पहाटे 2 ते 6 गोव्यात काय घडतं..!

दैनिक गोमंतक
गुरुवार, 13 मे 2021

रुग्णांचा जीव वाचवण्याला प्राधान्य द्यायला हवे.

समस्त गोमंतकीयच नव्हे, तर शेजारील सिंधुदुर्ग (Sindhudurg) आणि कारवारवासीयांसाठी भरंवशाचे आणि आशेचा किरण असलेल्या या इस्पितळातील (Hospital) कोविड (Covid-19) रुग्णांच्या मृत्युसाखळीमुळे इस्पितळावरील लोकांचा विश्‍वास कमी होत आहे. जिथे आपण बरे होऊ, असा आत्मविश्‍वास पदरी बाळगून येणारे रुग्ण पुन्हा परत घरी जाणार की नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे, तिथे काहीतरी घडत आहे हे नक्की... सरकार, तिथे गैरव्यवस्थापन असल्याने मृत्यू होत आहेत, या निष्कर्षापर्यंत आले आहे. पण त्यावर तोडगा काढण्यासाठी युध्दपातळीवर उपाय योजायला हवेत, पर्याय शोधायला हवेत.(A review of the Corona situation in Goa)

सरकारी फाईलमधील शेरेबाजी आणि लालफितीच्या कारभारातून त्वरित बाहेर पडत जे काही आवश्‍यक आहे ते करायला हवे. रुग्णांचा जीव वाचवण्याला प्राधान्य द्यायला हवे. त्यासाठीची धडपड करण्यासाठी उच्च न्यायालयाला सरकारचे कान पिळण्याची वेळ यावी, हे राज्याचे दर्दैव आहे. रोज माणसे मरताहेत. प्राणवायूअभावी कोविड रुग्ण मृत्युमुखी पडण्याच्या घटना काही बंद झाल्या नाहीत. बुधवारीही 70  जणांचा मृत्यू झाल्याचे मेडिकल बुलेटिनमध्ये जाहीर झाले. यातील 21  जणांचा प्राणवायू न मिळाल्याने गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती सोशलमीडियावरून फिरत आहे. मंगळवारी 26 जणांचा अशाप्रकारे बळी गेला होता. गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात पहाटे 2 ते 6 या वेळेत असे काय घडते की रुग्ण दगावण्याचे प्रकार वाढले आहेत. या वेळेतच प्राणवायू पुरवठा कमी कसा काय पडतो, असा प्रश्‍न सर्वांनाच पडला आहे आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठानेही गोवा सरकारला नेमके याच विषयावर कात्रीत पकडले आहे. हे होतेच कसे? असा खडा प्रश्‍न करून प्राणवायूअभावी होणारे रुग्णांचे मृत्यू रोखा, असे आदेशही दिले गेले आहेत. कोणाला कधी आणि कसे मरण येईल, हे कोणीच सांगू शकत नाही. पण ‘गोमेकॉ’मध्ये सध्या कोविडरुग्ण उपचार विभागात जे काही चालले ते भयानक आहे. प्रत्येकाचा जीव अनमोल आहे. तो वाचवण्यासाठी डॉक्टर अखरेपर्यंत प्रयत्न करतात. पण, एखाद्याचा जीव प्राणवायूअभावी जात असेल तर तो हलगर्जीपणा आहे. 

COVID-19 GOA: पहाटेच्या वेळी रुग्ण मृत्यूचे प्रमाण जास्त असण्याचे कारण काय?

सरकारने प्राणवायू पुरवठ्यासाठीचे योग्य नियोजन करायला हवे. राज्यातील महत्त्वाच्या अशा या इस्पितळात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना आलेले विदारक अनुभव पाहता इस्पितळात खरेच लोकांनी उपचारासाठी यावे का, असे कोणालाही वाटल्याशिवाय राहणार नाही. रोज मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या काही कमी होत नाही. त्याची कारणे अनेक असतील. पण, जे उपाय व्हायला हवेत, जे शक्य आहे ते करायला हवे. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या कोविड रुग्णांना प्राणवायूची गरज भासते आणि हा प्राणवायू व्यवस्थित मिळत नसल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होतात. यातून मृत्यू होतो. काही रुग्णांचा प्राणवायूच्या तुटवड्यामुळे मृत्यू झाल्याच्या प्रकाराची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गोवा सरकारला जनहित याचिकांवरील सुनावणीवेळी चांगलेच फैलावर घेतले. भारतीय घटनेतील कलम २१ नुसार प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे व त्यांना वाचविण्याची सरकारची जबाबदारी आहे, याचा विसर सरकारला पडता कामा नये, याकडेही न्यायायलयाने लक्ष वेधले आहे. न्यायालय एवढ्यावरच थांबले नाही तर यापुढे एकाही कोविड रुग्णाचा मृत्यू हा प्राणवायुअभावी होणार नाही यासाठी आवश्‍यक प्रमाणात प्राणवायूचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. त्यामुळे 2 ते 6 या वेळेत सुरू असलेला मृत्यूचा सिलसिला खंडित होईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. गोमेकॉ इस्पितळात प्राणवायूचा मोठा तुटवडा असल्याची कबुली इस्पितळाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर तसेच कोविड प्रमुख डॉ. विराज खांडेपारकर यांनी खंडपीठासमोर दिली यावरून कोण खोटे बोलत होते, सत्य लपवत होते हे स्पष्ट झाले आहे. सर्वच रुग्णांवर एकाचवेळी उपचार करणे शक्य नाही, याची कल्पना सर्वांनाच आहे. परंतु किमान जे रुग्ण इस्पितळात आहेत त्यांच्यावर तरी देखरेख ठेवता येते. मात्र तिथेही गैरव्यवस्थापन असल्याने सारे काही हाताबाहेर गेले आहे.

गोवा हद्दीत कोविड चाचणी प्रमाणपत्र सक्तीचे

इस्पितळात सुमारे 950 रुग्ण दाखल असून खाटा मात्र 700 आहेत. कोविडग्रस्त रुग्णांना प्राणवायूचा पुरवठा सुरळीतपणे करण्यासाठी प्रतिदिन सुमारे ७२ प्राणवायूच्या ट्रॉलींची गरज आहे. प्रत्येक 20 मिनिटाने एक ट्रॉली लावावी लागते व एका ट्रॉलीवर 48 प्राणवायूचे जंबो सिलिंडर्स असतात. इस्पितळाला दरदिवशी स्कूप या कंपनीकडून 1100 सिलिंडर्सचा पुरवठा होतो. इतर प्राणवायू पुरवठादारांकडून सुमारे 1900 सिलिंडर्सचा पुरवठा होतो. त्यामुळे प्रतिदिन 72 ट्रॉली सिलिंडर्सचा पुरवठा शक्य नाही, ही गोमेकॉची अडचण आहे. अधिकाधिक 55 ट्रॉलींचा पुरवठा करता येणे शक्य आहे. निदान ते तरी करायला हवे म्हणजे मृत्यूचे प्रमाण तरी कमी होईल. राज्याला प्रतिदिन 55 मेट्रिक टन प्राणवायूची गरज आहे. गोमेकॉसाठी 20 मेट्रिक टन प्राणवायू लागतो. केंद्र सरकारकडून 26 मेट्रिक टन एवढाच पुरवठा होतो. असे असताना महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्राणवायू पुरवठा होत असल्याचा आरोप जो होतो, त्याचा खुलासाही आता व्हायला हवा. प्राणवायूमुळे आपल्या जवळच्या माणसांना प्राणास मुकावे लागले, अशी कैफियत मांडत काही जणांनी उच्च न्यायालयात गोमेकॉतील भोंगळ कारभाराबाबत माहिती सादर केली आहे. 

प्राणवायू पुरवठ्यावर तोडगा म्हणून अशा रुग्णांसाठी दुपारी 2 वाजता किमान 500 जंबो प्राणवायू सिलिंडर्स आणि त्यानंतर प्रत्येक आठ तासानंतर म्हणजे रात्री 10 वाजता 250 जंबो सिलिंडर्स व पहाटे 6 वाजता 250 जंबो सिलिंडर्स असा पुरवठा झाला तर बऱ्याच प्रमाणात धोका टळू शकतो, अशी माहिती डीन बांदेकर यांनी न्यायालयाला दिली आहे. याचा अर्थ योग्य व्यवस्थापन केले तर हानी टळू शकते. कोविड रुग्णांच्या आरोग्याच्या स्थितीवरही बरेच काही अवलंबून असले तरीही सध्या रुग्ण दगावण्याचे जे प्रमुख कारण आहे त्यावर उपाय म्हणून प्राणवायूचा पुरवठा पुरेशा प्रमाणात केला तर त्यात खंड पडू शकतो. उत्तर व दक्षिण गोवा इस्पितळात तसेच फोंडा उपजिल्हा इस्पितळातील कोविडग्रस्त रुग्णांसाठी प्रावणायू मुबलक आहे आणि या इस्पितळांमध्ये प्राणवायूअभावी कोणाचाही मृत्यू झालेला नाही, असे सांगितले जाते, पण खरे कारण कसे कळणार? कोविडमुळे रुग्ण हे गोमेकॉतच मृत्यू पावतात असे नाही तर इतर इस्पितळे आणि आरोग्य केंद्रातही रुग्ण मृत्यू पावत आहेत. त्यांच्या मृत्यूची कारणमीमांसाही आता करायला हवी.

कोविडने गेल्या १२ दिवसांत ७०६ जणांचा बळी घेतला आहे. गेल्या वर्षी एवढे मृत्यू होण्यास १७४ दिवस लागले होते. या 12 दिवसांत सरकारच्या गैरव्यवस्थापनाचे बारा कसे वाजले हे लक्षात आले आहे. या दिवसांत कोविडमुळे दररोज सरासरी 59 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्यावर्षी या काळात दररोज सरासरी चार जणांचा मृत्यू कोविडमुळे होत होता. ही आकडेवारी पाहिली तर राज्याचा कोविड मृत्यूदर 15 पटीने वाढला आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत 1 हजार 79 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. पहिल्या लाटेत 795 जणांचा मृत्यू झाला होता. 12 मे पर्यंत 9 हजार 846 नव्याने सापडलेल्या रुग्णांपैकी 706 जणांचा बळी गेला आहे. ही आकडेवारी चिंता करायला लावणारी आहे. सरकार आता उपाययोजना करेल, न्यायालयही मार्गदर्शन करेल. पण आपण सर्वांनी दक्षता बाळगायलाच हवी. कोविडला दूर ठेवण्यासाठी आपण सुरक्षिततेचे मार्ग अवलंबले तर बरेच काही साध्य होणार आहे. कोविडचा सर्वांनाच फार वाईट अनुभव आहे.
“साँस बाकी है, पर हवा नहीं है
नाक ढक लीजिये
मुँह भी लपेटे रखिए 
और कोई रास्ता भी नहीं है 
सब शामिल है, इस गुनाह में
कुसूर किसी एक का नहीं है
वक्त है, अब भी संभल जाओ
अभी सब कुछ लुटा नहीं है...
कोविड महामारीतील सध्याचे भीषण वास्तव मांडणारी ही कविता कोणीतरी सोशलमीडियावर टाकली आहे. ही स्थिती काही बदललेली नाही. तोपर्यंत सावधगिरी बाळगा.

संबंधित बातम्या