गोवा: पर्वरी, साळगावासीयांना मिळेना पाणी; संतप्त नागरिकांचा पाणीपुरवठा विभागावर मोर्चा

गोवा: पर्वरी, साळगावासीयांना मिळेना पाणी; संतप्त नागरिकांचा पाणीपुरवठा विभागावर  मोर्चा
goa water protest.jpg

पर्वरी:  पर्वरी आणि साळगाव मतदारसंघात गेले पाच दिवस पाण्याचा एकही थेंब न आल्याने संतप्त झाल्याने आज आमदार रोहन खंवटे, आमदार जयेश साळगावकर यांनी ग्रामस्थांबरोबर घेऊन पर्वरी येथील पाणीपुरवठा विभाग १७ वर धडक मोर्चा नेला. सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर आणि अभियंता उत्तम पार्सेकर यांना घटनास्थळी पाचारण करून त्यांनाही मोर्चेकऱ्यांनी धारेवर धरले. मंत्री पाऊसकर यांनी १२ तासात पाणीपुरवठा सुरळीत होईल, तोपर्यंत दोन्ही मतदारसंघात दहा दहा टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करू, असे आश्वासन मोर्चेकऱ्यांना देण्यात आले.  (Residents of Parwari, Salgaon staged a protest against the water supply department) 

येथील जलशुद्धीकरण प्रकल्प लवकरच कार्यान्वित करण्याचा प्रयत्न केला जाईल, तसेच अभियंता बोरकर यांची त्वरित बदली होईल, तसेच जे टॅंकरवाले अधिक पैसे घेतात, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही मंत्री पाऊसकरांनी सांगितले. आमदार रोहन खंवटे, जयेश साळगावकर, सरपंच स्वप्नील चोडणकर, पंच वेर्णेकर, श्याम कामत, सरपंच संदीप साळगावकर आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण काम सुरु आहे, पण सार्वजनिक जल खाते आणि सार्वजनिक बांधकाम खाते यांच्या ताळमेळ नाही, त्यामुळे अधूनमधून पाईप लाईन, केबल तोडले जात आहे. त्याचा थेट सामान्य लोकांना त्रास होत आहे. याला पूर्णतः ठेकेदार एम. व्ही राव जबाबदार आहेत. निकृष्ट दर्जाचे काम केले जाते. येथील टाक्‍यामध्ये पाणी नाही, सचिवालय, शिक्षण संचालनालय येथे पाणीपुरवठा कसा होतो, असा सवालही श्री. खवंटे यांनी विचाराला.

गोव्यात ‘हर घर जल ’ योजने अंतर्गत शंभर टक्के सर्व घरांना नळ जोडणी केल्याचा दावा मुख्यमंत्री डॉ. सावंत करीत आहे. हे धादांत खोटे सांगत आहे. पर्वरी आणि साळगाव परिसरात लोकांना गेली कित्येक दिवस पाणीच मिळत नाही. पाणीपुरवठाच्या योजने अंतर्गत पर्वरी हा भाग शेवटचे टोक असल्याने पर्वरीवासियांना कमी प्रमाणात पाणी मिळते. तसेच हॉटेल लॉबी, टॅंकर माफिया यांच्यामुळे ही समस्या आणखीच  गंभीर झाली आहे. यावर तोडगा काढण्या ऐवजी सरकार पाण्यावरून राजकारण करीत आहे. त्यात येथील कार्यकारी अभियंता बोरकर अडवणुकीचे धोरण अवलंबत आहे. ते कोणत्याच प्रकारचे सहकार्य करीत नाही, त्याची त्वरित बदली करावी, अशी मागणीही  खवंटे यांनी केली.

येथील पाणीपुरवठा खाते काहीच कामाचे नाही. त्यांना कोणतेही काम सांगितले, तर ते गाडी नाही, कामगार नाही, साहित्य नाही, अशी कारणे सांगतात. वेरे, नेरुल येथे सोळा ठिकाणी पाण्याची नासाडी होत आहे. पाणी खात्याला सांगितले, तर ते दुरुस्त करायला येत नाहीत, असेही आमदार साळगावकर यांनी सांगितले.

टॅंकरला दोन हजार रुपये!
पर्वरीत गेले पाच दिवस पाणीपुरवठा होत नसल्याने टॅंकरवाल्यांची एका टॅँकरला ८०० रुपये दर असताना २०० हजार रुपये दराने पाणीपुरवठा करीत आहेत. त्याबद्दल काही विचारले तर उलट तुम्हाला पाहिजे, तर घ्या, नाही तर आम्ही चाललो, अशी उर्मट भाषा ते बोलतात. तसेच आज दुपारी नळांना गढूळ पाणीपुरवठा झाला आहे, अशी माहिती एका ग्रामस्थाने दिली.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com