मडगावातील घाऊक मासळी मार्केटातील गलिच्छता दूर

प्रतिनिधी
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

मार्केटचे अध्यक्ष विल्फ्रेड डिसा यांनी व्यक्त केले समाधान

सासष्टी: मोठ्या प्रमाणात उलाढाल होणाऱ्या मडगावच्या घाऊक मासळी मार्केटातील गलिच्छता व बकालपणा दूर होऊन हे मार्केट स्वच्छ होऊ लागले आहे. दक्षिण गोवा नियोजन व विकास प्राधिकरणाचे (एसजीपीडीए) अध्यक्ष विल्फ्रेड (बाबाशान) डिसा यांनी आज या मार्केटात आकस्मिक भेट देऊन पाहणी केली. मार्केटमध्ये झालेल्या सुधारणांवर त्यांनी समाधान व्यक्त केले.  

मडगाव घाऊक मासळी मार्केटमध्ये भेडसावणाऱ्या समस्यांचे निवारण करण्यासाठी  एसजीपीडीएने लागू केलेल्या नियमांची योग्यरीत्या अंमलबजावणी करण्यात येत असून यामुळे मार्केटमध्ये सुधारणा होत आहेत असा सूर लोकांमधून उमटू लागला आहे अशी माहिती एसजीपीडिएचे अध्यक्ष विल्फ्रेड डिसा यांनी दिली. आज अचानक मार्केटला भेट देऊन पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली.

मडगाव घाऊक मासळी मार्केटमध्ये अनेक समस्या निर्माण होत असल्याची तक्रारी एसजीपीडिएकडे येत होत्या तर अनुसरून मार्केटात काही बदल करण्यात आले आहे. याची योग्य अंमलबजावणी होत आहे की नाही याची पाहणी करण्यासाठी बाजाराला अचानक भेट देण्यात आली असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.  रापोणकार, बोटकार आणि परप्रांतीय व्यावसायिकांना वेगवेगळे बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली असून ही सूचना पाळण्यात येत आहे असे डिसा यांनी सांगितले. मासळी खाली बसूनच कापत असल्याने सर्वांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत होते. यासाठी आता वरती खडप घालून मासळी कापण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.तसेच कॅन्टीनमध्ये कुत्री घुसून लोकांना त्रास होऊ नये यासाठी कॅन्टीनच्या बाहेरून पत्रे लावण्यात आल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

या मार्केटमध्ये पूर्वी मासळी कापणाऱ्यांना खाली बसून चिखलात काम करावे लागत असे. त्यांच्यासाठी खडप्पा वापरून ओटे तयार करुन देण्यात आले आहेत. नागरिक पैसे मोजून मासळी खरेदी करतात. पण, त्यांना चिखलात बसणाऱ्या माणसांकडून मासळी कापून घ्यावी लागत असे. याबद्दल नागरिकांची तक्रार होती. आता ही तक्रार दूर झाली आहे, असे डिसा यांनी सांगितले. 

चिखलात बसून काम करण्याची आमची समस्या एसजीपीडीएच्या अध्यक्षांनी दूर केली. मासळी स्वच्छ करण्यासाठी नळाच्या पाण्याचीही त्यांनी सोय केली असे मासळी कापण्याचे काम करणारे शेख हुसेन यांनी सांगितले.

मासळीची आवक वाढली!
पणजी, ता. ६ (प्रतिनिधी) : राजधानी पणजीत गत रविवारच्या तुलनेत आज मासळी खरेदीला गर्दी दिसून आली. काही मासळीचे दर काही अंशी उतरल्याचे दिसून आले. 

गेल्या आठवड्यात मासळी खरेदीसाठी लोक येणार म्हणून दर वाढले होते. परंतु आता मासळीची आवक वाढल्याने विक्रेत्यांना काहीशा प्रमाणात दर खाली घ्यावे लागले. वेर्ली मासे गेल्या आठवड्यात दीडशे ते दोनशे रुपयांना वाटा दिला जात होता; परंतु आज १०० रुपयांना वाटा दिला जात होता. त्याशिवाय १००० रुपयांपर्यंत गेलेला पॉपलेट आज ८०० रुपये किलोने विकला जात होता. 

याशिवाय बांगड्यां आकारानुसार दर आकारले जात होते. मुड्डुशे ४०० रुपये किलोने विकला जात होता. ओला बोंबील ३०० रुपये किलोने मिळत होता. इसवण ६०० रुपये किलोने विकला जात होता. गेल्या आठवड्यापेक्षा आज इसवणची आवक अधिक झाल्याचे दिसून आले. सुंगटे (झिंगे) ३०० किलो विकले जात होते. आज सकाळपासून मासळी बाजारात गर्दी होती. त्यामुळे सामाजिक अंतर राखण्याचा पूर्णतः फज्जा उडाल्याचे दिसून आले. पणजीत सध्या कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना अशाप्रकारे सामूहिक गर्दी होणे म्हणजे कोणतेच नियम न पाळण्या सारखे आहे.

संबंधित बातम्या