पाच दिवसांच्या कडक लॉकडाऊननंतर फोंड्यात निर्बंध शिथिल

दैनिक गोमंतक
सोमवार, 3 मे 2021

फोंड्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढली आहे. आठवड्यात किमान तीन ते चार बळी जात आहेत. मात्र, अजूनही कुणी गांभीर्याने घेत नाही.

फोंडा : राज्यातील वाढते कोरोना रुग्ण आणि झपाट्याने जाणारे बळी यामुळे घाबरून गेलेल्या गोमंतकीयांबरोबरच अन्य काही राजकीय नेत्यांनीही पंधरा दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र याकडे सरकार डोळेझाकपणा करीत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून फोंड्यात काल (शनिवारी) मासळी बाजारही बंद ठेवण्यात आला होता. मात्र, आज (रविवारी) अर्धे अधिक मासळीवाले बाजारात मासळी विकताना दिसले. त्यामुळे सकाळी मासळी बाजारात काहीअंशी गर्दी दिसली. विशेषतः गोमंतकीय मासे विक्रेते घरीच बसून होते. मात्र, परप्रांतीय मासे विक्रेत्यांनी बिनधास्तपणे मासे तसेच कोंबड्या विक्री बरोबरच आंब्यांची विक्री केली. त्यामुळे हे कसले लॉकडाऊन असा सवाल गोमंतकीयांनी केला आहे.  (Restrictions in the fund relaxed after five days of strict lockdown) 

म्हापशातील राजकीय पटलावर एके काळी वैश्य समाजाचा पगडा होता

फोंड्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढली आहे. आठवड्यात किमान तीन ते चार बळी जात आहेत. मात्र, अजूनही कुणी गांभीर्याने घेत नाही. सरकारकडे कडक लॉकडाऊनची मागणी केली, तर त्याकडे दुर्लक्ष केले जात असून कोरोनाबाबतचे सर्व नियम विक्रेत्यांकडून खुंटीला टांगून ठेवल्याचे निदर्शनास आले आहे. फोंडा बाजार भागात ग्राहकांची सकाळी मोठी वर्दळ होती. रस्त्यावरही दुचाकी व चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणात दिसली.

नेत्रावळी गावात त्या घरातील एकमेव तरुणावर काळाने घातली झडप

गोमंतकीय फळविक्रेता आंबे व इतर फळे घेऊन विक्रीस आल्यावर त्यांच्या पाट्या पालिकेकडून उचलल्या जातात. मात्र, बिगर गोमंतकीय जागा मिळेल तेथे फळ विक्री करीत असल्याने काही गोमंतकीय फळ विक्रेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.  फोंड्यातील बसस्थानकावर पहिल्या दिवशी  शुकशुकाट जाणवला. मात्र, काल प्रवासी बसगाड्यांसाठी तिष्ठत होते. केवळ कदंब महामंडळाच्या बसगाड्या तेवढ्या सुरू होत्या. 

गोमंतकीय विक्रेते बसले घरी..!
फोंड्यात लॉकडाऊनमुळे गोमंतकीय विक्रेते घरी बसले असले, तरी परप्रांतीयांनी मासे आणि फळ, चिकन विक्रीचा व्यवसाय जोरात चालवला आहे. गावठी मासळी घेऊन येणाऱ्या गोमंतकीय मासे विक्रेत्या महिला घरीच थांबल्या आहेत, तर गोव्याबाहेरून आणलेल्या आंब्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे.

रुग्णांना मदत करण्यासाठी प्रयत्न
फोंडा तालुक्‍यातील सर्व लोकप्रतिनिधी आपल्यापरीने रुग्णांना मदत करण्यासाठी काम करीत असले तरी आमदार नसलेले काही राजकीय नेतेही आपल्यापरीने या सामाजिक सेवेत मोठ्या प्रमाणात कार्यरत झाले आहेत. फोंडा, प्रियोळ, मडकई, शिरोडा आदी फोंड्यातील चारही मतदारसंघातील लोकप्रतिनिधींकडून अडचणीत आलेल्यांची विचारपूस करून आवश्‍यक सहकार्य केले जात असले तरी मगो पक्षाचे फोंड्यातील नेते डॉ. केतन भाटीकर तसेच फोंडा फर्स्टचे अध्यक्ष तथा कॉंग्रेसचे नेते राजेश वेरेकर यांनीही आपापल्या रुग्णवाहिका लोकांसाठी तैनात ठेवल्या आहेत. 

मुख्यमंत्र्यांची आयडी इस्पितळाला भेट
वाढत्या कोरोना रुग्ण व मृत्युसंख्येमुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील वैद्यकीय सुविधांचा आढावा घेतला असून फोंड्यातील आयडी उपजिल्हा इस्पितळाला भेट देऊन तेथील स्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आयडी इस्पितळातील एक मजला कोविडसाठी निर्धारित करण्यात आला आहे. या मजल्यावर दीडशे खाटांची सोय करण्यात आली असून ती वाढवण्याची आवश्‍यकता भासत आहे. इस्पितळातील प्राणवायूचा साठा कमी असल्याचे वृत्त असल्याने मुख्यमंत्र्यांनी फोंड्यातील स्थितीचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्‍यक सूचना केल्या.

 

संबंधित बातम्या