चतुर्थीत येणार भजन, आरत्यांवर निर्बंध

प्रतिनिधी
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

हिंदूधर्मियांचा मोठा आणि उत्साहवर्धक चतुर्थी सणावर कोरोनाचे सावट असल्याने यंदा चतुर्थी साजरी करण्यावर बऱ्याच मर्यादा आल्या आहेत.

डिचोली:  हिंदूधर्मियांचा मोठा आणि उत्साहवर्धक चतुर्थी सणावर कोरोनाचे सावट असल्याने यंदा चतुर्थी साजरी करण्यावर बऱ्याच मर्यादा आल्या आहेत. गणपती बाप्पाचे घरी आगमन ते विसर्जन करेपर्यंत मार्गदर्शक नियम लागू करण्यात आल्याने यंदा चतुर्थीकाळात अन्य उत्साही कार्यक्रमांबरोरच ‘गणपती’ बाप्पांसमोर गर्दीने आरती करण्यावर निर्बंध आले आहेत. त्यामुळे यंदा बालगोपाळांसह विविध मंडळांना घुमटांच्या तालावर आरत्यांचा गजर करताना सारासार विचार करावा लागणार आहे.

यंदा सार्वजनिक गणशोत्सव मंडळांच्या कार्यक्रमांवरही पूर्णपणे निर्बंध आले आहेत. त्यामुळे गणपतीसमोर प्रत्यक्ष घुमट आरती स्पर्धा, भजन यासारखे कार्यक्रम आयोजित करण्यावर निर्बंध आले आहेत. त्यामुळे उत्साही घुमट आरती कलाकारांमध्ये नाउमेद दिसून येत आहे. यंदा एक तर घरातीलच गणेशभक्‍तांना गणपतीसमोर प्रत्यक्ष आरती करावी लागणार आहे किंवा आरत्यांची ध्वनीफित लावून आरत्यांचा ताल धरावा लागणार आहे. 

कारागिरही नाही ! 
वास्तविक चतुर्थी जवळ आली, की गावागावांतील वाड्यावाड्यांवर घुमट आरतीच्या तालमी सुरू असायच्या. चतुर्थीला महिनाभर असतानाच बहुतेक भागात घुमट आरत्यांचा गजर कानी पडत असायचा. यंदा मात्र वातावरण नेमके उलटे आहे. चतुर्थी तीन दिवसांवर आली असली तरी अद्याप आरत्यांचा गजर कानी पडत नाही की वर्षपध्दतीप्रमाणे चतुर्थीचा उत्साह जाणवत नाही. चतुर्थीला जवळपास एक महिना असताना महाराष्ट्रातील पंढरपूर आदी काही भागातील वाद्ये दुरुस्ती करणारे कुशल कारागिर आपला मोर्चा गोव्याकडे वळवायचे. विविध शहरात हे कारागिर आपला वाद्ये दुरुस्ती करण्याचा व्यवसाय करताना दिसून येत असे. यंदा मात्र, डिचोली शहरात कुठेच हे वाद्ये दुरुस्ती कारागिर दिसून येत नाहीत. कोरोनामुळे राज्याबाहेरील कारागिरांना यंदा गोव्यात येणे शक्‍य झालेले नाही. शहरात संगीत वाद्ये दुरुस्ती आणि विक्री आस्थापन आहे. काही भागात स्थानिक कारागिर आहेत. मात्र, त्यांच्याकडेही अपेक्षेप्रमाणे तबला, हार्मोनियम ही वाद्ये दुरुस्तीसाठी आलेली नाहीत किंवा विक्रीलाही प्रतिसाद मिळत नाही. यंदा घुमटेही अजून बाजारात विक्रीस आल्याचे दिसून येत नाही. यावरून यंदा चतुर्थीकाळात भजन आणि आरत्यांवर मर्यादा येणार असल्याचे स्पष्ट आहे. कोरोना महामारीमुळे यंदा संगीत वाद्ये दुरुस्ती आणि खरेदी व्यवसाय मोठ्या प्रमाणात मंदावला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत अजून दहा टक्‍केही व्यवसाय झालेला नाही. स्थानिक कारागिर संकटात आले असून यंदा या व्यवसायातील अर्थकारण बदलणार आहे, अशी खंत कलाकार दिगंबर परब यांनी व्यक्‍त केली.
 

संबंधित बातम्या