इफ्फि-२०२० आयोजनाचा फेरविचार करा; आयोजनात आर्थिक बोजा पडत असल्याचा दिगंबर कामत याचा आरोप

अवित बगळे
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

इफ्फि-२०२० आयोजनाचा फेरविचार करा, करोडो रुपये खर्चाच्या आंचिम ने गोव्यातील स्थानिक सिनेमा व्यवसायाला व पर्यटन क्षेत्राला नेमका काय फायदा झाला त्याची श्वेतपत्रीका जारी करा - दिगंबर काम

पणजी: कोविडच्या महामारीत सामान्य जनता आर्थिक दृष्ट्या कठीण परिस्थितीचा सामना करत आहे. गोव्याची अर्थव्यवस्था सामान्य नाही हे खुद्द मुख्यमंत्र्यानीच मान्य केले अआहे. अशावेळी महोत्सवांचे आयोजन करणे व उत्सव साजरे करण्याची ही वेळ नव्हे. त्यामुळे ५१ व्या आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सव -२०२० चे (इफ्फी २०२०) आयोजन करण्याच्या निर्णयाचा सरकारने पुनर्विचार करावा, अशी मागणी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यानी केली आहे.

 

इफ्फीच्या आयोजनात गोवा सरकारची भुमिका केवळ वाहतूक व निवास व्यवस्था सांभाळण्या पुरती मर्यादीत राहिली आहे. गोवा मनोरंजन संस्थेकडे असलेले महोत्सवातील चित्रपट विभाग हाताळणीचे व इतर सर्व अधिकार केंद्र सरकार व चित्रपट महोत्सव संचालनालयाने काढून घेतले आहेत. गोवा सरकारवर या महोत्सवाच्या आयोजनात मोठा आर्थिक बोजा पडत आहे. गोमंतकीय सिने व्यावसायिक व पर्यटन क्षेत्राला यातून काहिच फायदा मिळत नाही. सरकारने २००४ पासूनचा इफ्फीचा खर्च व त्याने  राज्याला झालेला फायदा याची माहिती देणारी श्वेतपत्रीका जारी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

 

गोवा राज्य आर्थिक अडचणीत असताना महोत्सव आयोजित करणे बरोबर नाही. महोत्सवातील विदेशी प्रतिनिधींची संख्या बघितल्यास गोव्यातील पर्यटन क्षेत्राला इफ्फी पासून मोठा फायदा होत नसल्याचे स्पष्ट होत आहे. सन २०१९ मध्ये केवळ ११६ विदेशी प्रतिनिधींची नोंदणी झाल्याचे सरकारची आकडेवारी सांगते, असे त्यांनी सांगितले.

 

गोवा सरकार आज महोत्सव आयोजनांवर एकूण २० ते २५ कोटी रुपये खर्च करीत असताना, केंद्र सरकार व चित्रपट महोत्सव संचालनालयाकडुन खर्चाचा वाटा उचलण्यासाठी गोवा सरकारला काहीच निधी मिळत नाही. महोत्सवाला प्रायोजकांकडून केवळ ८.८५ लाख रुपये २०१९ साली मिळाले होते हे सरकारनेच विधानसभेत मला दिलेल्या उत्तरात स्पष्ट केले आहे. त्यामुळे यंदा खर्च सरकारने करू नये अशी सूचना त्यांनी केली आहे.

 

इफ्फी-२०१९ मध्ये २२०३ गोमंतकीय प्रतिनिधीनी नोंदणी केली होती तर राज्या बाहेरील केवळ ५९४४ देशी प्रतिनिधीनी नोंदणी केली होती. त्यामुळे चित्रपट महोत्सवातुन राज्याच्या पर्यटनाला  मोठा फायदा होत असल्याचा दावा खोटा ठरत आहे, असे कामत यांचे म्हणणे आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या