२०१२ मधील घटनेच्‍या स्‍मृती झाल्‍या ताज्‍या; म्‍हापशातही पडला होता दरोडा

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 3 सप्टेंबर 2020

१८ सप्टेंबर २०१२ हा दिवस गणेशचतुर्थीचा आदला दिवस होता त्याच दिवशी भरवस्तीत असलेल्या रायकर ज्वेलर्स या आस्थापनात घुसून चोरट्यांनी सराफाचा खून केल्याच्या घटनेच्‍या स्मृती ताज्‍या झाल्‍या आहेत. अजूनही खुनी पोलिसांच्या हाती लागला नाही.

म्हापसा: मडगाव येथील कृष्णी ज्वेअर्स या आस्थापनात हल्लेखोर घुसून आस्थापनाचे मालक स्वप्नील वाळके यांचा खून करण्‍यात आला. सोने लुटण्याच्या नादात भर दिवसा सराफाचा खून करण्याची घटना घडल्यानंतर म्हापसा शहरात २०१२ मध्ये घडलेल्या घटनेच्‍या आठवणी ताज्‍या झाल्‍या. मडगावातील व म्‍हापशातील तेव्‍हा झालेला हल्ला व चोरी यात साम्‍य आहे. १८ सप्टेंबर २०१२ हा दिवस गणेशचतुर्थीचा आदला दिवस होता त्याच दिवशी भरवस्तीत असलेल्या रायकर ज्वेलर्स या आस्थापनात घुसून चोरट्यांनी सराफाचा खून केल्याच्या घटनेच्‍या स्मृती ताज्‍या झाल्‍या आहेत. अजूनही खुनी पोलिसांच्या हाती लागला नाही.

तळीवाडा - म्हापसा येथील कोचकर इमारतीत रायकर ज्वेअर्स या आस्थापनाचे मालक रत्नाकांत रायकर यांचा भरदिवसा त्यांच्या ज्वेलरीमध्ये दरोडेखोर घुसून ३ किलो सोने लुटले होते व आस्थापनाचे मालक रत्नाकांत रायकर यांचा खून केला होता. त्यानंतर या सराफाच्‍या खुनाची घटना घडल्यानंतर सर्वजण आपल्या व्यवसायापोटी जागरुक झाले होते. काहीनी आपल्या आस्थापनात कॅमेरे लावले तर काहीनी मोठमोठ्या गेट्‍स घातल्या व काहींनी सुरक्षाव्‍यवस्‍था अधिक कडक केली. पण, स्वतःच्या रक्षणासाठी रिव्हॉल्‍वर ठेवण्यास विसरले आहेत. रत्नाकांत रायकर यांचे आस्थापन मुख्य रस्त्याच्या बाजूला आहे. तसेच बाजूला कार्पोरेशन बॅंक आहे. इतर दुकाने आहेत. अशा परिस्थितीत या दरोडेखोरांनी रत्नाकांत रायकर यांच्यावर हल्ला केला होता.

म्हापसा पोलिसानी १८ सप्टेंबर २०१२ रोजी पंचनामा करून घटनेची चौकशी केली होती. तसेच बॅंकेच्या कॅमेऱ्याच्या मदतीने अनेक संशयित इसमांची जबानी घेतली होती. एका वर्षानंतर या घटनेची चौकशी करण्यासाठी गुन्हा शाखेकडे प्रकरण सोपविण्यात आले. गुन्हा शाखेकडून २४ सप्टेंबर २०१३ मध्ये पुन्हा या दरोडा व खुनाची चौकशी सुरू झाली. गुन्हा शाखेने सखोल चौकशी केल्यानंतर रत्नाकांत रायकर यांच्या ज्वेलरी आस्थापनान सहा वर्षांपासून काम करणारा साईदुल इस्‍लाम अब्दुल जलील मंडळ (वय २८ राहणारा पश्चिम बंगाल) यांच्याभोवती संशय निर्माण झाला होता. रत्नाकांत रायकर यांच्या खुनानंतर  दोन महिन्यात साईदुल मंडळ आपल्या पश्चिम बंगाल येथे आपल्या मूळ गावी गेला होता. गुन्हा खात्याच्या पोलिसांनी पश्चिम बंगाल येथे जाऊन साईदुल इसलाम अब्दुल जलील मंडळ या संशयिताला ताब्यात घेतले होते व त्याला म्हापशात आणले होते. सत्र न्यायालयापुढे या संशयिताला गुन्हा खात्याने उभे केले व सत्र न्यायालयाने या साईदुल मंडळ या संशयिताला १४ दिवसांचा न्यायालयीन रिमांड दिला होता. या १४ दिवसांत गुन्हा खात्याने सखोल चौकशी केली होती. पण, गुन्हा सिद्ध करण्यासाठी गुन्हा खात्याकडे पुरावे हाती लागले नाहीत. त्यानंतर सत्र न्यायालयाने त्याला जमीन दिला गेला. आज या प्रकाराला ८ वर्षे पूर्ण झाली तरी खुन्‍याला पकडण्यास अपयश आले आहे. 

अशाच प्रकारे लक्ष्मी नारायण मंदिरापासून १०० मीटरच्या अंतरावर असलेल्या रायकर ज्वेलर्स या आस्थापनात २५ नोव्हेंबर १९८९ साली सकाळी ९.४५ वाजता चोरट्यांनी दरोडा घातला होता. आस्थापनाचे मालक दिगंबर शांताराम रायकर यांनी आपले आस्थापन उघडल्यानंतर सहा दरोडेखोरांनी प्रवेश केला होता. या सहा दरोडेखोरामध्ये दोन कळंगुट येथील गोमंतकीय होते. या दोघांनी सोन्याचा दागिना दाखविण्यास सांगितले. त्यांनी चावी काढून दाखवत असतानाच दरोडेखोरांनी चॉपर, रिव्हॉल्वर बाहेर काढले व आस्थापनाचे मालक दिगंबर रायकर कपाटाच्‍या सर्व चाव्‍या काढण्‍यास सांगून कपाट उघडण्‍यास सांगितले. त्यानंतर अडीच किलो सोने तसेच चांदी, खडे व इतर मौल्यवान वस्तू या दरोडेखोरांनी ताब्यात घेतले. आस्थापनाचे मालक दिगंबर रायकर यांनी दरोड्याची माहिती बाहेर कळावी म्हणून जरा प्रयत्न केला असता, एका दरोडेखोराने रिव्हॉल्वरने गोळी झाडली. पण, सुदैवाने गोळी रायकर यांना न लागता त्याच्यातील एका दरोडेखोराला लागली. त्यानंतर सहाही दरोडेखोरांनी पळ काढला. पोलिसांनी शोधमोहिम चालू ठेवून या दरोडेखोरांना तीन वर्षानंतर अटक केली. पण दिगंबर रायकर यांना एक रुपयाचीसुद्धा वसुली झाली नाही. दीड अडीच किलो सोने किंवा अन्य वस्तू हस्तगत करण्यास पोलिसांना अपयश आले. या घटनेला आज ३१ वर्ष पूर्ण होत आहे. अशाच प्रकारे बाजारपेठेतील दोन ज्वेलर्सच्या दुकानात चोऱ्याचा प्रयत्न झाला होता.

म्‍हापशातील दुकाने आजही बंद
आज कृष्णी ज्वेलर्स या आस्थापनात हल्लेखोरांनी आस्थापनचे मालक स्वप्नील वाळके या सराफाचा खून केल्याच्या निषेधार्थ म्हापसा शहरातील सर्व ज्वेलर्सवाल्यांनी कडकडीत बंद पाळला व हल्ला करणाऱ्यांना त्वरीत अटक करण्याची मागणी केली गेली. तसेच गुरुवारीही दुकाने बंद ठेवण्‍यात येतील, असे कळविण्‍यात आले आहे. कोविड १९ मुळे सर्वांचे व्यवसाय मंदीमध्ये चालत आहेत. अशा परिस्‍थितीत असे भरदिवसा हल्ले होणे म्हणजे सराफाचे जीवन धोक्यात आले आहे. सरकारने कुणाचीही गय करू नये, अशी भावना ज्वेलर्स संघटनेने व्यक्त केली आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या