मुख्यमंत्र्यांची नाचक्की टाळण्यासाठीच राज्यपालांची बदली; काँग्रेसचा आरोप

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

कॉंग्रेस पक्षाने काल भाजप व अमलीपदार्थ माफीया यांचे सबंध असल्याचे पुराव्यासकट उघड केल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची राज्यपालांकडून परत एकदा होणारी नाचक्की टाळण्यासाठीच सत्यपाल मलिक यांची तडकाफडकी बदली आदेश जारी करण्यात आला, असा दावा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे.

पणजी: राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या तडकाफडकी बदली आदेशामुळे आज राजकीय गोटात खळबळ उडाली. अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध करत सरकारवर विविध प्रकारे आरोप आणि दावे करत ताशेरे ओढले. त्यात विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यासह अनेकांचा समावेश होता.

कॉंग्रेस पक्षाने काल भाजप व अमलीपदार्थ माफीया यांचे सबंध असल्याचे पुराव्यासकट उघड केल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची राज्यपालांकडून परत एकदा होणारी नाचक्की टाळण्यासाठीच सत्यपाल मलिक यांची तडकाफडकी बदली आदेश जारी करण्यात आला, असा दावा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे. राजभवनाचे कॅसिनो भवन करण्याचा अजेंडा पुढे रेटणे हे सुद्धा राज्यपालांची बदली करण्यामागचे कारण आहे, असे चोडणकर यांनी नमूद केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’ ही केवळ पोकळ घोषणा असल्याचे सांगून भ्रष्टाचाराला थारा न देता रामराज्य आणण्याचा भाजपचा दावा आज जमिनदोस्त झाला असल्याची टीका त्यांनी केली आहे. रेव्ह पार्टीचा सुत्रधार कपिल झवेरी यांचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, खासदार विनय तेंडुलकर तसेच आमदार दयानंद सोपटे यांच्या बरोबर काढलेली छायाचित्रे उघड करून, भाजप सरकारच्या आशीर्वादानेच गोव्यात अमलीपदार्थ व्यवसाय सुरू असल्याचा आरोप त्यांनी काल केला होता. त्याची राज्यपालांनी गंभीर दखल घेत कारवाईचे आदेश देण्यासाठी पावले उचलली होती. त्याचा सुगावा लागल्यानेच प्रधानमंत्री कार्यालय व गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून सत्यपाल मलिक यांचा तडकाफडकी बदली आदेश जारी करण्यात आला असल्याचा दावा चोडणकर यांनी केला आहे. 

कॉंग्रेस पक्ष यापुढे ही सरकारची सर्व गैरकृत्ये चव्हाट्यावर आणणार असून भ्रष्टाचार उघड करीत राहणार आहे. भाजपने यापुढे भले दहा राज्यपाल बदलले तरी चालतील, पण सरकार व भाजपला कॉंग्रेस पक्षाचे तोंड बंद करणे शक्य होणार नाही, असेही चोडणकर यांनी नमूद केले आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या