बेळगाव-गोव्याला जोडणाऱ्या चोर्लाघाट रस्त्याची दुरुस्ती पुन्हा सुरु 

Copy of Gomantak Banner  (40).jpg
Copy of Gomantak Banner (40).jpg

पणजी : गेले अनेक दिवस बंद असलेले चोर्लाघाट रस्त्यांचे दुरूस्ती काम पुन्हा सुरू करण्यात आले असून काही ठिकाणचे मोठे खड्डेही बुजविण्यास सुरूवात झाली आहे. परंतु सध्या सुरू असलेले काम चांगल्या प्रकारे होणे गरजेचे आहे. कारण काही ठिकाणी केलेला रस्ता पुन्हा खराब होत आहे. या दुरुस्तीची पाहणी करण्यास गेल्यावर असे दिसून आले, की डांबरचा वापर कमी होत असल्यामुळे हा रस्ता पुन्हा खराब होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. एकूणच या रस्त्याची गरज आणि महत्त्व लक्षात घेऊन सरकारने हा रस्ता हॉटमिक्सींग पद्धतीने करण्याची गरज आहे. वाहनचालकांची तशी मागणीही आहे. 

या रस्त्याचे काम करणाऱ्या इंटरबिल्ड कंपनीचे अधिकारी कृष्णकुमार म्हणाले, हा रस्ता दुरूस्ती करताना प्रचंड संख्येने ये-जा करणाऱ्या वाहनांचा अडथळा मोठा आहे. त्यामुळे सलगपणे काम करता येत नाही. तरीसुद्धा लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने हे काम पूर्ण करण्यात येईल. त्यादृष्टीने आमचे प्रयत्न आहेत. 

गोवा ते बेळगाव हे अंतर 30 किलोमीटरने कमी करणाऱ्या चोर्ला घाट रस्त्याची पूर्णपणे वाताहत झालेली आहे. रस्त्यावर पडलेले भलेमोठे खड्डे चुकवत वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. साखळी, केरी, चोर्ला, कणकुंबी, जांबोटी, बेळगाव असा हा रस्ता अंजुने धरणाच्या बाजूने म्हादई अभयारण्यातून जातो. निसर्गरम्य असा हा रस्ता अनेक वर्षांपूर्वी बांधलेला असून वाहनासाठी तो किफायतशीर ठरत आहे. कारण बेळगाव ते गोवा हे अंतर 30 किलोमीटरने कमी पडत असल्याने इंधन व वेळेची बचत होते. गेल्या अनेक वर्षात बेळगावला ये-जा करणारे किंवा बेळगाव हैदराबाद या भागातून गोव्याला ये-जा करणारे वाहनचालक याच रस्त्याने ये-जा करत आहेत. मात्र यंदा भरपूर पाऊस पडला. जवळ-जवळ दर वर्षीपेक्षा दुप्पट पाऊस पडल्यामुळे आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने चोर्लाघाट रस्त्याच्या बाजूची गटारे योग्यप्रकारे न उसपल्यामुळे रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहिले आणि रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले. त्यातच अनमोड घाट रस्ता दुरुस्ती व रुंदीकरणासाठी जवळ जवळ वर्षभर बंद ठेवण्यात आला होता. त्याकारणाने धारवाड, हुबळी, लोंढा या भागातील वाहनेसुद्धा चोर्ला मार्गे गोव्यात ये-जा करू लागली होती. 

या एकूणच वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे हा रस्ता विशेषता गोव्याच्या हद्दीतील रस्ता पूर्णपणे धुपून गेला. मोठमोठ्या खड्ड्यातून दुचाकी चालवणे फारच जिकरीचे होऊन बसले आहे. तीन महिन्यापूर्वी रस्त्याच्या दुरुस्तीला प्रारंभ झाला होता. मात्र जिल्हा पंचायत निवडणुकीमुळे आचारसंहिता लागली व या रस्त्याचे दुरुस्तीचे काम थांबले होते. त्यानंतर हल्लीच ते पुन्हा सुरू झाले. मात्र सदर काम रखडले आहे. गेल्या अनेक दिवसात दोन ते तीन किलोमीटर रस्ता सुद्धा दुरुस्ती करण्यात आलेली नाही. गोव्यातील इतर रस्ते चकाचक आहेत, मात्र गोव्याचा सिमेतील चोर्लाघाट रस्ता बराच खराब झालेला असून कर्नाटकाच्या हद्दीतील चोर्ला ते बेळगाव हा रस्ता फारच चांगला आहे. त्यामुळे चोर्ला घाट रस्त्याचे काम जलदगतीने व चांगल्या प्रकारे करण्याची गरज आहे, असे वाहन चालकांचे मत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com