डिचोली परिसरातील वाचकांची गैरसोय

प्रतिनिधी
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

तालुका वाचनालयात वाचकांच्या प्रवेशावर निर्बंध

डिचोली:  टाळेबंदीत बऱ्याच अंशी शिथिलता आली असली, तरी कोरोनाचा धोका ओळखून शहरातील सरकारी तालुका वाचनालयात अद्यापही वाचकांना प्रवेश करण्यावर निर्बंध आहेत. हे वाचनालय नियमितपणे खुले ठेवण्यात येत असले, तरी वाचनकक्षात प्रवेश करण्यासाठी मर्यादा आल्याने नियमित वाचकांची मोठी गैरसोय होत आहे. वाचनालयात वर्तमानपत्रे आदी पुस्तके वाचायला मिळत नसल्याने सध्या तरी बहूतेक वाचकांनी या वाचनालयाकडे पाठ केल्याचे जाणवत आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मागील जवळपास साडे पाच महिन्यांपासून या वाचनालयात वाचकांच्या प्रवेशावर मर्यादा आल्या आहेत. टाळेबंदीपासून वाचनालयात केवळ वाचक सभासदांना परस्पर पुस्तके देण्यात येतात आणि पुस्तके परत स्वीकारली जातात. तेव्हापासून केवळ पुस्तके नेण्यासाठी आणि परत करण्यासाठीच वाचक या वाचनालयात येत आहेत. दरम्यान, मध्यंतरी वाचनालयात वाचकांना प्रवेश देण्यात येत होता. मात्र, गर्दी सोडाच काही वाचक नियमांचे पालन करण्यास दुर्लक्ष करु लागल्याचे आढळून येवू लागले. त्यामुळे वाचकांच्या प्रवेशावर निर्बंध घालणे अपरिहार्य ठरले. अशी माहिती वाचनालयाकडून मिळाली आहे. 

छत्तीस वर्षांचा इतिहास असलेले डिचोलीतील सरकारी तालुका वाचनालय डिचोली आणि आजूबाजूच्या वाचकांसाठी उपयुक्‍त आणि वरदान ठरलेले आहे. मागील दिड वर्षांपासून हे वाचनालय पालिकेच्या सभागृहात कार्यरत आहे. या वाचनालयात कथा, कादंबरी, नाटक, कवितासंग्रह, विज्ञान, सामान्यज्ञान आदी मिळून 23  हजाराहून अधिक पुस्तके आहेत. सभासदांचा आकडाही दोन हजार आठशे तीन एवढा आहे. या वाचनालयात नियमितपणे वर्तमानपत्रे आदी पुस्तके वाचण्यासाठी येणाऱ्या वाचकांचा आकडाही समाधानकारक आहे. मात्र,कोरोना महामारीच्या संकटामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीनंतर वाचनालयातील वाचनकक्षात वाचकांच्या प्रवेशावर निर्बंध आल्याने या वाचनालयातील वाचनकक्ष मोकळा वाटत आहे. नोकरी वा अन्य कारणामुळे शहराबाहेर असणाऱ्या वाचक आणि सभासदांची अन्य दिवशी होणारी गैरसोय लक्षात घेवून मागील वर्षी ऑक्‍टोबर महिन्यापासून वाचनालय रविवारी खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात 
आला. 

संबंधित बातम्या