फातर्पा, किटल, बाळ्ळीला धार्मिक झोन बनवू

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

फातर्पा, बाळ्ळी, किटल-नाकेरी भागात भरपूर मंदिरे आहेत, जी देश-विदेशात प्रसिद्ध आहेत. या भागाचा धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने विकास केल्यास धार्मिक पर्यटन वाढेल व मंदिरे आणि त्यांच्यावर अवलंबीत ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांनी केले.

 फातोर्डा:  फातर्पा, बाळ्ळी, किटल-नाकेरी भागात भरपूर मंदिरे आहेत, जी देश-विदेशात प्रसिद्ध आहेत. या भागाचा धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने विकास केल्यास धार्मिक पर्यटन वाढेल व मंदिरे आणि त्यांच्यावर अवलंबीत ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांनी केले.

उपमुख्यमंत्री कवळेकर नूतनीकृत वांते फातर्पा येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या उद्‍घाटनाप्रसंगी बोलत होते. यावेळी ‘ओएनजीसी’चे कार्यकारी संचालक अतुल गर्ग, वरीष्ठ मानव संसाधन अधिकारी संजय कुमार, फातर्पाच्या सरपंच मंदा नाईक देसाई, बाळ्ळीच्या सरपंच दिपाली सुरज फळदेसाई, फातर्पाच्या पंच शीतल सुरेंद्र नाईक, उपसरपंच जुवाव बाप्तीस्त फर्नांडिस, पंच मेदिनी नाईक, नितल फळदेसाई, श्री शांतादुर्गा बाळ्ळीकरीण देवस्थानचे अध्यक्ष निलेश फळदेसाई, चिटणीस महेष फळदेसाई, मुखत्यार सुरेन्द्र फळदेसाई आदी उपस्थित होते.

वंटे-फातर्पा स्थीत ही प्राथमिक शाळा गेली बरीच वर्षे स्थानिक विद्यार्थ्यांच्याअभावी बंद होती आणि कालांतराने वस्तूही जीर्ण झाली होती. स्थानिक युवकांनी पुढाकार घेऊन या इमारतीचा सांस्कृतिक केंद्र म्हणून वापरात आणण्यासाठी पुढाकार घेण्याचे ठरविले. या वास्तूत दरवर्षी ५ दिवस सरस्वती पूजन आणि ५ दिवस लक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम असतो. तो स्थानिक युवकांनी चालूच ठेवला होता. वस्तू नूतनीकृत करण्यासाठी जेव्हा युवकांनी स्थानिक आमदार व राज्याचे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी बेतूल गावात असलेल्या ओएनजीसी प्रशिक्षण केंद्राशी सीएसआर अंतर्गत हे काम करून देण्यास सांगितले.

‘ओएनजिसी’चे कार्यकारी संचालक अतुल गर्ग यांनी ही लागलीच उपमुख्यमंत्र्यांच्या मागणीला मान देत हे काम करून देण्याचे मान्य केले.
उपमुख्यमंत्री कवळेकर पुढे म्हणाले की, फातर्पा गावात बऱ्याच ठिकाणी वीजवाहिन्या भूमिगत करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. पाच कोटी रुपये खर्च करून रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण केले जाणार आहे. ‘कोविड’ काळात जनतेला अत्यावश्यक सेवा देण्यात मदत केल्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे त्यांनी यावेळी विशेष अभिनंदन केले. यावेळी बाळ्ळीच्या सरपंच दीपाली फळदेसाई, फातर्प्याच्या सरपंच मंदा ना. देसाई, अतुल गर्ग व निलेश फळदेसाई यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयकुमार कोप्रे देसाई यांनी केले.

संबंधित बातम्या