गोवा: भाजपवासी झालेल्या 'त्या' 12 आमदारांचा आज होणार फैसला

दैनिक गोमंतक
मंगळवार, 20 एप्रिल 2021

मगोतून आणि कॉंग्रेसमधून भाजप मध्ये गेलेल्या झालेल्या 12 आमदारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला आज  दुपारी चार ते साडेचार वाजताच्‍या दरम्यान होणार आहे.

पणजी: मगोतून आमदारकीचा राजीनामा न देता भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दोघा आणि कॉंग्रेसमधून याच पद्धतीने भाजपवासी झालेल्या 10 आमदारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला आज  दुपारी चार ते साडेचार वाजताच्‍या दरम्यान होणार आहे. मगोचे नेते आमदार सुदिन ढवळीकर व गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सादर केलेल्या अपात्रता याचिकांवर सभापती राजेश पाटणेकर निवाडा देणार आहेत. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात 22 रोजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार असल्याने सभापतींच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (The results of the 12 MLAs who joined the BJP without resigning will be announced today)

पेडण्याचे आमदार बाबू आजगावकर, सावर्डेचे आमदार दीपक प्रभू पाऊसकर यांनी मगोतून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. थिवीचे आमदार निळकंठ हळर्णकर, पणजीचे आमदार आतानासिओ मोन्सेरात, ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात, सांताक्रुझचे आमदार आंतोनिओ फर्नांडिस, सांतआंद्रेचे आमदार फ्रांसिस सिल्वेरा, नुव्याचे आमदार विल्फ्रेड डिसा ऊर्फ बाबाशान, वेळ्ळीचे आमदार फिलीप नेरी रॉड्रिग्ज, कुंकळ्ळीचे आमदार क्लाफासियो डायस, काणकोणचे आमदार इजिदोर फर्नांडिस व केप्याचे आमदार चंद्रकांत कवळेकर यांनी कॉंग्रेसमधून (Congress) भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. 

राज्य घटनेच्या दहाव्या परीशिष्टातील तरतुदीनुसार पक्ष व विधीमंडळ गट यांच्यात दोन तृतीयांश फूट पडली तर ती फूट पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत कारवाईस पात्र ठरत नाही अशी तरतूद आहे. त्या तरतुदीचा वापर करत हे पक्ष प्रवेश करण्यात आल्याचा युक्तीवाद सभापतींसमोर या आमदारांकडून केला गेला आहे. त्याला अर्थात याचिकादारांनी आक्षेप घेतले. मात्र आमदारांनी पक्षही भाजपमध्ये विलीन झाल्याची, तसे ठराव संमत झाल्याचे, तशी इतिवृत्ते लिहीली गेल्याची कागदपत्रे सभापतींसमोर सुनावणी सादर केली आहेत. यामुळे कागदपत्रांच्या आधारे सभापतींनी निर्णय घ्यायचा ठरवल्यास 12 आमदार पात्र ठरू शकतात.

सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) झालेल्या सुनावणीवेळी सभापती या याचिका निकालात काढतील असे ॲटर्नी जनरल तुषार मेहता यांनी सांगितले होते. त्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. मात्र त्या तारखेला निवाडा न देता केवळ अंतिम सुनावणी घेण्यात आली आणि निवाडा 29 एप्रिल रोजी देऊ असे सभापतींनी कळवले होते. ते न्यायालयाने मान्य केले नाही. अखेर 20 रोजी निवाडा देण्याचे सर्वोच्च न्यायालयात मान्य करण्यात आले त्यानुसार या निवाडा होत आहे.

गोवेकरांनो सावधान! 24 तासांत 940 कोरोना रुग्ण तर 17जणांचा मृत्यू

आमदार (MLA) पात्र की अपात्र ठरतील, यावर राजकारणाची पुढील दिशा ठरणार आहे. पेडण्यातून निवडणूक लढण्यास माजी मंत्री राजेंद्र आर्लेकर उत्सुक आहेत. खासदार विनय तेंडुलकर हे सावर्डेतून तर प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे थिवीतून राजकीय भवितव्य आजमावू शकतात. कवळेकर अपात्र ठरले तर त्यांच्या पत्नी सावित्री याना केप्यातून उमेदवारी देऊन सुभाष फळदेसाई यांचा सांग्यातील मार्ग मोकळा करता येणार आहे. सांतआंद्रेतून रामराव वाघ यांना संधी मिळू शकते तर कुंकळ्ळीतून सुदेश भिसे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले जाऊ शकते. काणकोणमधून रमेश तवडकर हे उमेदवार ठरू शकतात. त्यामुळे आमदार पात्र की अपात्र ठरतील त्यावर बरेच काही अवलंबून आहे.
 

संबंधित बातम्या