकऱ्यांची नोंदणी

Uttam Gaonkar
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डद्वारे सहजरित्या पीक कर्ज मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या योजनेअंतर्गत गोव्यात एकूण १०,१०० शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली असून यात पशुपालन आणि मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांचाही समावेश आहे.

सासष्टी

किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थीं शेतकऱ्यांना घेण्यास मिळावा यासाठी तरतूद करण्यात आली असून गोव्यातील सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ व्हावा यासाठी कृषी खात्यातर्फे जागृती करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी केपे व पेडणे तालुक्यातील सर्वाधिक शेतकरी पुढे आलेले आहेत, अशी माहिती कृषी खात्याचे संचालक नेव्हील आफान्सो यांनी दिली.
गोव्यात ३३ हजारच्या आसपास शेतकऱ्यांची कृषी खात्यात नोंदणी करण्यात आली असून किसान क्रेडिट कार्डद्वारे मिळणाऱ्या या योजनेचा लाभ पूर्वी काही शेतकरीच घेत होते. किसान क्रेडिट कार्ड तयार करण्यासाठी बँकांकडून अनेक अटी लादल्या जात होत्या, पण आता हे कार्ड बनवून देण्यासाठी कृषी अधिकारी व बॅंक अधिकारी गावगावांत जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जागृती करीत आहेत. किसान सन्मान निधीच्या लाभार्थी शेतकऱ्यांना मोदी सरकारद्वारे किसान क्रेडिट कार्ड देण्यात येत आहे. त्यामुळे गोव्यातील किसान सन्मान निधीच्या लाभार्थ्यांना पीक कर्ज सहजरित्या मिळणार आहे, अशी माहिती कृषी खात्याचे संचालक नेव्हील आफान्सो यांनी दिली.
किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे जमिनीचा सातबाराचा उतारा असणे महत्वाचे असून कुळांनी जमीन मालकांकडून ना हरकत दाखल मिळविल्यास त्यांनाही या योजनेचा लाभ घेण्यास मिळणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पिकानुसार कर्ज देण्यात येणार असून पशुपालन आणि मत्स्यपालनासाठी कर्ज देण्याची तरतूद करण्यात आली आहे, असे नेव्हील आफान्सो यांनी सांगितले. गोव्यातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही योजना पोहचविण्यासाठी उपविभागीय अधिकारी बँकांच्या सहाय्याने विविध पंचायत क्षेत्रात जागृत कार्यक्रम आयोजित करीत असून या कार्यक्रमांना शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांना केवळ ४ टक्के व्याजदरात कर्ज
किसान क्रेडिट कार्ड योजनेखाली शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येणार असून शेतकऱ्यांना अगोदर कर्ज घेतल्यास हमी द्यावी लागत होती. मात्र, आता १.६० लाखपर्यंत कर्ज घेतल्यास कोणतीही हमी द्यावी लागणार नसून शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत कर्ज घेतल्यास हमी द्यावी लागणार आहे. शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज ७ टक्के व्याजदरात पुरविण्यात येणार असून वेळेवर कर्ज भरल्यास नाबार्ड आणि रिझर्व बॅंक ऑफ इंडियाकडून शेतकऱ्यांना ३ टक्के व्याजमाफी देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना या कर्जाच्या अखेरीस फक्त ४ टक्के व्याजदरच बॅंकेला भरावा लागणार आहे, असे कृषी खात्याचे संचालक नेव्हील आफान्सो यांनी सांगितले.

पशुपालन व मत्स्यपालन व्यावसासियाकांनाही लाभ
पशुपालन आणि मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत जोडण्यात आलेले असून दुग्ध व मत्स्यपालन व्यावसायिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्तर व दक्षिण गोव्यात जागृती कार्यक्रम आयोजित केला आहे. दोन्हीही जिल्ह्यात आयोजित केलेल्या जागृती कार्यक्रमात एकूण १८० दुग्ध संस्था सहभागी झाल्या होत्या. गोव्यात पाच हजारांच्या आसपास दुग्ध व मत्स्यपालन व्यावसायिक असून त्यातील १६०० व्यावसायिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी केलेली आहे. दुग्ध व्यावसायिकांना गरजेनुसार कर्ज देण्यात येणार आहे, अशी माहिती पशुपालन खात्याचे संचालक डॉ. संतोष देसाई यांनी दिली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त दुग्ध व मत्स्यपालन व्यावसायिकांनी पुढे यावे, असे आव्हानही त्यांनी केले आहे.

संपादन यशवंत पाटील

संबंधित बातम्या