सायकलवरून पावांची विक्री करणाऱ्यांना नोंदणी सक्तीची

Vilas Mahadik
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

सायकलवरून पावांची विक्री करणाऱ्या सर्व व्यक्तीनी अन्न सुरक्षा व कायदा २००६ खाली आपल्या प्रत्येक सायकलवर माहिती फलक लावावा त्यात बेकरीचे नाव, एफएसएसएआय नोंदणी क्रमांक व संपर्क क्रमांकांची नोंद असावी. पारंपारिक बेकरीनी नोंदणी प्रमाणपत्र किंवा परवाना घेतल्यानंतरच बेकरी सुरू कराव्यात

पणजी,  अन्न आणि औषध प्रशासन संचालनालयाने गोमंतकीय जनतेचा ब्रेड (पाव) हा मुख्य आहार असल्याने सायकलवरून पावांची विक्री करणाऱ्यांकडून सुरक्षित आणि पौष्टीक पाव उपलब्ध करून देण्यात येत असल्याची खात्री करून देण्यासाठी नावनोंदणी करणे सक्तीचे करण्यात आले आहे.
सायकलवरून पावांची विक्री करणाऱ्या सर्व व्यक्तीनी अन्न सुरक्षा व कायदा २००६ खाली आपल्या प्रत्येक सायकलवर माहिती फलक लावावा त्यात बेकरीचे नाव, एफएसएसएआय नोंदणी क्रमांक व संपर्क क्रमांकांची नोंद असावी. पारंपारिक बेकरीनी नोंदणी प्रमाणपत्र किंवा परवाना घेतल्यानंतरच बेकरी सुरू कराव्यात व स्वच्छताविषयक आणि आरोग्यदायी नियमांचे पालन करावे. ग्राहकांनीही यासंबंधी दक्ष रहावे आणि कायद्याचे उल्लंघन होत असल्यास तक्रार नोंदवावी. संचालनालयामार्फत कोणतीही दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी सर्व अन्न व्यवसाय ऑपरेटर्सनी वरील अटींचे पालन करावे, असे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले आहे.
राज्यात सध्या कोरोनाचे रुग्ण वाढ असून सायकलवरून पाव विक्री करणाऱ्यांमध्ये अधिकजण परप्रांतीय कर्मचारी आहेत. ते कोणत्या बेकरीमध्ये कामाला आहेत किंवा कोणत्या बेकरीतील पाव विक्रीसाठी घेऊन फिरतात याचा काहीच पत्ता नसतो. त्यामुळे सावधगिरी म्हणून अन्न व औषध प्रशासन संचालनालयाने ही पावले उचलली आहेत.

संबंधित बातम्या