मासळी विक्रेत्यांची सुरू आहे लोकप्रतिनिधींकडून दिशाभूल

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

वास्कोत सुसज्ज मासळी मार्केट बांधण्यासाठी सर्व सोपस्कार पूर्ण झालेले असताना नियोजित मार्केट प्रकल्प होऊ नये, यासाठी काही राजकीय लोक मासळी विक्रेत्या महिलांना भडकावित असल्याचा आरोप नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी केला.

मुरगाव :  वास्कोत सुसज्ज मासळी मार्केट बांधण्यासाठी सर्व सोपस्कार पूर्ण झालेले असताना नियोजित मार्केट प्रकल्प होऊ नये, यासाठी काही राजकीय लोक मासळी विक्रेत्या महिलांना भडकावित असल्याचा आरोप नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी केला.

मुरगाव पालिकेने दिलेल्या १० कोटी रुपयांच्या मदतीने ‘सुडा’तर्फे वास्कोतील मासळी मार्केट बांधण्यात येणार आहे. या बांधकामासाठी सर्व सोपस्कार पूर्ण झालेले असतानाही काही अडचणी आणण्याचा प्रयत्न विरोधकांनी चालविला आहे. हा प्रकार निंदनीय असल्याचे मत श्री. राऊत यांनी व्यक्त केले.

वास्को शहरात सुसज्ज मासळी मार्केट उभारण्यासाठी १९९५ पासून पालिकेकडून प्रयत्न चालले आहे. पण, प्रत्येकवेळी मासळी विक्रेत्या महिलांच्या विरोधामुळे प्रकल्पाला चालना मिळत नव्हती. तथापि, या खेपेस नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी सर्व प्रकारचा विरोध डावलून नियोजित प्रकल्प बांधकामास चालना देण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. तरीही काही राजकारणी मासळी विक्रेत्या महिलांना भडकावून प्रकल्प रोखण्यासाठी राजकारण खेळत असल्याचा आरोप नगराध्यक्ष राऊत यांनी केला आहे.
वास्कोतील विद्यमान मासळी मार्केट गलिच्छ अवस्थेत आहे.तेथे कोणत्याच सोयीसुविधा नाहीत. या मार्केटमध्ये जाण्यासही ग्राहक नकार देतात. त्यामुळेच मत्स्य ग्राहक घाऊक विक्रेत्यांकडे जाऊन मासळी खरेदी करण्यास पसंती देतात. तथापि, सदरच्या घाऊक विक्री पालिका आणि पोलिसांनी बंद पाडली असल्याचाही दावा त्यांनी केला.

वास्कोत सुसज्ज आणि स्वच्छ मासळी मार्केट असल्यास ग्राहक बाहेर जाऊन मासळी खरेदी करणार नाहीत. त्यासाठी हे मार्केट बांधणे अत्यंत आवश्यक आहे. हे आता मासळी विक्रेत्या महिलांना कळलेले आहे. त्यामुळे त्यांनी आपला होकार दिलेला असतानाही काही जण राजकारण खेळून मासळी विक्रेत्या महिलांना भडकावित असल्याचा आरोप करीत नगराध्यक्ष राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या