वीज ग्राहकांना दिलासा

अवित बगळे
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

घरगुती वीज स्‍थिर आकारात ५० टक्के सवलत : उच्च दाब वीज ग्राहकांनाही सवलत

पणजी

कोविड’ टाळेबंदीच्या आणि त्यानंतरच्या काळात वीज बिले भरमसाठ वाढलेली आहेत. ती कमी करावीत या होणाऱ्या मागणीला प्रतिसाद म्हणून सरकारने आज घरगुती कमी दाबाच्या वीज ग्राहकांना (घरगुती, वाणिज्यिक आणि इतर वर्गातील) स्‍थिर आकाराच्या (फिक्स्ड चार्जिस) पन्नास टक्के रक्कम एप्रिल आणि मे महिन्यासाठी माफ करण्याची घोषणा केली. त्याशिवाय उच्च दाबाच्या वीज ग्राहकांसाठी याच कालावधीतील वीज वापरासाठी मागणी शुल्क आणि प्रत्यक्षातील मागणी शुल्क यांच्यातील तफावत माफ केली जाणार आहे.
राज्य सरकारने हा निर्णय घेतला, असे स्पष्ट केले असले तरी हा निर्णय प्रत्यक्षात केंद्र सरकारने दिलेल्या सवलतींमुळे घेण्यात आला आहे. वीज मुख्य अभियंता कार्यालयातून राज्य सरकारला या निर्णयासंदर्भात माहिती देण्यासाठी टिप्‍‍पणी पाठवण्यात आली आहे. यात केंद्र सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील वीज उत्पादक कंपन्यांनी सुट देण्याचे ठरवल्याचे नमूद केले आहे. त्यानुसार राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाने १३ कोटी २० लाख रुपयांची तर पावर ग्रीड कॉर्पोरेशनने ४ कोटी ९३ लाख मिळून एकूण १८ कोटी १३ लाख रुपयांची सुट गोव्याला देण्याचे ठरवले आहे. सरकारने ही सुट वीज ग्राहकांपर्यंत पोचवली आहे.

म्‍हणून तफावतीवरील आकार माफ निर्णय
केंद्र सरकारने २५ मार्च ते १४ एप्रिलपर्यंत ‘कोविड’ टाळेबंदी लागू केली होती. त्याआधी २२, २३ व २४ मार्चला जनसंचारबंदीचे पालन करण्यात आले होते. सर्व औद्योगिक आस्थापने, वाणिज्यिक आस्थापने त्यानंतर बंद राहिली आहेत. यामुळे त्यांना मोठा तोटा सहन करावा लागला आहे. त्यांच्याकडून प्रत्यक्षातील वीज वापराचे शुल्क आकारले जावे, मागणी शुल्क आकारले जावे अशी मागणी करण्यात येत होती. उच्च दाबाच्या वीज ग्राहकासाठी २५० रुपये प्रती किलोवॅट किंवा एकूण मागणीच्या विजेसाठी ८५ टक्के शुल्क आकारले जाते. वीज आकाराच्या व्यतिरीक्त हे शुल्क आकारण्यात येते. त्यामुळे वीज न वापरताही या ग्राहकांना वीज मागणीच्या ८५ टक्के आकार भरणे क्रमप्राप्त ठरत होते. त्यांना सुट देण्यासाठी एकूण मागणी आणि प्रत्यक्षातील वीज वापर यातील तफावतीवरील आकार माफ करण्याचे ठरवण्यात आले आहे. कमी दाबाच्या वीज ग्राहकांसाठी मंजूर वीज दाबावर स्‍थिर आकार आकारण्यात येतो. एप्रिल व मे महिन्यासाठी या स्‍थिर आकारातील पन्नास टक्के रकमेचा परतावा जुलै महिन्यातील बिलांत ग्राहकांना परत केला जाणार आहे.

दरम्‍यान, काँग्रेसने स्‍थिर आकारावर नव्‍हे, तर पूर्ण वीज बिलावर ५० टक्के सुट द्यावी, अशी मागणी केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांनी सांगितले की, सरकार आभासी जगात वावरत आहे. प्रत्‍यक्षातील जगात वीज ग्राहक मेटाकुटीला आला आहे. याला दिलासा देण्‍यासाठी सरसकटपणे वीज बिलात ५० टक्के सुट देणे आवश्‍‍यक आहे. आताच्‍या सुटीचा घरगुती वापराच्‍या वीज ग्राहकांना काडीचाही फायदा होणार नाही.

उच्च दाबाच्‍या वीज ग्राहकांना खरा लाभ
थ्रीफेज घरगुती वीज जोडणीसाठी मासिक ६८ रुपये स्‍थिर आकार आहे. त्यामुळे त्या ग्राहकाला एप्रिल व मे महिन्याचे मिळून केवळ ६८ रुपये जुलै महिन्यांच्या बिलात परताव्याच्या रुपाने मिळणार आहेत. सिंगल फेज घरगुती वीज जोडणीसाठी ३४ रुपये १७ पैसे स्‍थिर आकार आहे. तेवढीच रक्कम त्या ग्राहकाला परताव्याच्या रुपाने जुलै महिन्याच्या बिलातून परत मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयाचा खरा फायदा उच्च दाबाच्या वीज ग्राहकांना होणार आहे.

या निर्णयामुळे कोणाला होईल लाभ
ग्राहकाचा प्रकार महिना वीज ग्राहक संख्या सूट (कोटी रुपयांत)
उच्च दाब एप्रिल १०९६ ७.३५
कमी दाब एप्रिल ६५६२८९ २.२६
एकूण ९.६१

उच्च दाब मे १०९६ ६.२६
कमी दाब मे ६५६२८९ २.२६
एकूण ८.५२

एप्रिल मे महिन्याची सूट १८.१३

राज्यातील वीज ग्राहकांना या निर्णयामुळे १८ कोटी ३० लाख रुपये यापुढील बिलांत परत मिळणार आहेत. घरगुती वीज ग्राहकांचा स्‍थिर आकार ५० टक्के घटवण्यात आला असून उच्च दाबाच्या वीज ग्राहकांना केवळ प्रत्यक्षातील वीज वापराचेच पैसे द्यावे लागणार आहेत.
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

संबंधित बातम्या