अतिक्रमण करणाऱ्‍यांवर होणार कारवाई

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेत होणारे अतिक्रमण संबंधित खात्यातील स्थानिक अधिकाऱ्‍यांनी तक्रार करून वेळीच जमीनदोस्त करावे.

साखळी:  सरकारी जमिनीवर होणारी अतिक्रमणे रोखण्यासाठी शासकीय अधिकाऱ्‍यांनी लक्ष घालण्याची गरज असून कोठेही सरकारी जागेवर बेकायदा बांधकाम होत असेल, तर ते त्वरित बंद करण्याचे आदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.

साखळी नगरपालिकेच्या विकासासंबंधी चर्चा करण्यासाठी बोलविण्यात आलेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी सर्व प्रमुख खात्यांचे वरिष्ठ अधिकारी, साखळीचे नगराध्यक्ष यशवंत माडकर व अन्य नगरसेवक उपस्थित होते.

गोव्यातील सरकारी मालकीच्या जमिनीचे रक्षण करण्याची जबाबदारी ही स्थानिक लोकप्रतिनिधींबरोबरच सरकारी अधिकाऱ्‍यांनी उचलण्याची गरज असल्याचे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले, की सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेत होणारे अतिक्रमण संबंधित खात्यातील स्थानिक अधिकाऱ्‍यांनी तक्रार करून वेळीच जमीनदोस्त करावे.

सरकारी जागा बळकावण्याची काहींना सवय झालेली असून ती रोखण्यासाठी कडक उपाययोजना आखण्यासाठी सरकारी यंत्रणेने पुढाकार घेण्याची गरज असल्याचेही मुख्यमंत्री पुढे म्हणाले. सरकारी कामांना चालना देण्यासाठी सर्व घटकांनी जबाबदारीने वागण्याची गरज असून राज्याचा वार्षिक महसूल वाढविण्याची व नको असलेला खर्च रोखून धरण्याचे काम केवळ सरकारी अधिकारीच करू शकतात, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

एखाद्या भागाचा, पंचायतीचा, नगरपालिकेचा किंवा तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी सरकारबरोबरच सरकारी खात्यांची आहे. त्यासाठी ‘व्हिजन डॉक्युमेंट’ तयार करण्याची गरज आहे. विकासाच्या बाबतीत दूरदृष्टीचा टप्पा गाठण्यासाठी सर्व खातेप्रमुखांनी या बाबींकडे विशेष लक्ष द्यावे. तसेच सर्व खातेप्रमुखांनी यासंबंधीचा अहवाल तयार करून आपल्या हाताखाली काम करणाऱ्‍यांकडे देण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

साखळी नगरपालिका क्षेत्राच्या विकासकामासंबंधी ते म्हणाले, की साखळी नगरपालिकेच्या विकासासंबंधीचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला असून तो गोवा राज्य साधनसुविधा महामंडळाकडे आहे. त्यातील साधारण ४०-५० टक्के विषयांवर चर्चा झाली असून राहिलेले विषय घेण्यासाठी शासन प्रयत्नरत आहे. साखळी नगरपालिकेच्या नगरसेवकांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा.

बैठकीला डिचोलीचे उपजिल्हाधिकारी राजेश आजगावकर, मामलेदार तथा साखळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रविणजय पंडित, वीज खाते, सार्वजनिक बांधकाम खाते, नगरनियोजन, गोवा साधन सुविधा महामंडळ, पुरातत्त्व खाते व इतर खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या