माजी प्रधान सचिवाविरुद्ध गुन्हा नोंदवा; आमदार लुईझिन फालेरो यांची मागणी

माजी प्रधान सचिवाविरुद्ध गुन्हा नोंदवा; आमदार लुईझिन फालेरो यांची मागणी
Luizin Falero

पणजी - राज्यात अनेक प्रकल्पांना लोकांचा विरोध सुरू असतानाही पर्यावरणाचा विद्ध्वंस करून प्रकल्प लादले जात आहेत. माजी मुख्यमंत्र्यांच्या एका माजी प्रधान सचिवाने मंत्रिमंडळाला अंधारात ठेवून अधिकाराचा गैरवापर करून मोले प्रकल्पासाठी झाडांच्या कत्तलीची परवानगी दिली होती. हा प्रकार गंभीर असून त्याच्याविरुद्ध सरकारने गुन्हा नोंदवून त्याची चौकशी करावी, अशी मागणी आज आमदार लुईझिन फलेरो यांनी विधानसभेतील राज्यपालांच्या अभिभाषण आभारप्रदर्शन ठरावावरील चर्चेत बोलताना केली. 

यावेळी फालेरो म्हणाले, की पर्यावरण विद्ध्वंस, प्रदूषण तसेच मोले अभयारण्यातून जाणाऱ्या प्रकल्पांविरुद्ध आंदोलने सुरू आहेत. वनक्षेत्र नष्ट होऊन वन्यजीव अभयारण्यही धोक्यात आले आहे. या प्रकल्पांबाबत राज्यपालांच्या अभिभाषणात काहीच उल्लेख नाही. माजी प्रधान सचिवाने केलेल्या या घोटाळ्याबाबत सरकार गप्प आहे. त्यांनी केलेला हा गुन्हा पर्यावरण, वनक्षेत्र व अभयारण्य याच्याविरुद्ध आहे. मंत्रिमंडळाच्या परवानगीशिवाय या अधिकाऱ्याने निर्णय घेतला होता. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री हे भारताबाहेर होते तसेच त्यांनी नेमलेल्या त्रिसदस्यीय मंत्र्यांसमोरही हे प्रकरण आले नव्हते. हा अधिकारी अंदमान व निकोबार येथे सहीसलामत आहे. त्यामुळे सरकारने या प्रकरणाची दखल घेत गुन्हा दाखल करावा.

दरम्यान, आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी अर्थसंकल्प व राज्यपालांच्या अभिभाषणात आकडेवारीमध्ये तफावत आहे. ही तफावत वित्तीय तूट किंवा अर्थसंकल्प मांडताना झालेल्यामध्ये असण्याची शक्यता आहे किंवा ही आकडेवारी कोणीतरी लपविण्याचा प्रयत्न करत आहे. जिल्हा पंचायत निवडणूक आरक्षण यावेळी अचानक जाहीर करण्यात आले ते पुढील निवडणुकीत आगाऊ जाहीर करावे. कोविड काळात अनेकजण बेरोजगार झाले, त्यांना मदत देण्यासाठी सरकारने काहीच केले नाही. खाणी सुरू होण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्यात आलेली नाहीत. शेतकऱ्यांना आधारभूत किंमत तसेच संजीवनी शेतकऱ्यांसाठी ऊस पिकासाठी तीन हजार टन दर देण्याचे आश्‍वासन दिले. मात्र, त्याची कार्यवाही झालेली नाही. अल्पसंख्यांक शाळांना शिक्षण धोरणात आर्थिक मदत देण्यासाठी प्राधान्य द्यावे, असे सांगितले.

‘कोविड काळात सरकारची कामगिरी उत्तम’
सरकारने कोविड महामारीच्या काळात उत्तमरित्या कामगिरी केली. त्याचे श्रेय मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांसह डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना व विविध कोरोना योद्ध्यांना जाते. कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्यात यश आले आहे. गोवा राज्याला आधार नोंदणीसाठी पाचवा क्रमांक मिळाला आहे, तसेच विकासकामांबद्दलच्या कामगिरीबाबत गोवा हे देशात सर्वोत्तम राज्य आहे.

आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा संकल्पना सरकार विविध उपक्रमाबाबत यशस्वीपणे राबवत आहे. कृषी क्षेत्राला जादा प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. कोविड नियंत्रणात आल्याने विकासाची गती वाढली आहे. पंतप्रधानांची एक भारत श्रेष्ठ भारत घोषणा सुवर्ण गोवा करण्यास मदत होणार असल्याचे मत मांडून राज्यपालांच्या अभिभाषणाच्या आभार प्रदर्शन ठरावाला आमदार जोसुआ डिसोझा, नीळकंठ हळर्णकर, दयानंद सोपटे, टोनी फर्नांडिस, क्लाफासिओ डायस, फ्रांसिस सिल्वेरा व विल्फ्रेड डिसा पाठिंबा दिला. आमदार ग्लेन टिकलो यांनी हा आभार प्रदर्शनाचा ठराव विधानसभेत मांडला आहे.

Edited By - Prashant Patil

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com