निवडणुकीच्या तोंडावर प्रेदशाध्यक्ष पदावरून गोवा कॉग्रेसमध्ये चर्चा

Girish Chodankar
Girish Chodankar

मडगाव:: राज्यात(Goa) काँग्रेस पक्षाला(Congress) सावरायचे असेल तर गिरीश चोडणकर(Girish Chodankar) यांना प्रदेश समितीच्या अध्यक्षपदावरून हटवा, असा सूर आता सासष्टीतील फ्रान्सिस सार्दिन, आलेक्स सिक्वेरा, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स या आमदारांनी पकडला आहे. त्यांनी काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव यांच्याकडे तशी मागणीही केली. आपल्याला प्रदेशाध्यक्ष म्हणून सार्दीन चालतील; पण चोडणकर नको, अशी भूमिका रेजिनाल्ड यांनी मांडली आहे. लुईझीन फालेरो यांनी कुणाला बदला किंवा कुणाला अध्यक्ष करा, हे स्पष्टपणे न सुचविता बदल आवश्यक असल्याची भूमिका घेतली आहे. गिरीश समर्थक गट वगळता अन्य सर्वांना अध्यक्ष बदलण्याच्या बाजूनेच मत व्यक्त केले. ‘हिंदू अध्यक्ष करायचा असल्यास दिगंबर कामत यांच्याकडे सूत्रे द्या आणि ख्रिश्चन अध्यक्ष करायचा असल्यास लुईझीन फालेरो किंवा फ्रान्सिस सार्दिन यांच्याकडे नेतृत्व सोपवा’, अशी मागणी या नेत्यांनी केली.(Remove Girish Chodankar from the post of Congress State President)

चोडणकर दिल्लीला; उलटसुलट चर्चा
काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव हे दिल्लीला परतल्यानंतर रविवारी संध्याकाळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकरही दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या या दिल्ली दौऱ्यामुळे राज्यातील काँग्रेस वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. सासष्टीतील नेत्यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षात बदल हवा आहे. यापूर्वी चोडणकर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतरही काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांचा हा राजीनामा स्वीकारला नव्हता. दिनेश राव हे गोव्यात झालेल्या बैठकांचा अहवाल काँग्रेस पक्षश्रेष्ठींना सादर करणार असल्याने त्यापूर्वीच चोडणकर यांनी दिल्ली गाठली, असे त्यांच्याविरोधात असलेल्या काही काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. दिल्लीतील सहकारी व नेते राजीव साटव यांचे कोरोनामुळे निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी चोडणकर हे गेले असल्याचे सोशल मीडिया प्रमुख व प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांनी दिली.

मीच म्हटले गिरीशना काढा : फ्रान्सिस सार्दिन
‘होय, मी गिरीशला प्रदेशाध्यक्ष पदावरून काढावे, अशी मागणी राव यांच्याकडे केली आहे, असे सार्दिन यांनी दै. ‘गोमन्तक’ला सांगितले. गिरीश प्रदेशाध्यक्ष होण्यापूर्वीची गोव्यातील काँग्रेसची ताकद आणि ते प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर काँग्रेस आमदारांना लागलेली गळती याची माहिती आपण राव यांना दिली. आकडेवारी तपासून पहा आणि काँग्रेससाठी गिरीश फायदेशीर की त्यांच्यापासून तोटा आहे, हेही तपासण्यास सांगितले. शुक्रवारी सार्दिन यांनी राव यांची भेट घेतली होती.

ख्रिस्ती चेहराच पुढे आणण्याची गरज : रेजिनाल्ड 
रेजिनाल्ड लॉरेन्स यांनीही राव यांची भेट घेतली. त्यापूर्वी काँग्रेसचे अन्य एक केंद्रीय निरीक्षक प्रकाश राठोड यांनी त्यांची भेट त्यांच्या कुडतरी येथील घरी जाऊन घेतली होती. गिरीश यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात काँग्रेस फिकी पडली असून, गोव्यात काँग्रेसला पुन्हा गतवैभव मिळवून द्यायचे असेल तर त्यांना बदलण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले. भरवशाच्या सासष्टीत हा मतदार आम आदमी पक्षाला काँग्रेसला पर्याय म्हणून पाहू लागला आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसची ही भरवशाची मतपेटी सांभाळून ठेवायची असेल तर अध्यक्ष म्हणून ख्रिस्ती चेहराच पुढे आणण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

तर काँग्रेसची घडी अधिकच विस्कटेल 
विधानसभेची निवडणूक सहा सात महिन्यांवर पोहोचलेली असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलल्यास काँग्रेसची घडी अधिकच विस्कळीत होईल आणि त्याचा परिणाम काँग्रेसच्या समित्यांच्या कामावर होईल, अशी भीती संकल्प आमोणकर यांनी राव यांच्याकडे व्यक्त केली. आमोणकर यांच्या बरोबर अमरनाथ पणजीकर, वरद म्हार्दोळकर, जना भंडारी, अर्चित नाईक तसेच अन्य कार्यकर्त्यानी राव यांची भेट घेऊन आपले म्हणणे त्यांच्यासमोर मांडले.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com