एक दिवस ताप, अंगदुखी सोडल्‍यास मी ठणठणीत: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 12 सप्टेंबर 2020

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, एक दिवस ताप व अंगदुखी सोडली, तर अन्य त्रास झाला नाही. व्यायाम व प्राणायाम सुरूच ठेवला.

पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे ‘कोविड’मधून बरे झाले असून येत्या १७ सप्टेंबरनंतर ते नियमित बैठका सुरू करतील. सध्या शासकीय निवासस्थानाहूनच कामकाज सुरू ठेवणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी आज ही माहिती दिली.

ते म्हणाले, ‘कोविड’ची लागण झाल्याचा अहवाल २ सप्टेंबर रोजी आला, तेव्हापासून गृह अलगीकरणात होतो. १ तारखेला किरकोळ लक्षणे दिसली. एक दिवस ताप व अंगदुखी सोडली, तर अन्य त्रास झाला नाही. व्यायाम व प्राणायाम सुरूच ठेवला. स्वअनुभवावरून हे सांगतो की, कोविडचा त्रास होत नाही, त्यासाठी स्वयंशिस्त महत्त्‍वाची आहे. नियमित प्राणायाम, सूर्यनमस्कार, पोषक आहार आणि द्रवरुप अन्न यावर भर दिला पाहिजे.

कोविडोत्तर उपचारासाठी केंद्रस्‍तरीय दवाखाने
दिनचर्या व ऋतुचर्या यावर भर दिला पाहिजे असे सांगून ते म्हणाले, कोविडोत्तर उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पातळीवर दवाखाने सुरू केले जातील. तेथे समुपदेशकही नेमले जाणार आहेत. मी सध्या सात दिवस जनतेला भेटणार नाही. १७ नंतर नियमित बैठका सुरू होतील. मी गृह अलगीकरणात असताना जनतेची जी काही गैरसोय झाली असेल, त्याबद्दल मी दिलगिर आहे, असे मुख्‍यमंत्री म्‍हणाले.

उशिरा उपचारासाठी येणे, दुर्लक्ष  व अन्य आजार हे मृत्यू होण्यासाठी कारणे असू शकतो. कोविड इस्पितळ व कोविड निगा केंद्रात चांगले उपचार दिले जातात. उत्तर गोव्यात ५४५ कोविड रुग्ण क्षमता आहे त्यापैकी १६२ जागा रिक्त आहेत, दक्षिण गोव्यातील १ हजार ६ क्षमतेपैकी ५२० रिक्त जागा आहेत. गृह अलगीकरणाचा पर्याय अनेकजण निवडतात. त्यांना डॉक्टरांच्या संघटना दूरध्वनीवर मार्गदर्शन करतात.

दिल्लीचा आदर्श का म्‍हणून ठेवायचा?
केवळ गोव्यातच मोफत उपचार केले जातात. आता काही जण आम्ही तुम्हाला कोविडपासून वाचवू असे नाटक करायला फिरत आहेत. सरकारने योग्य प्रकारे उपचार देणे सुरू ठेवले आहे. त्याची स्तुती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केली होती. त्यांनी गोव्याचे काम आदर्शवत आहे, असे नमूद केले आहे. दिल्लीत केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतर कोविड नियंत्रणात आला, हे सत्य आहे. गृहमंत्री अमित शहा आणि आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सर्व केंद्र सरकारची इस्पितळे खुली केली. त्यानंतर दिल्लीत कोविड नियंत्रणात आला. त्यामुळे गोव्याला दिल्लीचा आदर्श ठेवण्याची गरज नाही.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या