सांतामोनिका जेटीवर कसिनो कार्यालयांचे स्थलांतर

दैनिक गोमंतक
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

सहा कसिनोंच्या कार्यालयांचे स्थलांतर सांतामोनिका जेटीवर करण्याचा निर्णय आज महापालिकेत झाला. यासाठी महापालिका आयुक्तांना आराखडा तयार करण्यास सांगण्यात आले आहे. 

पणजी: भाऊसाहेब बांदोडकर मार्गावर कांपाल ते पाटो पुलापर्यंत वाहतुकीच्या कोंडीस कसिनोमध्ये जाणाऱ्यांची वाहने कारणीभूत ठरतात. त्यामुळे ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी बंदर कप्तान खात्याच्या बाजूला असलेल्या सहा कसिनोंच्या कार्यालयांचे स्थलांतर सांतामोनिका जेटीवर करण्याचा निर्णय आज महापालिकेत झाला. यासाठी महापालिका आयुक्तांना आराखडा तयार करण्यास सांगण्यात आले आहे. 

या बैठकीस बंदर कप्तान खात्याचे मंत्री मायकल लोबो, आमदार बाबूश मोन्सेरात, बंदर कप्तान खात्याचे कॅप्टन जेम्स ब्रागांझा, पणजीचे पोलिस निरीक्षक सुदेश नाईक, महापौर उदय मडकईकर, आयुक्त संजित रॉड्रिग्स, माजी महापौर तथा नगरसेवक विठ्ठल चोपडेकर यांची उपस्थिती होती. 
या बैठकीविषयी माहिती देताना मंत्री म्हणाले की, बंदर कप्तान खात्याच्या बाजूला, तसेच सचिवालयापासून पुढील पेट्रोलपंपासमोर असलेल्या कसिनोपर्यंत अनेक वाहने उभी केली जातात, त्यामुळे सायंकाळनंतर वाहतूक कोंडी होते.

त्याचबरोबर बंदर कप्तान खात्याच्या जेटीवरही क्रूझमध्ये बसण्यासाठी पर्यटक बसेसने येतात. तसेच येथील कचरा उचलण्यासाठी कचरा गाडी, मलनिस्सारण उपसा करणारी गाडी अशी वाहने एकाच ठिकाणी उभी होत असल्याने वाहनांना अडथळा होतो. तो अडथळा झाल्याने वाहतूक कोंडी होते, त्यामुळे आमदार मोन्सेरात यांनी यावर तोडगा काढावा अशी विनंती केली होती. त्यानुसार आज बैठक झाली. त्यात कसिनोंची सर्व कार्यालये सांतामोनिका जेटीवर स्थलांतर करण्यात येतील.

कसिनोंमध्ये जाणाऱ्यांना नेण्यासाठी मांडवी नदीत १५ प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोटी कार्यरत आहेत. 
आमदार मोन्सेरात म्हणाले की, सांतामोनिका जेटीवर बसेस, किंवा चारचाकी वाहने काही काळ उभी करणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर चारचाकी वाहनांकरिता बहुमजली पार्किंग प्लाझाचा वापर करता येणार आहे. सांता मोनिका जेटीवर कशाबद्धतीने कार्यालयांचे स्थलांतर करावयाचे, याचा पूर्ण आराखडा आयुक्त करणार आहेत. हा आराखडा तयार झाल्यानंतर तो आम्ही मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहोत, त्यानंतरच त्यावर अंतिम निर्णय होईल.

संबंधित बातम्या