"गोव्यातील पर्यावरण व लोकांच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या प्रकल्पांची गोव्याला गरज नाही"

दैनिक गोमंतक
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

एक लोकप्रतिनिधी या नात्याने मी माझ्या मतदार संघातील लोकांबरोबर आहे. गोव्यातील पर्यावरण व लोकांच्या आरोग्यावर परिणाम करणारया प्रकल्पांची गोव्याला गरज नसल्याचे कुठ्ठाळीच्या आमदार श्रीमती एलिना साल्ढाणा यांनी सांगितले

वास्को: एक लोकप्रतिनिधी या नात्याने मी माझ्या मतदार संघातील लोकांबरोबर आहे. गोव्यातील पर्यावरण व लोकांच्या आरोग्यावर परिणाम करणारया प्रकल्पांची गोव्याला गरज नसल्याचे कुठ्ठाळीच्या आमदार श्रीमती एलिना साल्ढाणा यांनी सांगितले. गोवा सरकारवर माझा पूर्णपणे विश्वास असून गोवा सरकार लोकभावनेची कदर करून रेल्वे दुपदरीकरण, कोळसा, मोले आदी प्रकल्प नक्कीच रद्द करतील असे त्यांनी स्पष्ट केले .

कासावली येथे ‘रेल्वे दुपदरीकरण विरोधात ग्रामस्थ कृती समिती’ व’ गोंयचो एकवोट’ ने रेल्वे दुपदरीकरण विरोधात शुक्रवारी आयोजित केलेल्या जाहीर सभेत श्रीमती साल्ढाणा बोलत होत्या. श्रीमती साल्ढाणा म्हणाल्या की, जेव्हा माझ्या कार्यालयामध्ये युवक येऊन विचारतात की ,गोवा विध्वंस होऊ नये यासाठी तुम्ही काय करणार आहात. तेव्हा लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांच्यामागे उभे राहणे मी उचित समजते. गोवा अतिशय लहान राज्य असल्याने त्या प्रकल्पांचा गोव्याच्या पर्यावरणावर व जनजीवनावर परिणाम होण्याची भीती आहे. गोव्याला रेल्वे दुपदरीकरणाची गरजच नाही. सध्या जो लोहमार्ग आहे, त्यालगत असलेली घरे सखल भागात आहे. ती घरे हटवून नवीन लोहमार्ग घातला तर एक लोहमार्ग उंच तर दुसरा सखल होईल.
गोव्याला एकच लोहमार्ग पुरेशा आहे.

पर्यावरणप्रेमी प्रजल साखळदांडे यांनी संबंधित प्रकल्पांचा प्रश्न फक्त कासावलीपुरता मर्यादीत नसून तो संपुर्ण गोव्याचा असल्याचे सांगितले. गोव्यातील जनता त्या प्रकल्पाविरोधात आवाज उठवून ते प्रकल्प नकोच असल्याचे संदेश देत आहे. आम्हाला गोव्यातील वारसास्थळे नष्ट झालेली नको.आम्हाला हरित गोवा पाहिजे, आम्हाला काळाकुट्ट झालेला गोवा नको असे त्यांनी सांगितले.कोळशाची मात्रा वाढविण्यासाठी रेल्वे दुपदरीकरणाचा घाट घातला असल्याचा दावा त्यांनी केला. याप्रसंगी गोंयचो एकवोटचे क्रेशन आंताव, कॅप्टन विरेयेत फर्नांडिस व इतरांची भाषणे झाली.

आणखी वाचा:
गोव्यातील निवासी हॉटेल्सना पर्यटन खात्याचा परवाना सक्तीचा - 

संबंधित बातम्या