Goa: किल्ले संवर्धनाचा 20 वर्षांपूर्वी दिलेला अहवाल आजही अहवाल धूळ खात पडला

Goa fort.jpg
Goa fort.jpg

मडगाव: गोव्याची संपन्न परंपरा (Tradition of Goa)आणि वारसा याचे आम्ही जीवापाड जतन करतो, असा दावा सरकार जरी करीत असले तरी या वारसा स्थळाबद्दल असलेली अनास्था सध्या ''काब द राम'' किल्ल्याच्या (Cabo de Rama Fort) पडझडीने चव्हाट्यावर आणली आहे. राज्यातील ऐतिहासिक महत्त्वाच्या 51 किल्ल्यांचा अभ्यास करून त्यांचे संवर्धन कसे करायचे, याचा सविस्तर अहवाल डॉ. नंदकुमार कामत यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या कृती दल समितीने 20 वर्षांपूर्वी दिला होता. पण सरकारी अनास्थेमुळे आजही हा अहवाल धूळ खात पडला आहे. (The report on fort conservation given 20 years ago is still not implemented today)

1999 साली पुरातत्त्व खात्याने ही समिती गठीत केली होती. त्यात डॉ. कामत यांच्यासह विख्यात चित्रकार मारिओ मिरांडा, इतिहासतज्ज्ञ पर्सिव्हल नोरोन्हा, पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते राजेंद्र केरकर, लोकवेद संशोधक डॉ. पांडुरंग फळदेसाई, इतिहासप्रेमी शिक्षक वल्लभ गावस देसाई, त्यावेळचे पुरातत्त्व खात्याचे संचालक शंकर म्हामाय कामत यांचा समावेश होता. या समितीने गोव्यातील एकूण 51  किल्ल्यांना भेट दिली होती. या वास्तूंचे संवर्धन कसे करायचे याबाबत मोलाच्या सूचनाही केल्या होत्या. 

दरम्यान, कार्यालयात गेल्यावर मी तुम्हालाही या अहवालाबाबत माहिती देऊ शकेल, असे या खात्याचे सहायक अधीक्षक वरद सबनीस यांनी सांगितले. 

किल्ल्याची पडझड ‘गोमन्तक’कडून उजेडात
सध्या ज्या किल्ल्याची पडझड ‘गोमन्तक’ने उजेडात आणली त्या काब द राम किल्ल्यासह हळर्ण किल्ला, रेईश मागूश किल्ला, थिवीचे तीन किल्ले, बेतुलचा किल्ला अशा एकंदर 51 किल्ल्यांचा अभ्यास करून हा अहवाल तयार करण्यात आला होता. या प्रत्येक वास्तूचे महत्त्व विशद करून त्यांचे संवर्धन कसे करावे याबद्दल सूचना करण्यात आल्या होत्या. या संवर्धन कार्यात ग्रामस्थांचा सहभागही असावा, अशी सूचना करण्यात आली होती.

प्रकाश वेळीप काय म्हणतात..
2000 साली पुरातत्त्व खात्याचे तत्कालीन मंत्री प्रकाश वेळीप याना हा अहवाल देण्यात आला होता. वेळीप म्हणाले, की कामत समितीने तयार केलेला अहवाल अत्यंत महत्त्वाचा होता. त्यावर आधारित ''फोर्टस् ऑफ गोवा'' नावाचा सचित्र ग्रंथही तयार केला होता. मंत्री असताना यातील काही किल्ल्याना भेट देऊन मी स्वतः त्याची पाहणी केली होती. काही ठिकाणी कामही सुरू झाले होते. मात्र नंतर ज्या गतीने हे काम पुढे जायला हवे होते त्यागतीने झाले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com