हळदोणेतील तीन मानशींचे दुरुस्तीकाम पूर्ण

प्रतिनिधी
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

आमदार टिकलो यांचा पुढाकार : २८० शेतकऱ्यांची सोय

म्हापसा: जुवार खाजन हळदोणे येथील तीन मानशींच्या दरवाज्यांचे दुरुस्तीकाम सुमारे चार लाख नऊ हजार रुपये खर्च करून पूर्ण केल्याने खाजन शेती करणाऱ्या २८० शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

हळदोणेचे आमदार ग्लेन टिकलो यांनी सरकारकडून आर्थिक मदत मिळवून दिल्यामुळे तिन्ही मानशींच्या दरवाजांचे दुरुस्तीकाम करणे शक्य झाल्याचे जुवार खाजन शेतकरी संघटनेच्या समितीने आमदार टिकलो यांना धन्यवाद दिले आहेत.

यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना संघटनेचे अध्यक्ष टॉमी एम.एच. लोबो, उपाध्यक्ष जनार्दन पेडणेकर, खजिनदार मेलकॉम रोचा, सदस्य नेल्सन नोरोन्हा, संदीप शिरोडकर, श्री. मार्टिन व अन्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तेथील एक शेतकरी मारिया फर्नांडीस यांनी सांगितले, की गेली चार वर्षे मानशीच्या दरवाजांचे दुरुस्तीकाम केले नसल्यामुळे खाजन शेतजमिनीत खारट पाणी शिरून पूर्ण शेतजमीन खारट पाण्याखाली आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना भातशेती करणे शक्य झाले नाही. शेतकरी संघटनेचे माजी उपाध्यक्ष श्याम साटेलकर यांनी शेतकऱ्यांना सहकार्य केले नाही व तीन मानशींच्या दरवाजांचे दुरुस्तीकाम केले नसल्याने शेतकऱ्यांना मागची चार वर्षे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले.

जुवार खाजन शेतकरी संघटनेची नवीन समिती स्थापन करून आमदार टिकलो यांना भेटून सविस्तर माहिती दिली होती. त्यानुसार आमदार टिकलो यांनी शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान लक्षात घेऊन बादेंश मामलेदारांना शेतकऱ्यांनी लेखी अर्ज करण्याची सूचना संघटनेला केली. आमदार टिकलो यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जानुसार सरकारकडून आर्थिक मदत मिळवून दिली. त्यामुळे मानशीच्या तीन दरवाजांचे दुरुस्तीकाम करणे शक्य झाले. सध्या शेतकऱ्यांनी शेतात लागवड करणे सुरू केले आहे.

हळदोणेचे पंचायतसदस्य तथा शेतकरी संघटनेचे सदस्य टॉमी तावारीस यांनी सांगितले, की आमदार ग्लेन टिकलो यांच्या मागर्दर्शनाखाली जुवार खाजन शेतीच्या तीन मानशींच्या दरवाजांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे शेतात खारे पाणी शिरून शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान कमी होणार आहे. शेतकरी संघटनेच्या नवीन समितीमुळे मानशींच्या दरवाजांचे दुरुस्तीकाम करणे शक्य झाले. शेतकऱ्यांनी भविष्यात एकजुटीने कार्यरत राहून मानशीच्या दारांचे दुरुस्तीकाम करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

संबंधित बातम्या