कोविड-१९ गोवा: विलगीकरण नोंदणीची सोय आरोग्य केंद्रात करा

वार्ताहर
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

पेडणे आम आदमी पक्षाचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

तेरेखोल: कोविड संसर्ग रुग्ण सापडल्यानंतर त्याच्या विलगीकरण नोंदणीसाठी जे कागदोपत्र सोपस्कार करावे लागतात ते ऑनलाईन न करता संबंधित आरोग्य केंद्रांत उपलब्ध करण्याची सोय करावी, अशी मागणी पेडणे तालुक्यातील आम आदमी पक्षातर्फे करण्यात आली आहे. तशा स्वरूपाचे एक निवेदन पेडणे उपजिल्हाधिकारी श्री. निपाणीकर यांना आम आदमी पक्षातर्फे देण्यात आले आहे.
 
आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या पाहणीत असे आढळून आले आहे, की तालुक्यांत अनेक ठिकाणी इंटरनेटची  समस्या आहे. कोविडसंदर्भांत तपासणी केल्यानंतर अहवाल सकारात्मक आल्यानंतर रुग्णाला विलगीकरणाची माहिती दिली जाते. रुग्णाला काहीही लक्षणे नसतात, पण अहवाल सकारात्मक आल्यास त्याला घरी विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात येतो. यावेळी त्याच्या घरी सर्व सुविधा असल्याची माहिती करून घेतात. तद्‌नंतर रुग्णाला ऑनलाईन नोंदणी करावी लागते. 

यावेळी त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. रुग्णांची विलगीकरण नोंदणी न झाल्यास त्याला घरी विलगीकरणात आहे असा शिक्का उपजिल्हाधिकारी किंवा स्थानिक पंचायत कार्यालयांतून मिळत नाही. तशा शिक्क्याचे स्टिकर घरावर न लागल्यास इतरांना ते काळत नाही. रुग्णाचे कुटुंबांतील इतर सदस्य बाहेर फिरलेले दिसतात व तक्रारी येत राहतात. सगळे प्रयत्न करून रुग्ण नोंद होतो त्यावेळी त्याच्या विलीगीकरणाच्या कालावधीत तफावत आढळते व प्रत्यक्ष विलगीकरण व नोंदणीनुसार विलगीकरण प्रक्रियेत बरीच तफावत दिसून येते. अशावेळी लोकांत संताप व्यक्त होतो व रुग्णावर लक्ष देता येत नाही. यावर तोडगा म्हणून रुग्णांना दोन्ही पर्याय खुले करून ऑनलाईन नोंदणी व प्रत्यक्ष नोंदणी करण्याचे पर्याय उपलब्ध करून द्यावेत. जेणेकरून रुग्णांची नोंदणी चांगल्या प्रकारे होईल. 

संबंधित बातम्या